पावसाळ्यात फक्कड चहा आणि त्यासोबत काहीतरी गरमागरम खायची मजा काही औरच. घराबाहेर कोसळणारा मुसळधार पाऊस बघून आपल्याला काहीतरी गरमागरम, चटपटीत खायची इच्छा होते. अशावेळी आपण भजी, वडे, सामोसे असे अनेक पदार्थ अगदी आवडीने खातो. या गरमागरम पदार्थांमध्ये आपण डाळवडा तर नक्कीच बनवून खातो. साऊथ इंडियन पद्धतीचा डाळवडा तर आपण नेहमीच खातो. दिवसभरात कधीही भूक लागते तेव्हा डाळवडा झटपट बनवता येतो. घरातील लहान मुलांनाही हा पदार्थ खूप आवडतो(Most Famous Dal Vada of Ahmedabad).
डाळवडा बनवण्यासाठी चणा डाळ वापरली जाते. परंतु हा नेहमीचा डाळवडा तर आपण खातोच. पण तुम्ही कधी अहमदाबादी डाळवडा खाल्ला आहे का ? यंदाच्या पावसाळ्यात अहमदाबादी डाळ वडा नक्की ट्राय करुन पाहा. हा डाळवडा बनवायला सोपा आणि खायला चविष्ट लागतो. तसेच हा डाळवडा बनवण्यासाठी फारशी मेहेनत देखील घ्यावी लागत नाही. अगदी कमी साहित्यात झटपट बनवून हा डाळवडा सगळ्यांना खायला आवडतो. आपण संध्याकाळच्या नाश्त्याला देखील चहासोबत हे गरमागरम डाळवडे खाऊ शकतो. अहमदाबादी डाळवड्यांची सोपी रेसिपी पाहूयात(Ahmedabad Famous Dal Vada Recipe).
साहित्य :-
१. मूग डाळ (सालीसहित) - १ कप
२. आलं - १ लहान तुकडा
३. लसूण - ६ ते ७ पाकळ्या
४. काळीमिरी पूड - १/२ टेबलस्पून
५. मीठ - चवीनुसार
६. कोथिंबीर - १ टेबलस्पून (बारीक चिरलेली)
७. तेल - तळण्यासाठी
८. हिरव्या मिरच्या - ३ ते ४ (बारीक चिरलेल्या)
कांदा भजी नेहमीचीच, कांद्याच्या पातीची भजी कधी खाल्ली आहेत? खा कुरकुरीत कांदापातीची भजी...
कृती :-
१. एका मोठ्या बाऊलमध्ये साल असणारी मूग डाळ घेऊन ती ५ ते ६ तास भिजत ठेवावी.
२. त्यानंतर मूग डाळीमधील साल जितकी काढून घेता येईल तितकी काढून घ्यावी.
३. आता ही भिजवलेली मूग डाळ एका मिक्सर ग्राईंडर मध्ये ओतून त्यात हिरव्या मिरच्या, लसूण, आलं घालून या मिश्रणाची किंचित जाडसर अशी भरड वाटून घ्यावी.
धो धो कोसळणाऱ्या पावसात खा कॉर्न चाटचे ३ नवीन प्रकार, मसालेदार मक्याच्या दाण्यांची सोपी रेसिपी...
४. त्यानंतर हे वाटून घेतलेले मिश्रण एका बाऊलमध्ये काढून त्यात काळीमिरी पूड, बारीक चिरलेली कोथिंबीर व चवीनुसार मीठ घालावे.
५. हे मिश्रण चमच्याने व्यवस्थित हलवून घ्यावे. या मिश्रणाचा रंग जोपर्यन्त हलकासा फिका होत नाही तोपर्यंत हे मिश्रण फेटून घ्यावे.
६. आता एका कढईत तेल घ्यावे. या गरम तेलात मिश्रणाचे छोटे गोल गोळे करून सोडावेत. गरम तेलात हा डाळवडा हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत खरपूस तळून घ्यावा.
गरमागरम अहमदाबादी डाळवडा खाण्यासाठी तयार आहे. चटणी किंवा सॉससोबत हा डाळवडा खाण्यासाठी सर्व्ह करावा.