आहारात कोशिंबीरी किंवा सॅलेडचं महत्व आहेच. त्यात आता नव्या वेटलॉसकाळात (Weight Loss) तर नियमित
कोशिंबिरी, सॅलेड खाण्यावर अनेकांचा भर असतो. आपलं जेवण चारीठाव असावं त्यात चटणी, लोणचं आणि कोशिंबीर जोवर डावी बाजू सजवत नाहीत तोवर काही आहार पूर्ण होत नाही. मात्र त्याच त्या चवीच्या कोशिंबिरी खाऊन कंटाळा
येतो, त्यात अनेकदा घाई असते, जास्त तामझाम करता येत नाही. चवही वेगळी हवी असते. आणि सॅलेड खाण्यासोबत काहीतरी छान क्रंचीही असावे असेही वाटते. त्यावर उपाय म्हणून करुन पहा. क्रंची मुगडाळ कोशिंबीर.
साहित्य
एक छोटी वाटी. गाजर, बीट, काकडी, कांदा, पत्ताकोबी, चवीनुसार मीठ, मेयोनीज. G2 चे छोटे मुगडाळ सॅशे, एखादा उडीद पापड भाजून.
कृती
- यासाठी सगळ्यात आधी गाजर, बीट, काकडी, कांदा, पत्ताकोबी, मिरची आवडीनुसार या सगळ्या भाज्या अगदी लहान- लहान चौकोनी आकारात चिरुन घ्या. सरळ किसून घेतल्या जाड किसणीने तरी चालतील. मात्र चिरुन आणि किसून या चवीतही फरक असतो. तुम्हाला आवडेल तो पर्याय निवडा. आवडीनुसार तुम्ही कोणत्या भाज्या यात घ्यायचा किंवा नाही घ्यायच्या हे ठरवू शकता. कमीजास्त करु शकता.
-आता सगळ्या भाज्या चिरून/किसून एका वाडग्यात घ्या. मिरची तिखट आवडेल तशी बारीक
चिरुन घाला. भाज्यांच्या प्रमाणानुसार त्यात मीठ घाला, चवीला साखर हवीच.
- ही रेसिपी आपल्याला क्रंची पाहिजे आहे. त्यामुळे जेव्हा अगदी ताटात वाढून घेणार असाल
त्यावेळी या भाज्यांमध्ये मुगडाळ आणि मेयोनीज टाका, भाजलेला पापड चुरुन टाका. आणि सगळे
मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या.
- मस्त क्रंची आणि चटकदार सॅलड खाण्याचा आनंद घ्या..
- तुमच्या मेनकोर्सचे पदार्थ कोणतेही असले तरी अगदी सगळ्या पदार्थांसोबत हा क्रंची पदार्थ नक्कीच
मॅच होऊन जातो आणि जेवणात रंगत आणतो.
मुगडाळ आणि मेयोनीज खूप आधीपासून टाकून ठेवलं तर भाज्या आणि मेयोनीजचा ओलावा
यामुळे मुगडाळ मऊ पडू शकते. मेयोनीज नको असल्यास किंवा आवडत नसल्यास त्याऐवजी लिंबू पिळावे. दही घातले तरी चालते. करुन पहा ही क्रंची मुगडाळ कोशिंबीर.