नाश्त्याला रोज काय करायचे असा प्रश्न तमाम महिलावर्गासमोर असतो. सकाळच्या घाईत झटपट होईल आणि तरी वेगळे असेल असे काहीतरी करायचे म्हणजे तारेवरची कसरत असते. नेहमी तेच ते पोहे, उपमा, फोडणीची पोळी खाऊन घरातल्यांनाही कंटाळा येतो. उन्हाळ्याच्या दिवसांत तर सतत पाणी पाणी होत असते. अशावेळी दिवसा कडक ऊन असताना जेवण जास्त जात नाही मग नाश्ता पोटभरीचा आणि पोषण देणारा असेल तर त्याचा फायदा होतो. इतकेच नाही तर अनेकदा दुपारी ऊन्हाने जेवण नीट गेले नसेल तर ऊन उतरल्यावरही ५ वाजता आपल्याला दणकून भूक लागते. पोहे हा झटपट होणारा पदार्थ असल्याने आपण भूक लागली की पोहे भिजवतो आणि कांदेपोहे करतो (Dahi Pohe Summer Special Recipe).
पण नेहमी तेच ते पोहे खाऊन कंटाळा आला असेल तर आज आपण पोह्यांपासूनच होणारे पण थोडे वेगळे आणि उन्हाळ्यात शरीराला गारवा देणारे असे आगळेवेगळे दही पोहे कसे करायचे ते पाहणार आहोत. हे पोहे झटपट होत असल्याने भूक लागली की ऐनवेळी ते सहज करता येतात. तसेच त्याची आंबट-गोड चव, खाराच्या मिरचीचा तडका आणि दाणे यांमुळे त्याची रंगत आणखी वाढते. पारंपरिक असा हा पदार्थ आताच्या मॉडर्न पदार्थांपेक्षा नक्कीच कित्येक पटींनी चविष्ट लागतो. घरात सहज उपलब्ध असणाऱ्या पदार्थांपासून हे पोहे होत असल्याने त्यासाठी फारशी तयारीही करावी लागत नाही. पाहूयात हे दही पोहे नेमके कसे करायचे.
साहित्य -
१. जाड पोहे - २ वाट्या
२. दही - १ ते १.५ वाटी
३. तेल - २ चमचे
४. मीठ - चवीनुसार
५. साखर - चवीनुसार
६. दाणे - एक मूठ
७. खाराची मिरची किंवा लाल मिरची - ३
८. हिंग - पाव चमचा
९. जीरे - पाव चमचा
१०. कडिपत्ता - ७ ते ८ पाने
११. कोथिंबीर - अर्धी वाटी बारीक चिरलेली
कृती-
१. आपण पोहे करण्यासाठी ज्याप्रमाणे पोहे भिजवतो तसेच भिजवायचे
२. दह्याचे घट्टसर ताक करुन घ्यायचे.
३. हे ताक, साखर आणि मीठ पोह्यात घालायचेय
४. कढईत तेल घालून त्यामध्ये जीरे, हिंग, कडिपत्ता, दाणे आणि खाराची मिरची घालायची.
५. ही फोडणी पोह्यांवर घालून सगळे नीट एकत्र करायचे.
६. वरुन बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर घालायची.
७. थोडे गार हवे असतील तर हे पोहे १० मिनीटे फ्रिजमध्ये ठेवायचे. ५ मिनीटांत होणारे गारेगार दहीपोहे उन्हाळ्याच्या दिवसांत मस्त लागतात.