Join us  

दहीपोह्यांचा नैवैद्य गणपतीला दाखवला, प्रसाद म्हणून खाल्ला; दहीपोह्यांना आजीपणजीच्या आठवणींचीही चव कारण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2022 2:11 PM

दहीपोह्यांचा नैवेद्य गणपतीला दाखवत निरोप घेतला जातो, पण या दही पोह्यांना परंपरेत मोठं स्थान आहे. (Dahi Pohe)

ठळक मुद्देपोहे नैवेद्यात असतात हा मान खरं त्यांचा आणि आपल्या रोजच्या जगण्यात त्यांना असलेल्या स्थानाचाही!

गणपतीचा निरोप घेताना नैवेद्य म्हणून दहीभात-दहीपोहे करतात. अनेक घरी संपूर्ण जेवणासह निरोपाच्या आरतीला दहीपोहेच करायची पद्धत आहे. काही ठिकाणी दहीसााखर पोहे करतात तर काही ठिकाणी मिरची-मीठसाखर, आलं कोथिंबीर, तूपाची फोडणी घालूनही दही पोहे करतात. आपल्या परंपरेत पोह्यांना स्थान मोठं. अगदी सुदाम्याच्या पोह्यांपासून ते दिवाळीत कोकणात अनेकप्रकारचे पोहे करतात. पोह्याचा चिवडा तर असतोच. आणि चहापोह्यांचा कार्यक्रमही कांदयापोह्यांशिवाय होतच नाही. त्यामुळे आपल्या आवडत्या बाप्पासाठीही दहीपोहे करणं या परंपरेचाच भाग.गणपतीला दहीपोह्याचा नैवैद्य तर दाखवला. पण त्यादिवशी प्रसाद म्हणूनही ते दहीपोहे गोड वाटत नाहीत कारण गणपती विसर्जनाची वेळ जवळ आलेली असते.मात्र दहीपोहे एरव्हीही खाल्ले तर ते पोटभर होते.

(Image : google)

त्यात आवडले तर भाजलेले शेंगदाणे, डाळींब, काकडी, गाजर अशा भाज्याही घालतात येतातच. पोहे खास मराठी समजले जातात. लेखिका मेघना सामंत आपल्या पोह्यांविषयीच्या लोकमतमध्येच प्रसिध्द झालेल्या लेखात म्हणतात, ‘ मराठी भाषेची एक गंमत आहे. कच्चे असतील तर पोहे; दह्यादुधात कालवले, नाहीतर भिजवून फोडणीला टाकले तरी ते पोहेच; पण तळून, फुलवून कुरकुरीत केले तर मात्र म्हणायचं चिवडा. त्याचा महत्त्वाचा गुणविशेष म्हणजे टिकाऊपणा. चिवडा हे निश्चितच एक अफलातून खाद्य आहे. अजूनही दगडी, लाकडी उखळात पोहे कांडण्याची परंपरा अखंडित असली तरी यंत्रांनी काम सोपं झालंय. यंत्रयुगात गहू, ज्वारी, नाचणीसारख्या धान्यांचे पोहे (अर्थातच चिवडाही) बनू लागलाय. पश्चिमी देशांत ओट्सचे पोहे (रोल्ड ओट्स) बनतात. अमेरिकनांनी त्यांच्या भूमीत विपुल प्रमाणात पिकणाऱ्या मक्याचे पोहे केले, कारण नुसता मका साठवून ठेवला तर खराब होतो, चव जाते. व्यापारी कंपन्यांनी हे मक्याचे पोहे हेल्दी ब्रेकफास्ट म्हणून जगभर खपवले. भारतातही नाश्त्याला दुधातून कॉर्नफ्लेक्स, ओट्स खाणाऱ्यांची संख्या कमी नाही. पण स्वस्त, सहज उपलब्ध असणारे, शेकडो प्रकारे रांधता येणारे, रुचकर आणि भरपूर पोषक अशा सर्वगुणसंपन्न पोह्यांना हा पंचतारांकित मान नाही. ते आपले सुदाम्याचेच राहिलेत.’

(Image : google)

असे पोहे आपल्याकडे नैवेद्यात असतात हा मान खरं त्यांचा आणि आपल्या रोजच्या जगण्यात त्यांना असलेल्या स्थानाचाही!

टॅग्स :गणेशोत्सवअन्नपाककृती