विकेंड जवळ आला की, आपल्या जिभेचे चोचले सुरु होतात. काहीतरी चमचमीत खाण्याची प्रचंड इच्छा होते. आठवड्यातील ७ दिवसातून एकदा तरी आपल्या घरात भेंडीची भाजी ही बनतेच. भरली भेंडी अथवा भेंडीच्या बारीक गोल - गोल चक्त्यांना फोडणी दिलेली भाजी आपण खाल्लीच असेल. भेंडीची भाजी प्रत्येकाला आवडते. मात्र, अनेकवेळा तिच तिच भाजी खाऊन कंटाळा येतोच. आपल्याला देखील भेंडीची भाजी खाऊन कंटाळा आले असेल तर, त्या भेंडीला कुरकुरीत ट्विस्ट द्या.
भेंडीचे फायदे अनेक आहेत. त्यात असलेल्या फोलेट, फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि लोह असल्यानं त्याचं सेवन करणं हे आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जातं. त्यामुळे ज्यांना भेंडी आवडत नाही त्यांनी आठवड्यातून एकदा तरी ही रेसिपी बनवून खावी. ही रेसिपी सायंकाळच्या चहासोबत अथवा कॉफी, थंड पेयसोबत खाण्याचा आनंद आपण लुटू शकता. हि कुरकुरीत भेंडी खाण्यासाठी क्रिस्पी तर असतेच पण त्याचबरोबर तिची चव देखील अप्रतिम लागते. चला तर मग या क्रिस्पी पदार्थाची कृती पाहूयात.
कुरकुरीत भेंडी ही रेसिपी बनवण्यासाठी लागणारं साहित्य
कोवळी भेंडी
बेसन
जिरं पावडर
लाल तिखट
चाट मसाला
हळद
लिंबाचा रस
मीठ
तेल
कृती
कुरकुरीत भेंडी बनवण्यासाठी सर्वप्रथम, कोवळ्या भेंडीचे बारीक उभे काप करून घ्या. हे भेंडीचे काप एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घ्या. त्यानंतर त्यात बेसन, जिरं पावडर, लाल तिखट पावडर, चाट मसाला, आणि हळद टाकून संपूर्ण मिश्रण मिक्स करा. मिश्रण मिक्स झाल्यानंतर आंबट चवीसाठी लिंबाचा रस टाका. आणि शेवटी चवीनुसार मीठ टाकून संपूर्ण मिश्रण हाताने मिक्स करा.
दुसरीकडे एका कढईत तेल गरम करत ठेवा. तेल गरम झाल्यानंतर त्वरित भेंडी फ्राय करून घ्या. भेंडी फ्राय झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढा. त्यावर चाट मसाला टाकून ही रेसिपी सर्व्ह करू शकता. हिवाळ्यात सायंकाळच्या चहासोबत ही रेसिपी अप्रतिम लागेल.