उन्हाळ्याच्या दिवसांत अंगाची लाहीलाही होत असल्याने अन्न जात नाही. अशावेळी एकतर सतत पाणी, सरबतं असं काही ना काही घेतलं जातं. नाहीतर आंबा किंवा आईस्क्रीम, शेक यावर आपला भर असतो. यामुळे तहान भागते आणि गार वाटत असले तरी शरीराचे म्हणावे तसे पोषण होतेच असे नाही. अशावेळी घरातील सगळ्यांनाच वेगळं काहीतरी खायचं असतं. चविष्ट, गार आणि तरीही हेल्दी होईल असा एक पदार्थ म्हणजे दही वडे. उडदाची डाळ आणि दही दोन्हीही आरोग्यासाठी चांगले असल्याने आपण घरच्या घरी हा बेत नक्कीच करु शकतो. पाहूयात हे दही वडे झटपट होण्यासाठी नेमके काय करायचे (Dahi Wada Recipe Summer Special).
१. संध्याकाळसाठी वडे करायचे असतील तर केवळ ३ तास आधी १ वाटी उडीद डाळ आणि अर्धी वाटी मूग डाळ पाण्यात भिजत घालायचे.
२. ही डाळ बरीच फुगत असल्याने यामध्ये मध्यम आकाराचे साधारण २० ते २५ वडे होतात. याच मापात जास्त प्रमाणही घेऊ शकतो.
३. सगळे पाणी काढून टाकून ही डाळ मिक्सरमध्ये चांगली बारीक फिरवून घ्यायची. डाळ मिक्सर करताना प्रत्येक वेळी अगदी कमी पाणी घालायचे जेणेकरुन पीठ चांगले घट्टसर राहील.
४. उडीद डाळ भिजवल्यावर आणि मिक्सर केल्यावर थोडी चिकट होते. म्हणूनच वडे हलके होण्यासाठी त्यामध्ये आपण मूगाची डाळ घालतो.
५. इडलीचे पीठ आपण ज्याप्रमाणे आंबवतो, त्याप्रमाणे मिक्सर केल्यानंतर उडीद वड्यांचे पीठ पुन्हा ठेवून देण्याची आवश्यकता नसते.
६. या पीठात मीठ आणि जीरे घालायचे आणि कढईत तेल तापायला ठेवायचे. तेल चांगले तापले की खरपूस वडे तळून घ्यायचे आणि शक्यतो टिश्यू पेपरवर काढायचे म्हणजे जास्तीचे तेल निघून जाण्यास मदत होते.
७. एका पातेल्यात पाणी घ्यायचे आणि हे वडे थोडे कोमट असतानाच या पाण्यात घालायचे. म्हणजे यातील तेल निघून जाते आणि पाणी मुरले जाऊन वडा मऊ व्हायला मदत होते.
८. दुसरीकडे वड्यांसाठी दही तयार करायचे असल्याने एका बाऊलमध्ये दही घेऊन ते फेटून घ्यायचे. त्यामध्ये मीठ, तिखट आणि चवीला साखर घालायची.
९. पाण्यातून काढलेले वडे या दह्यात घातल्यानंतर आवडीनुसार त्यावर लाल मिरची, जीरे आणि कडीपत्त्याची फोडणी घालायची.
१०. आवडीनुसार वरुन पुन्हा तिखट, धणे-जीरे पावडर, चिंचेची चटणी, हिरवी चटणी, कोथिंबीर घालून घेतल्यास वडे आणखी छान लागतात.