सकाळी उठल्यापासून केर-वारे, स्वच्छता, स्वयंपाक, आपले आवरणे, मुलांची शाळेची तयारी, नवऱ्याचा डबा आणि त्यात ऑफीसला पोहोचायची घाई. प्रत्येक स्त्रीची ही रोजची धावपळ. एकावेळी १० हातांनी काम करत असल्यासारख्या स्त्रिया सकाळच्या वेळी घरात धावत असतात. यातही स्वयंपाकाच्या मदतीला किंवा साफसफाईला बाई असेल तर ठिक नाहीतर सगळ्या गोष्टी महिलांना एकट्यानेच कराव्या लागतात. अशावेळी स्वयंपाकाच्या काही सोप्या टिप्स वापरल्या तर आपला बराच वेळ वाचू शकतो. सकाळी घाई होऊ नये म्हणून काही जण रात्रीच भाजी चिरुन ठेवणे, कणीक मळून ठेवणे अशा गोष्टी करतात पण यामध्ये भाज्यांना लागणारी ग्रेव्ही ही आणखी एक महत्त्वाची गोष्ट असते. वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रेव्ही तयार असतील तर भाजी झटपट तर होतेच पण चविष्टही होते. मुख्य म्हणजे यामुळे आपला वेळ वाचतो ते वेगळेच. पाहूयात विकेंडला ३ प्रकारच्या ग्रेव्ही (Tips to make tasty Gravy) तयार ठेवल्या तर घाईच्या वेळेला आणि एरवीही आपल्याला या ग्रेव्ही वापरता येतात (Cooking Tips).
१. खडा मसाला वाटण
खडा मसाल्याला जी चव असते ती इतर कोणत्याच गोष्टीला नसते. आपण वर्षभराचा काळा मसाला किंवा कांदा लसूण मसाला, गोडा मसाला करुन ठेवतोच. पण काही भाज्यांना किंवा नॉनव्हेज पदार्थांना ताजे खडा मसाल्याचे वाटण चांगले लागते. अशावेळी कोरडे खोबरे, धणे, जीरे, काळी मिरी, लवंग, दगडफूल, लाल मिरची, दालचिनी, तीळ अशा सगळ्या गोष्टी चांगल्या खमंग भाजून गार झाल्यावर त्या मिक्सर करुन ठेवाव्यात. कोणत्याही कोरड्या भाज्या, मसालेभात किंवा कडधान्यांची उसळ यांना हा मसाला वापरु शकतो. हा कोरडा मसाला असल्याने फ्रिजशिवाय जास्त दिवसही टिकू शकतो.
२. हिरवी खोबऱ्याची ग्रेव्ही
नेहमी लाल रंगाची ग्रेव्ही खाऊन आपल्याला कंटाळा येतो. अशावेळी चव आणि रंग अशा दोन्हीमध्ये काही बदल असेल तर आपल्याला जेवणात मजा येते. तसेच थोडे वेगळे काही केले की जेवणाची लज्जत वाढते ती वेगळीच. या ग्रेव्हीसाठी ओले खोबरे, पुदिना, कडिपत्ता, कोथिंबीर, मिरची, आलं, लसूण अशा गोष्टी एकत्र करुन त्या मिक्सर करुन एका डब्यात भरुन ठेवू शकतो. घाईच्या वेळी उसळ किंवा कोणत्याही भाजीसाठी ही ओल्या खोबऱ्याची हिरवी ग्रेव्ही छान लागते. हे सगळे पदार्थ मसाल्याचेच असले तरी त्यांना एक वेगळा स्वाद असतो. त्यामुळे ही ग्रेव्ही तयार असेल तर भाजी झटपट होते.
३. कांदा-टोमॅटो ग्रेव्ही
पनीरची भाजी असो किंवा एखादी उसळ कांदा-टोमॅटोची पारंपरिक ग्रेव्ही आपण नेहमीच वापरतो. मात्र घाईच्या वेळी कांदा - टोमॅटो चिरण्यातही बरात वेळ जातो. अशावेळी कांदा, टोमॅटो, थोडे शेंगादाणे, आलं, लसूण यांची ग्रेव्ही तयार असेल तर सकाळचा वेळ वाचतो. फ्रिजमध्ये एका हवाबंद डब्यात ही ग्रेव्ही करुन ठेवली तर ८ दिवस तर नक्की टिकते. अशा ग्रेव्हीमध्ये आपण आपल्याला आवडतील ते मसाले वापरु शकतो. पावभाजी, पनीर, नॉनव्हेज, उसळ अगदी बटाट्याच्या भाजीलाही ही ग्रेव्ही वापरता येते.