भाजी-पोळी, वरण-भात हे आपल्या आहारातले मुख्य पदार्थ. रोज वेगळ्या भाजीमुळे भाजी पोळी खायला कंटाळा येत नाही. पण वरण भात मात्र त्याच त्याच चवीचा रोज खायला कंटाळा येतो. अनेक घरांमधे सकाळी जेवायला भाजी-पोळी आणि रात्रीच्या जेवणात मुख्यत: वरण भात असतो. पण त्याच त्याच चवीचा डाळ भात नकोसा होतो आणि रात्रीचं जेवण अनिच्छेनं केलं जातं. डाळ, भात उरुन राहातो. पोट नीट भरत नाही. त्याचा परिणाम म्हणजे दुसर्या दिवशी सकाळी उठल्यावर उत्साही वाटत नाही.
छायाचित्र- गुगल
डाळ भात हा जेवणातला एक मुख्य पदार्थ. पण तो एकाच चवीचा आणि एकाच पध्दतीचा करायचा हा काही नियम नाही. वेगवेगळ्या पध्दतीच्या डाळी , आमटी करायचा अनेकींना कंटाळा येतो तर अनेकींकडे तसा वेळच नसतो. पण या दोन्ही गोष्टींचा विचार करता रोजचाच वरण भात रांधतांना काही युक्त्या केल्या तर रोजचा डाळ भात नक्कीच वेगळा लागेल. आणि अशा युक्त्यांसाठी पाच मिनिटापेक्षा जास्त वेळ आणि खूपशी सामग्री लागत नाही हे नक्की.
1. डाळीत लसूण डाळ शिजल्यानंतर तडक्याच्या स्वरुपात वापरला जातो. पण लसणाचा स्वाद डाळीत उतरला तर डाळीची चव एकदम छान लागते. यासाठी कोणतीही डाळ वरणासाठी शिजवताना ती धुतल्यानंतर त्यात लसणाच्या पाकळ्या, एक कापलेली हिरवी मिरची आणि थोडा हिंग घालावा. डाळ शिजायला लावतानाच त्यात हळद आणि मीठ घालावं. डाळ शिजल्यानंतर ती चांगली घोटून, आवश्यक तेवढं पाणी घालून उकळावी यामुळे डाळीला लसणाचा आणि हिंगाचा छान स्वाद येतो. आणि या डाळीला वरुन तडका घालण्याची गरज पडत नाही. फक्त डाळ उकळली की त्यात एक ते दोन चमचे साजूक तूप घालावं. अशी डाळ रोजच खावीशी वाटेल.
2. डाळ शिजताना त्यात टमाटा, मिरची थोडा कांदा चिरुन घालावा. लसणाच्या पाकळ्या आणि थोडं आलं किसून घालावं. डाळ शिजल्यानंतर डाळ घोटून आवश्यक तेवढं पाणी आणि मीठ घालावं. डाळ उकळायला ठेवावी. आणि दुसर्या बाजूला कढईत तेल किंवा तूप जे आवडेल ते घेऊन त्यात जिरे, अख्खी लाल मिरची, कढीपत्ता, हिंग आणि हळद याची फोडणी करुन डाळ उकळत असतानाच डाळीला हा तडका द्यावा.
छायाचित्र- गुगल
3. एकाच प्रकारची डाळ न घेता थोडी तूर, मूग, लाल मसूर, हरभरा, काळी उडीद डाळ एकत्र शिजवावी. डाळ शिजल्यावर ती घोटून आवश्यक तेवढं त्यात पाणी घालावं. तूप किंवा तेल तापवून त्यात जिरे, आलं लसणाची पेस्ट, कढीपत्ता, हळद, हिंग , चवीपुरतं तिखट घालावं. डाळीला उकळी आली की त्यात थोडं लिंबू पिळावं. ही अशी मिश्र डाळ चविष्टही लागते आणि पौष्टिकही होते.
4. रोज एकाच प्रकारचा तडका न देता वेगवेगळ्या पध्दतीने डाळीला तडका दिल्यास डाळीची चव बदलते. कधी डाळीला तुपाच्या तर कधी तेलाच्या फोडणीचा तडका द्यावा. तडक्यातली सामग्रीही अदलून बदलून घ्यावी. कधी नुसत्या जिर्याचा तडका द्यावा, कधी केवळ मोहरी घालावी, कधी नुसता कढीपत्ता , कधी केवळ सुक्या लाल मिरचीचा तर कधी शेवग्याच्या शेंगातल्या बियांचा तडका द्यावा. तडक्यासाठी शेवग्याच्या शेंगातल्या बिया वापरणार असल्यास तडक्यासाठी तूप न वापरता तेल वापरावं.बाकीच्या सामग्रीसाठी तूप चालतं.
5. कोणतीही डाळ घ्यावी. ती शिजवताना त्यात मेथी किंवा पालक चिरुन घालावा. आवडत असल्यास टमाटा चिरुन घालावा, त्यातच लसूण, हिरवी मिरची, किसलेलं आलं शिजवावं. शिजल्यानंतर डाळ घोटून घ्यावी. आवश्यक तेवढं पाणी आणि मीठ घालावं. डाळ उकळायला ठेवावी. छोट्या कढईत तेल तापवून मोहरी, जिरे, हिंग, हळद आणि अख्ख्या लाल मिरचीचा तडका करुन तो उकळत्या डाळीवर घालावा. अशी डाळ एकदम चविष्ट लागते.
छायाचित्र- गुगल
6. साध्या भातालाही वेगळी चव आणता येते. यासाठी तांदूळ धुवून घ्यावे. कुकरमधे थोडं तूप घालावं. तूप तापलं की दोन लवंगा घालाव्यात. आणि त्यावर धुतलेले तांदूळ घालून ते एक मिनिट परतून घ्यावेत. आणि नंतर एरवी भात लावताना जसं पाणी आणि मीठ घालतो त्याप्रमाणे घालून भात करुन घ्यावा. यामुळे भात लवकर शिजतोच शिवाय भाताला छान स्वादही येतो.
7 . डाळ भात आणखी वेगळ्या पध्दतीने एकत्रही करता येतो. यासाठी तांदळाचं प्रमाण जास्त आणि डाळीचं प्रमाण कमी घ्यावं. शक्यतो या प्रकारासाठी तुरीची डाळ घ्यावी. तांदूळ आणि डाळ एकत्र करुन धुवून घ्यावे. पाणी आणि चवीपुरतं मीठ घालून ते शिजवून घ्यावेत. कुकरची वाफ गेल्यानंतर एका कढईत तूप गरम करावं. त्यात मोहरी , जिरे, हिंग, सुकी लाल मिरची घालून हा तडका गरम डाळ भातावर घालावा. डाळ भात छान हलवून घ्यावा. वरुन कोथिंबीर पेरावी. असा भात वरुन आणखी थोडं तूप घालून खाल्ल्यास छान लागतो.