आपला आहार विहार यावर आपलं आरोग्य अवलंबून असतं, हे खरं असलं तरी इतर अनेक गोष्टी आहेत ज्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. त्यात स्वयंपाकघरातली स्वच्छता ही आपल्या आरोग्याशी निगडित आहे. भांडीकुंडी,वेगवेगळी यंत्रं-साधनं ही स्वयंपाकघरातली महत्त्वाची अंगं असतात. ही साधन केवळ वापरण्यासाठी नसतात तर ती नीट जपावी लागतात, त्यांची स्वच्छता राखणं महत्त्वाचं आहे. ती जर राखली गेली नाही तर स्वयंपाकघर हे आजारांच्या संसर्गाचं माध्यम बनतं. फ्रिज हा स्वयंपाकघरातला अविभाज्य भाग झाला आहे. अन्न पदार्थ, भाज्या, दूध, दुधाचे पदार्थ ताजे ठेवण्यासाठी फ्रिज हा लागतोच. पण अनेक घरात फ्रिज केवळ वापरला जातो. त्याच्या स्वच्छतेची काळजी घेतली जात नाही. महिनोनमहिने फ्रिज स्वच्छ केला जात नाही. यामुळे फ्रिज तर खराब होतोच पण त्यात ठेवलेल्या अन्नपदार्थांवरही फ्रिजच्या अस्वच्छतेचा परिणाम होतोच.
फ्रिज वेळेच्या वेळी स्वच्छ करणं, तो नीट आवरलेला असणं, त्यातले पदार्थांची स्थिती बघणं या बाबी फ्रिजची काळजी घेण्यासाठी महत्त्वाच्या असतात. फ्रीज स्वच्छ करण्याचंही तंत्र आहे ते नीट माहिती करुन घेतल्यास आपला फ्रिज कायम स्वच्छ आणि फ्रेश राहील.
छायाचित्र- गुगल
फ्रिज स्वच्छ करताना
1. फ्रिज आवरणं हे कंटाळवाणं काम वाटतं. त्यामुळे फ्रिजमधल्या वस्तू थोड्याशा बाजूला सरकवून फ्रिज पुसण्याची पध्दत आहे. पण ती चुकीची आहे. फ्रिज आतून स्वच्छ करताना फ्रिजमधील सर्व भाज्या, फळं आणि इतर वस्तू बाहेर काढून ठेवायला हव्यात.
2. फ्रिज जर जुन्या पध्दतीचा असेल तर तो आधी डिफ्रॉस्ट करुन घ्यावा. फ्रिजरमधलं पाणी , फ्रिजमधे सांडलेलं पाणी कोरड्या कापडानं पुसून घ्यावं.
3. फ्रिजमधे दुर्गंधी येत असल्यास फ्रीज पुसताना पाण्यात एक चमचा बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस घालावा. या मिर्शणानं फ्रिज पुसल्यास फ्रिजमधील दुर्गंधी जाते.
4. फ्रिजच्या ट्रेवर चिकट डाग पडलेले असतील तर एका भांड्यात थोडं गरम पाणी घ्यावं. त्यात मीठ घालून कपड्यानं फ्रीज स्वच्च करावा. यामुळे फ्रिजमधील सर्व डाग स्वच्छ होतात.
5. फ्रिज पुसल्यानंतर तो काहीवेळ उघडा ठेवावा. नंतर त्यात सामान ठेवून मग तो सुरु करावा.
छायाचित्र- गुगल
6. फ्रिजमधले आइस ट्रे, दूधाच्या पिशव्या ठेवण्यासाठीचे , भाज्या फळांचे ट्रे हे साबणाच्या पाण्यानं धुवून स्वच्छ करावे. हे ट्रे नीट पुसून मग त्यात भाज्या फळं ठेवावीत
7. फ्रिजमधे खूप दिवस पडून राहिलेले पदार्थ काढून टाकावेत. यामुळे फ्रिजला घाणेरडा वास येतो.
8. फ्रिजची स्वच्छता राखायची असल्यास आपल्या नेहेमीच्या सवयींकडेही लक्ष द्यावं. फ्रीजमधे कोणतेही अन्नपदार्थ ठेवताना ते व्यवस्थित झाकून ठेवावेत. पदार्थ उघडे ठेवल्यास फ्रिजला वास लागतो.
9. फ्रिज स्वच्छ करताना फ्रिजमधील चिकट डाग जाणं, फ्रिजमधून वास येत असल्यास तो निघून जाणं गरजेचं असतं. डाग आणि वास दोन्ही जाण्यासाठी फ्रिज स्वच्छ करताना गरम पाणी, बेकिंग सोडा, लिक्विड सोप आणि व्हाइट व्हिनेगर यांचं मिश्रण वापरावं. हे मिर्शण एका स्प्रे बॉटलमधे टाकून फ्रिज स्वच्छ करावा.
10. फ्रिजमधून वास येत असल्यास पाण्यात व्हाइट व्हिनेगर घालून फ्रिज पुसावा. तसेच फ्रिजमधून वास येवू नये आणि फ्रिज कायम फ्रेश राहावा यासाठी एका छोट्या वाटीत व्हाइट व्हिनेगर घालून ती वाटी तशीच फ्रिजमधे ठेवून द्यावी. यामुळे फ्रिजमधला वास उडून जातो.