तेल हा आपल्या स्वयंपाकातील (Cooking oil) एक महत्त्वाचा घटक. भाजी, आमटीला फोडणी देण्यासाठी किंवा एखादा पदार्थ तळण्यासाठी आपण तेलाचा वापर करतोच. आता कोणते तेल तब्येतीसाठी सर्वात चांगले, कोणत्या तेलाने शरीराला त्रास होत नाही यांसारखे प्रश्न आपल्यातील अनेकांना पडतात (Cooking tips). अमुक तेल खाल्ल्याने आरोग्याला त्रास होतो, तर विशिष्ट तेल खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते असे आपण नेहमी ऐकतो. ठराविक काळाने आपण नेहमी वापरत असलेले तेल बदलायला हवे हेही तितकेच खरे आहे. आहारातील तेलांमध्ये प्रामुख्याने शेंगदाणा तेल, सूर्यफूलाचे तेल, मोहरीचे तेल यांसारख्या तेलांचा वापर केला जातो. पण आपण बाहेर जे पदार्थ खातो त्यामध्ये कोणत्या प्रकारचे तेल वापरलेले असते हे आपण सांगू शकत नाही, ज्याचा आपल्या आरोग्याला त्रास होऊ शकतो.
कोलेस्टेरॉल वाढण्यास तेल कसे ठरते कारणीभूत
आपल्या शरीरात दोन प्रकारचे कोलेस्टेरॉल असते. एक गुड कोलेस्टेरॉल आणि एक बॅड कोलेस्टेरॉल. पण बॅड कोलेस्टेरॉलची पातळी वाढली की शरीरात फॅटस जमा व्हायला लागतात. या फॅटसमुळे रक्तप्रवाह आणि हृदयरोगाच्या तक्रारी उद्भवतात. त्यामुळे हृदयरोगापासून आपला बचाव करायचा असेल तर बॅड कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवणे आवश्यक असते. पाम तेल किंवा इतर काही तेलांमुळे शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल वाढते आणि त्यामुळे आरोग्याच्या तक्रारी निर्माण होतात.
कोणते तेल अपायकारक...
द जर्नल ऑफ न्यूट्रीशनमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, पाम तेल आरोग्यासाठी अजिबात चांगले नसते. ययामुळे आपल्या शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढण्यास मदत होते. यामध्ये असलेले सॅच्युरेटेड फॅटस बॅड कोलेस्टेरॉल वाढण्यास कारणीभूत असतात. त्यामुळे ज्यांना कोलेस्टेरॉलचा त्रास आहे त्यांनी हे तेल टाळलेलेच बरे. आपण खात असलेल्या सर्वाधिक पॅकेट फूडमध्ये पाम तेलाचा वापर केलेला असतो. आपण या पाकिटांच्या इंग्रेडीयंटसकडे आवर्जून लक्ष दिल्यास आपल्याला ते लक्षात येईल. याशिवाय ज्यांना हाय कोलेस्टेरॉलचा त्रास आहे त्यांनी नारळाचे तेल, सॉल्टेड बटर, अक्रोडाचे तेल यांसारख्या तेलांचा स्वयंपाकासाठी अजिबात वापर करु नये. या तेलांमुळे बॅड कोलेस्टेरॉल वाढून हृदयरोगाची समस्या वाढत असल्याने ते आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकते.
कोलेस्टेरॉल असणाऱ्यांनी कोणत्या तेलाचा वापर करावा?
ज्यांना हाय कोलेस्टेरॉलचा त्रास आहे अशांसाठी पाम ऑईल आणि बटर ऑईल अतिशय धोकादायक असते. अशांनी आहारात फ्लेक्स सीडचे तेल, मोहरीचे तेल, सूर्यफूलाचे तेल यांचा वापर करावा. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार आपल्या पोटात दररोज ३०० ग्रॅमहून जास्त कोलेस्टेरॉल जाणार नाही याची काळजी आपण स्वत: घ्यायला हवी. इतकेच नाही तर २० ते २५ वर्षांच्या पुढील प्रत्येक व्यक्तीने वर्षातून एकदा आपल्या शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी तपासून पाहायला हवी. त्यामुळे तुम्ही गंभीर आजारांपासून स्वत:ला दूर ठेऊ शकता.