लहानग्यांना चमचमीत आणि कुरकुरीत खाण्याची इच्छा होत राहते. काही मुलांना स्टॉल अथवा रेस्टॉरंटमधील पदार्थ खायला प्रचंड आवडतात. सध्या मुलं बर्गर आणि पिझ्झाचे शौकीन झाले आहेत. लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना बर्गर हा पदार्थ आवडतो. जर्मनीमध्ये उगम पावलेला हा पदार्थ आता प्रत्येक देशात चवीने खाल्ला जातो. बर्गरमध्ये देखील विविध प्रकार आहेत. त्यातील सोपा आणि फेमस प्रकार म्हणजे व्हेज बर्गर. भाज्यांपासून तयार टिक्की मुलं आवडीने खातात. आपण हा पदार्थ घरगुती साहित्यांचा वापर करून देखील बनवू शकता. चला तर मग या पदार्थाची कृती जाणून घेऊया.
व्हेज बर्गर बनवण्यासाठी लागणारं साहित्य
बटाटे
गाजर
हिरवे वटाणे
बर्गर बन
कॉर्नफ्लॉवर
ब्रेड क्रम्स
कांदा
काकडी
चीज स्लाईज
टोमॅटो सॉस
आमचूर पावडर
कृती
सर्वप्रथम, बटाटे, गाजर आणि मटार उकडून घ्यावेत. या भाज्या उकडून झाल्यानंतर एका बाउलमध्ये काढून घ्यावे. यानंतर बटाटे कुस्कुरून घ्या, त्यात कॉर्नफ्लॉवर, आमचूर पावडर, मीठ, आणि ब्रेड क्रम्स घालून सर्व मिश्रण एकत्र करावे.
मिश्रण मिक्स झाल्यानंतर त्याचे गोल टिक्की तयार करून घ्या. मिश्रणाचे टिक्की तयार झाल्यानंतर गरम तेलात ब्राऊन रंग येऊपर्यंत तळून घ्या. दुसरीकडे बर्गर बनवर केचअप लावून त्यावर कांदा, टोमॅटो आणि काकडीचे स्लाईज ठेवा. त्यानंतर चीज स्लाईज ठेवा, शेवटी टिक्की ठेवा. अशाप्रकारे आपले व्हेज बर्गर खाण्यासाठी रेडी.