थंडी म्हटली की सतत काहीतरी गरमागरम घ्यावेसे वाटते. अशावेळी चहा किंवा कॉफी घेण्यापेक्षा शरीराला ऊब मिळेल आणि ताकद वाढण्यासही मदत होईल असे सूप घेतले तर? भाज्यांचे सूप आपण नेहमीच घेतो, पण आज आपण डाळींचे सूप पाहणार आहोत. डाळींमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन्स असल्याने हे सूप आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते. त्याला लसूण, जीरे यांसारख्या गोष्टींचा तडका दिल्याने त्याची चवही अतिशय छान लागते. लहान मुलांपासून ते वयस्कर व्यक्तींपर्यंत सगळ्यांना चालणारे आणि ताकद देणारे हे सूप कसे करायचे ते पाहूया. झटपट होत असल्याने करायलाही सोपे आणि घशाला आराम देणारे हे सूप तुम्ही नक्की ट्राय करुन पाहा (Dal Soup Winter Special Recipe).
साहित्य
१. मूग डाळ - अर्धी वाटी
२. तूर डाळ - अर्धी वाटी
३. मसूर डाळ - अर्धी वाटी
४. लसूण - ७ ते ८ पाकळ्या
५. जीरे - अर्धा चमचा
६. कडीपत्ता - ६ ते ७ पाने
७. लाल किंवा हिरवी मिरची - १
८. मीठ - चवीनुसार
९. लिंबाचा रस - अर्धा चमचा
१०. साखर - अर्धा चमचा
११. तेल - १ चमचा
१२. हिंग - हळद - फोडणीपुरती
१३. कोथिंबीर - अर्धी वाटी
कृती -
१. सगळ्या डाळी स्वच्छ धुवून त्यात बसेल तेवढे पाणी घालून कुकरला शिजवायला लावाव्यात. साधारण ३ ते ४ शिट्ट्या घ्याव्यात.
२. झाकण पडल्यानंतर या डाळी चांगल्या हाटून घेऊन त्यामध्ये जवळपास दुप्पट पाणी घालावे.
३. यामध्ये साखर, मीठ, लिंबाचा रस घालून हे मिश्रण चांगले हाटून घ्यावे.
४. कढईमध्ये तेल घालून त्यामध्ये जीरे, हिंग, हळद घालावे. फोडणी तडतडली की त्यामध्ये मिरची, कडीपत्ता आणि लसणाच्या पाकळ्या घालाव्यात.
५. ही फोडणी डाळींच्या मिश्रणामध्ये घालून त्यावर वरुन कोथिंबीर घालावी. आवश्यकतेनुसार पाणी घालून हे मिश्रण गॅसवर पुन्हा चांगले उकळावे.
६. तूप घालून हे डाळींचे सूप गरमागरम प्यावे.