हिवाळ्यात भरपूर प्रमाणावर हिरव्या भाज्या मिळतात. जे आपल्या शरीरासाठी खूप किफायतशीर आहे. मेथी, शेपू, पालक अशा विविध प्रकारच्या हिरव्या भाज्या प्रत्येकाने खाल्ल्या पाहिजे. पालकपासून आपण विविध पदार्थ बनवतो. पालक खाल्ल्यामुळे शरीराला कॅलरी कमी प्रमाणात आणि फायबर जास्त प्रमाणात मिळतात. यामुळे तुम्हाला वजन कमी करण्यास मदत होते. पालकपासून आपण पालक पनीर, पालक भाजी, पालक भजी बनवतो. मात्र, पालक भजी खाण्यास अधिकतर लोकं टाळतात. कारण डीप फ्राय भजी खाल्ल्याने शरीरात बऱ्याच प्रमाणावर कोलेस्टेरॉल वाढते. त्यामुळे आज आपण बिना तेलाचे पालक भजी बनवणार आहोत. जी चवीला उत्तम आणि कुरकुरीत लागते. आणि आरोग्यासाठी देखील चांगली आहे.
पालक भजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य
पालक
बारीक चिरलेला कांदा
मीठ
बेसन
तीळ
जिरं
गरम मसाला
बडीशेप
धणे पावडर
तिखट पावडर
बारीक चिरलेली हिरवी मिरची
बेकिंग सोडा
तांदळाचं पीठ
पाणी
कृती
सर्वप्रथम पालकाचे पाने चांगले पाण्यात धुवून घ्या. आणि बारीक चिरून घ्या. यासह बारीक कांदा देखील चिरून घ्या. यानंतर एका बाऊलमध्ये बेसन घ्या, त्यात तीळ, जिरं, गरम मसाला, बडीशेप, धणे पावडर, तिखट पावडर, बारीक चिरलेली हिरवी मिरची, एक मोठा चमचा तांदळाचं पीठ टाका. आणि हे मिश्रण चांगले मिक्स करून घ्या.
आता त्यात बारीक चिरलेला पालक आणि कांदा टाकून पुन्हा मिक्स करा. त्यांनतर या मिश्रणात पाणी टाका, आणि मिश्रण चांगले मिक्स करा. शेवटी अर्धा छोटा चमचा बेकिंग सोडा टाका संपूर्ण मिश्रण मिक्स करा. या मिश्रणावर झाकण ठेवा, आणि बाजूला ठेवून द्या.
कढई न घेता अप्पेचं पात्र घ्या. गरम करण्यासाठी गॅसवर ठेऊन द्या. त्यात एका ब्रशने थोडे तेल पसरवा, जेणेकरून मिश्रण चिकटणार नाही. आता त्यात पालक आणि बेसनाचे मिश्रण टाका. आणि त्यावर झाकण ठेऊन द्या. थोड्या वेळा नंतर दुसरी बाजू देखील गोल्डन ब्राऊन रंग येऊपर्यंत भाजून घ्या. अशा प्रकारे कुरकुरीत पालक भजी खाण्यास रेडी आहे. आवडत्या चटणीसह आपण या भजीचा आस्वाद घेऊ शकता.