बर्याचदा डाळ जास्त होते आणि उरुन राहाते. अशी उरलेली डाळ दुसर्या दिवशी खाण्याचा सगळ्यांनाच कंटाळा येतो आणि डाळ वाया जाते. मुळातच डाळीचे वरण, आमटी या पौष्टिक असतात. ते उरले तरी त्या वाया जात नाही. ते आणखी पौष्टिक आणि चविष्ट करुन खाण्याचा पर्याय आहे.
वरण किंवा आमटी जास्त झाल्यास दुसर्या दिवशी सकाळी त्याचे चविष्ट आणि पौष्टिक पराठे तयार करावेत. हे पराठे इतके खमंग होतात की डाळींना नाक मुरडणारेही ते आवडीने खातात. उरलेल्या वरणाचे पराठे करणं अगदी सोपं आहे.
उरलेल्या वरणाचे पराठे. वरणाचे अर्थात डाळ पराठे करण्यासाठी दोन कप गव्हाची कणीक ( उरलेली डाळ किती आहे ते बघून कणकेचं प्रमाण ठरवावं), 1 वाटी उरलेलं वरण, 3 मोठे चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर, 3-4 मोठे चमचे तेल, चवीनुसार मीठ, अर्धा छोटा चमचा जिरे, अर्धा चमचा गरम मसाला आणि 2 बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या एवढं जिन्नस घ्यावं.
पराठे करताना कणीक घ्यावी. कणकेत गोलाकार जागा करुन त्यात उरलेलं वरण घालावं. त्यानंतर वर सांगितलेले सर्व मसाले आणि एक छोटा चमचा तेल घालावं. पीठ चांगलं मऊसर मळून घ्यावं. जर पीठ थोडं कोरडं/घट्ट वाटलं तर त्याल 1-2 मोठे चमचे पानी घालावं. पीठ मळून झाल्यावर ते 15-20 मिनिटं झाकून ठेवावं. त्यामुळे पीठ चांगलं मुरतं. पीठ मुरलं की पराठे करताना हातावर थोडं तेल घेऊन पीठ आणखी मऊ मळून घ्यावं. आणि आपल्या आवडीच्या आकाराचे गोल, त्रिकोणी, चौकोनी पराठे करुन घ्यावेत.
पराठे हळुवार लाटावेत आणि थोडे जाडसर ठेवावेत. तूप लावून ते मध्यम आचेवर भाजावेत. असे हे उरलेल्या वरणाचे मसालेदार पराठी दही , सॉस किंवा लोणचं यासोबत खूप छान लागतात.