Join us  

थंडीत मस्त वाफाळते, गरमागरम मोमोज खायला आवडतात? आता घरीच करा हॉटेलसारखे परफेक्ट मोमो, सोपी रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2022 4:23 PM

Veg Momos Recipe : हेल्दी भी टेस्टी भी, कमीत कमी सामानात घरच्या घरी करता येणारे सोया मोमोज. ट्राय करुन पाहा....

ठळक मुद्देघरच्या घरी बनवा गरमागरम मोमोज, पाहा सोपी रेसिपीगाजर, कोबी, सोयाबिन, पनीर अशा पौष्टीक गोष्टी घातल्याने आरोग्यासाठीही फायदेशीर

मोमोज म्हणजे काही लोकांच्या भाषेत सांगायचे तर उकडीच्या मोदकांचे तिखट व्हर्जन. गरमागरम वाफाळते मोमोज समोर आले की त्यावर तुटून पडायला होते. गेल्या काही वर्षात हे मोमोज Veg momos प्रकरण बरेच प्रसिद्ध झाले असून मूळत: नेपाळमध्ये केला जाणारा हा पदार्थ आता आपल्याकडेही सर्रास खाल्ला जातो. अगदी झटपट होणारे आणि पोटभरीच्या असलेल्या या मोमोजचे बरेच प्रकार हॉटेलमध्ये पाहायला मिळतात. यातही एरवी तळलेले मोमोज खायला पसंती असते मात्र डाएट करणाऱ्यांसाठी वाफवलेले मोमोजही मिळतात आणि तेही तितकेच चविष्ट लागतात. भाज्या, पनीर, सोयाबिन यांसारख्या गोष्टी घातल्याने हा पदार्थ पौष्टीक असतो. त्यामुळे लहान मुलेही आवडीने खाऊ शकतात. पाहूयात घरच्या घरी झटपट कसे करता येतात सोया मोमोज... 

(Image : Google)

साहित्य - 

१. मैदा  - २ वाटी

२. सोया चंक्स - एक वाटी (मिक्सरवर बारीक केलेले) 

३. कोबी - एक वाटी (किसलेला)

४. आलं- लसूण पोस्ट - १ चमचा

५. मिरपूड - पाव चमचा 

६. मीठ - चवीनुसार

(Image : Google)

कृती -

१. पाणी घालून मैदा घट्टसर भिजवून घ्यायचा आणि १० ते १५ मिनिटांसाठी झाकून ठेवायचा.

२. सोयाबिन मिक्सरवर बारीक करुन घ्यावेत.

३. कोबी किसून त्यामध्ये मीठ घालावे, एका कापडात हा किसलेला कोबी घेऊन त्याचे पाणी गाळून घ्यावे. 

४. सोयाबिन, कोबी, आलं-लसूण पेस्ट, मीरपूड आणि चवीपुरते मीठ एकत्र करुन त्याचे मिश्रण तयार करावे.

५. मैद्याच्या पीठाचे लहान गोळे तयार करुन त्या पुरीच्या आकारात लाटून घ्याव्यात.

६. त्यामध्ये मिश्रण भरुन त्याला करंजीप्रमाणे आडवे दुमडून एकावर एक घड्या घालाव्यात. 

७. कुकरमध्ये खाली पाणी घालून त्यात एक पाण्याने भरलेली वाटी ठेवावी. त्यावर जाळीची ताटली ठेऊन कुकरचे झाकण लावून त्याला ५ मिनीटे वाफ येऊ द्यावी. 

८. वाफ आलेला कुकर उघडून या जाळीवर मोमोज ठेऊन पुन्हा कुकरचे झाकण लावून १० मिनीटे वाफ येऊ द्यावी. वाफेवर मोमोज चांगले शिजतात. 

९. तुम्हाला वाफेवरचे मोमोज नको असतील तर तुम्ही ते तेलात तळूनही खाऊ शकता. 

१०. यामध्ये सोयाबिन आणि कोबीसारख्या ढोबळी, फरसबी, फ्लॉवर यांसारख्या इतर भाज्या घातल्या तरी छान लागतात. तुम्हाला आवडत असेल तर पनीर, ऑलिव्हज, मशरुम हेही चांगले लागते.  

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.