उपवासाला फराळाच्या पदार्थांचे कितीही पर्याय उपलब्ध असले तरी सर्वात वरचा नंबर लागतो तो साबुदाणा खिचडीचाच. साबुदाणा खिचडी करायला सोपी असली तरी आपल्या मनासारखी जमली नाही तर मात्र मूड जातो. साबुदाणा खिचडी चिकट झाली, लगद्यासारखी ती चिकटून बसली की ती साबुदाणा खिचडी असली तरी तिची चव चिकट पोतामुळे अगदीच बिघडून जाते. खिचडी मऊ आणि तरीही ती चिकट न होता छान मोकळी होण्यासाठी साबुदाणा भिजत घालण्यापासून साबुदाणा परतेपर्यंत प्रत्येक गोष्ट नीट जमणं आवश्यक असतं. मऊ मोकळी साबुदाणा खिचडी करणं हे खूप अवघड नाही. त्यासाठी फक्त काही नियम पाळणं आवश्यक आहे.
Image: Google
मऊ-मोकळी साबुदाणा खिचडी कशी जमेल?
1. साबुदाणा खिचडीची पहिली पायरी म्हणजे साबुदाणा भिजत घालणं. भिजलेला साबुदाणा कोरडा आणि कडकही लागायला नको आणि तो अति भिजून पिठूळही व्हायला नको. यासाठी एक वाटी साबुदाणा हे प्रमाण घेतल्यास आधी साबुदाणा निवडून घ्यावा. मग त्यात पाणी घालून हातानं चोळून चोळून धुवावा. दोन तीन पाण्यात साबुदाणा नीट धुतला की त्यातलं सर्व पाणी काढून घ्यावं. साबुदाणा भिजताना त्यात थोडं पाणी ठेवणं आवश्यक तरच तो मऊ भिजतो. त्यामुळे एक वाटी साबुदाण्यात पाऊण वाटी पाणी घालावं. साबुदाणा झाकून ठेवावा. सहा तासानंतर साबुदाणा आपल्याला हवा तसा भिजेल. साबुदाणा किमान सहा तास आधी भिजवायला हवा.
2. एक वाटी साबुदाण्यासाठी अर्धा वाटी शेंगदाणे घ्यावेत. ते मंद आचेवर खरपूस भाजावेत. चांगले भाजले गेली की ते थंड होवू द्यावेत. मग मिक्सरवर ओबडधोबट करुन घ्यावे. शेंगदाण्याचा अगदी बारीक कूट करु नये , त्यामुळेही साबुदाण्याची खिचडी मऊ होते.
Image: Google
3. दाण्याचा ओबडधोबड कूट सहा तास भिजलेल्या साबुदाण्यात घालावा. कूटासोबतच मीठ, एक ते दोन चमचे साखर घालून ते चांगलं भिजलेल्या साबुदाण्यात मिसळून घ्यावं.
4. कढईत दोन चमचे साजूक तूप घालावं. साजूक तुपातली खिचडी चवीला छान लागते. तूप तापलं की त्यात जिरे आणि मिरच्या घालून ते परतून घ्यावं. नंतर दोन ते तीन उकडलेले बटाटे बारीक काप करुन घालावेत. बटाटे हे खूप शिजवू नये. त्याच्या व्यवस्थित फोडी करता येतील इतपत ते शिजवावेत. बटाटा घातल्यानंतर तो चांगला परतून घ्यावा. जरा लालसर व्हायला हवा.
Image: Google
5. बटाटा चांगला परतला की मग साबुदाणा-शेंगदाण्याचं मिश्रण फोडणीत घालावं. ते चांगलं परतून घ्यावं. साबुदाणा नीट परतला गेला की तो मंद आचेवर पुढचे पाच ते सात मिनिटं परतावा.
6. साबुदाणा परतला गेला की तो वाफवण्यासाठी म्हणून पुष्कळ वेळ त्यावर झाकण ठेवलं जातं. यामुळे वाफेनं साबुदाणा चिकट होतो. साबुदाणा परतला गेला तरी तो गॅसवर असताना त्यावर झाकण ठेवू नये. पाच ते सात मिनिटं खिचडी चांगली परतली गेली की त्यात अर्धा लिंबू पिळून घालावा. पुन्हा दोन ते तीन मिनिटं मंद आचेवर खिचडी परतून घ्यावी. मोठ्या आचेवर खिचडी परतली तर ती मोकळी होते, पण कडक होते, मऊ होण्यासाठी खिचडी परतताना गॅसची आच मंद हवी. सर्वात शेवटी खिचडीवर कोथिंबीर भुरभुरुन गॅस बंद करावा.
Image: Google
7. गॅस बंद केल्यानंतर खिचडी गरम असतानाच त्यावर झाकण ठेवू नये. खिचडीतली वाफ जिरली की मग त्यावर झाकण ठेवावं. साबुदाण्याची खिचडी या नियमबरहुकुम केली तर ती चिकट होणार नाही.