चाट म्हणजे स्ट्रीट फूड. चाट खायचं तर बाहेर गाड्यावरच खायला हवं. पण असं बाहेरचं चाट चविष्ट असतं पण पौष्टिक नसतं. त्यासाठी चाटचे प्रकार घरी करायला हवेत. अशा पौष्टिक आणि चटपटीत चाटचे अनेक प्रकार आहेत. त्यातलाच एक म्हणजे काकडी हरभऱ्याचा बोट (cucumber boat chat) चाट. हा चाटचा प्रकार केवळ चविष्टच नाही तर पौष्टिक (healthy chat) देखील आहे. काकडी ही पचनासाठी उत्तम असून हरभऱ्यामुळे शरीरास आवश्यक प्रथिनंही मिळतात. काकडी हरभऱ्याच्या चटपटीत चाटमुळे जिभेची चवीची हौस तर होतेच पण शरीराची पौष्टिकतेची गरजही भागते.
Image: Google
काकडी हरभऱ्याचं बोट चाट कसं तयार करावं?
काकडी हरभऱ्याचं बोट चाट तयार करण्यासाठी काकडी, टमाटा, कांदा, डाळिंबं, उकडलेला बटाटा, उकडलेले हरभरे, हिरवी मिरची, चिरलेली कोथिंबीर, मीठ, लिंबाचा रस, चाट मसाला, सैंधव मीठ, पुदिन्याची हिरवी चटणी, लाल तिखट आणि शेव एवढी सामग्री घ्यावी.
काकडी हरभऱ्याचं बोट चाट तयार करताना आधी काकडी धुवून घ्यावी. काकडी उभी चिरावी. चमच्याच्या सहाय्यानं काकडीतल्या बिया काढून टाकाव्यात. उकडलेला बटाटा, कांदा आणि टमाटा बारीक कापून घ्यावा. डाळिंबाचे दाणे सोलून घ्यावेत. भिजवलेले हरभरे, थोडी हळद, मीठ टाकून उकडून घ्यावेत.
Image: Google
एका भांड्यात उकडलेले हरभरे, बारीक चिरलेले बटाटा, टमाटा आणि कांदा एकत्र करुन घ्यावा. त्यात चिरलेली कोथिंबीर आणि हिरवी मिरची घालावी. सर्व सामग्री नीट एकत्र करुन घ्यावी. एकत्र केलेल्या सामग्रीत पुदिन्याची हिरवी चटणी, मीठ, सैंधव मीठ, साधं मीठ, चाट मसाला आणि लाल तिखट घालावं. हे सर्व एकत्र करुन या मिश्रणात डाळिंबाचे दाणे घालावेत. पुन्हा सर्व मिश्रण नीट एकत्र करुन घ्यावं. बिया काढलेल्या काकडीत हे मिश्रण उभं पसरून भरावं. सर्वात शेवटी यावर बारीक शेव भुरभुरुन घालावी. काकडी हरभऱ्याचं बोट चाट हे संध्याकाळी स्नॅक्स म्हणून खाण्यास चटपटीत लागतं. पण सकाळी वेगळा आणि पौष्टिक नाश्ता हवा असल्यास काकडी हरभऱ्याचं हे बोट चाट नक्की करुन पाहा!