नवीन वर्ष सुरु होवून केवळ पाच दिवसच झाले आहेत. या पाच दिवसात फिटनेस आणि डाएटचे 'उद्यापासून नक्की' या टाइपचे संकल्प करुन झाले असतील. अर्थात या संकल्पांना मुहूर्त कधी लागेल हे कोणीच कोणाला विचारायचं नसतं. काहींना तर फिटनेस रुल, डाएटचे नियम पाळणं ही आपल्या आवाक्यातील गोष्टच वाटत नाही, हे असे रुल करीना, मलायका, दीपिका, कतरिनासारख्या अभिनेत्रींनाच जमतं. करीना कपूरने तर डाएटचे नियम पाळून झिरो फिगर करुन दाखवली होती. डाएटच्या बाबतीत शिस्तशीर असलेल्या करिना कपूरने मात्र 2022च्या पहिल्याच महिन्यातील पहिल्याच सोमवारी ( हा दिवस यासाठी खास कारण बहुतांशजण केलेला संकल्प अमलात आणण्यासाठी याच दिवसाचा मुहुर्त शोधतात) डाएट नियम मोडला. 'मी डाएट रुल तोडला पण जाऊ दे' म्हणत करीनानं पोस्ट शेअर केली. क्रोसाँ ब्रेडसाठी डाएट रुलला सुट्टी देणारी करीना पोस्टमधे शेवटी म्हणते , 'तेच करा, जे आपलं मन सांगेल!'
करीनानं डाएट रुल मोडल्याचं स्वत:हून सोशल मीडियावर जाहीर केलं . पण डाएटचा रुल मोडण्याचं दु:खं तिच्या चेहऱ्यावर अजिबात दिसत नाही. उलट क्रोसाँ ब्रेड खाण्याची एक्साइटमेंट तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसते. तिची ही पोस्ट वाचून एका ब्रेडच्या प्रकारासाठी करीनानं आपला डाएट रुल मोडला याबाबत आश्चर्य व्यक्त केलं गेलं. आहे तो क्रोसाँ ब्रेड नेमका काय आहे याची उत्सुकता वाचणाऱ्यांमधेही निर्माण झाली.
Image: Google
क्रोसाँ काय आहे?
क्रोसाँ ब्रेड म्हणून ओळखलं जात असला तरी हा पेस्ट्रीचा प्रकार आहे. तसेच क्रोईसेन हे माॅर्डन फूड नसून तो 13 व्या शतकातला आहे. ऑस्ट्रिया या देशात या क्रोईसेन आधी बनवला गेला. क्रोसाँचं वैशिष्ट्य म्हणजे भरपूर पदरांचा, नागमोडी आकाराचा, तोंडात टाकताच विरघळणारा खुसखुशीत पदार्थ. अशा वैशिष्ट्यांचा क्रोसाँ हा जगभरात प्रसिध्द व्हायला वेळ लागला नाही. ऑस्ट्रियात तयार केलेला हा पदार्थ पुढे पूर्व युरोपात आहारातला मुख्य पदार्थ झाला. क्रोसाँच्या चवीचं वर्णन प्रामुख्याने बटरी असं केलं गेलं. या पदार्थाचं वैशिष्ट्य म्हणजे यात बटर भरपूर वापरलं जातं. भरपूर म्हणजे किती तर एका क्रोसाँ पीसचं जेवढं वजन असतं त्याच्या 60 टक्के वजन हे केवळ बटरचं असतं इतकं बटर क्रोसाँमधे वापरलं जातं.
Image: Google
जगभरात क्रोसाँ हा त्याच्या खास वैशिष्ट्यांमुळे स्वीकारला गेला आणि तो लोकप्रियही झाला. फक्त प्रत्येक देशाने क्रोसाँ स्वत:च्या देशात तयार करताना त्यात आपल्या देशाच्या चवीच्या वैशिष्ट्यानुसार थोडे बदल केलेत. पण क्रोसाँचे आकार, पोत, बटरचं प्रमाण हे मूळ वैशिष्ट्य मात्र तेच राहिले. अर्जेंटिनाने क्रोसाँ अर्ध चंद्रकोर आकारात बनवला आणि त्यात लिंबाचा स्वाद समाविष्ट केला.
13 व्या शतकात तयार केला गेलेला क्रोसाँच्या स्वरुपात 18 व्या शतकात बराच बदल झाला. सुरुवातील केवळ गोड , बटरी आणि फिक्या चवीत मिळणारा क्रोसाँ विविध चवींमधे उपलब्ध झाला. तसेच भरलेल्या सॅण्डविचप्रमाणे क्रोसाँमधेही विविध चवींची, भाज्यांच्या मसालेदार मिश्रणांची सारणं भरली गेलीत. पण सारण भरलं म्हणून क्रोसाँच्या खुसखुशीतपणात कुठेही उणेपणा आला नाही हे विशेष. जगभरात चहा -काॅफीसोबत क्रोसाँचा आस्वाद घेतला जातो.
Image: Google
क्रोसाँचं मूळ कुठे याबाबत ऑस्ट्रिया की फ्रान्स असा वाद अजूनही घातला जातो. पण आज फ्रान्समधे जेवढे म्हणून क्रोसाँचे प्रकार आहेत ते इतर देशात कुठेही नाही. फ्रान्समधे आज क्रोसाँचे आल्मंड पेस्ट क्रोईसेन, ॲप्रिकाॅट फिल, बटर क्रोसाँ, चीज फिल क्रोईसेन, चाॅकलेट फिल क्रोसाँ यासोबतच आणखी काही प्रकार फ्रान्समधे बनवले जातात.
Image: Google
आज जगभरात क्रोसाँ पम्पकिन पल्प, ब्ल्यूबेरी चीज केक, पीनट बटर जेली, व्हॅनीला क्रोसाँ, कस्टर्ड क्रीम फिलिंग, रासबेरी ॲण्ड आल्मंड, स्ट्राॅबेरी शाॅर्ट केक, साॅल्टेड कॅरेमल क्रीम, माचा या विविध चवीत आणि स्टफिंगमधे मिळतो. क्रोसाँ नुसता बटरी असू देत , चाॅकलेट फिलींग किंवा भाज्यांच्या मसालेदार सारणांचा.. कोणत्याही चवीत क्रोसाँ खाण्यास लोकं तयार असतात.
क्रोसाँबद्दल हे वाचलं की कोणालाही हे सहज कळेल की करीनानं क्रोसाँसाठी आपला डाएट रुल का मोडला ते!