Join us  

भेळेला द्या चायनीजचा तडका! खाऊन पाहा चमचमीत नूडल्स भेळ, सोपी कृती आणि चटकदार पदार्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2023 7:35 PM

Crispy Noodles Bhel Recipe : चायनिज भेळ घरी करणं अवघड वाटतं, मग ही नूडल्स भेळ करुन पाहा

भेळ ही एक चटकदार स्नॅक्स रेसिपी आहे. संध्याकाळच्या स्नॅक्सच्या वेळी आपल्याला भूक लागली तर आपण चाट प्रकारातील भेळ, शेवपुरी, रगडा पॅटिस यांसारखे पदार्थ आवडीने खातो. भेळ ही तशी अतिशय सोपी रेसिपी आहे. किमान १५ ते २० मिनिटात भेळ बनून तयार होते. भेळ ही महाराष्ट्रासोबतच संपूर्ण भारतभर मिळणारी एक लोकप्रिय डिश आहे. भेळ बनविण्यासाठी कुरमुरे, फरसाण, बारीक शेव, बारीक चिरलेला टोमॅटो, कांदा, गोड तिखट खजुराची चटणी, हिरव्या मिरचीची चटणी असे सगळे जिन्नस एकत्रित करून भेळ तयार केली जाते. परंतु आता बदलत्या काळानुसार भेळ तयार करण्याच्या विविध पद्धती आहेत. आपण कच्च्या नूडल्स पासून चटकदार चायनीज तडका देऊन चायनीज भेळ तयार करू शकतो. आजकाल सगळ्याच ठेल्यांवर ही चायनीज भेळ सहज मिळते. आपण घरच्या घरी झटपट, चटकदार चायनीज भेळ बनवू शकतो(Crispy Noodles Bhel Recipe). 

साहित्य :- 

१. कच्चे नूडल्स - १ पाकीट २. मॅग्गी नूडल्स मसाला - १ टेबलस्पून ३. कांदा - १/४ कप (उभा चिरून घेतलेला)४. चेरी टोमॅटो किंवा साधे टोमॅटो - १/४ कप (बारीक चिरून घेतलेला)५. कोथिंबीर - १ टेबलस्पून (बारीक चिरून घेतलेली)६. चाट मसाला - १ टेबलस्पून ७. तेल किंवा बटर - २ टेबलस्पून ८. टोमॅटो केचप - २ टेबलस्पून९. लिंबाचा रस - १ टेबलस्पून  

कृती :- 

१. सर्वप्रथम एका डिशमध्ये २ टेबलस्पून तेल किंवा वितळलेले बटर घेऊन त्यात कच्च्या नूडल्सचे छोटे - छोटे तुकडे करून घालावेत. २. एका बाऊलमध्ये टोमॅटो केचप घेऊन त्यात मॅग्गी मसाला, चाट मसाला घालून ते सगळे एकजीव करून घ्यावे. ३. आता या केचप आणि मसाल्यांच्या मिश्रणात तेलात सॉते करून घेतलेलं नूडल्स घालावेत. ४. त्यानंतर उभा चिरून घेतलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो व लिंबाचा रस घालून घ्यावा. तयार झालेली भेळ चमच्याने ढवळून एकजीव करून घ्यावी.  ५. सर्व्हिंग बाऊलमध्ये भेळ सर्व्ह करून त्यावरून थोडीशी कोथिंबीर भुरभुरावी. 

चटपटीत क्रिस्पी नूडल्स भेळ खाण्यासाठी तयार आहे.

टॅग्स :अन्नपाककृती