आजकाल प्रत्येक घराच्या स्वयंपाकघरात ॲल्युमिनियम फॉइलचा वापर हमखास केला जातो. टिफिन पॅक करणं असो, पराठा, चपाती गरम ठेवणं असो... ॲल्युमिनियम फॉइलचा वापर केला जातो. पण तुम्हाला माहिती आहे का की, सिल्व्हर रंगाची ही शीट तुमच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकते. शास्त्रज्ञ आणि आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जर ॲल्युमिनियम फॉइलचा चुकीचा वापर केला तर अनेक गंभीर आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो.
गंभीर आजारांचा धोका
ॲल्युमिनियमच्या जास्त संपर्कामुळे आपल्या मेंदूच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो. काही रिसर्चमध्ये असं आढळून आलं आहे की, शरीरात ॲल्युमिनियमचं जास्त प्रमाण जमा झाल्यामुळे अल्झायमर सारख्या न्यूरोलॉजिकल आजारांचा धोका वाढू शकतो. अन्न वारंवार गरम केल्याने किंवा ॲल्युमिनियम फॉइलमध्ये साठवल्याने हे घटक हळूहळू अन्नात मिसळू शकतात.
हाडं कमकुवत होतात
जेव्हा शरीरात जास्त प्रमाणात ॲल्युमिनियम जमा होते तेव्हा ते कॅल्शियमचं शोषण रोखू शकतं. यामुळे हाडं हळूहळू कमकुवत होतात आणि ऑस्टियोपोरोसिसचा धोका वाढतो, विशेषतः महिला आणि वृद्धांना यामुळे अधिक समस्यांना तोंड द्यावं लागू शकतं.
पचनसंस्थेवर परिणाम
अन्न फॉइलमध्ये साठवल्याने किंवा शिजवल्याने, विशेषतः एसिडिक फूड (जसे की टोमॅटो, लिंबू, लोणचे), ॲल्युमिनियमचे लहान कण अन्नात मिसळू शकतात. यामुळे पोटात गॅस, एसिडिटी, बद्धकोष्ठता आणि पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.
किडनी आणि लिव्हरवर परिणाम
शरीरातून ॲल्युमिनियम काढून टाकण्याचं काम किडनी आणि लिव्हर करतं. जर त्याचं प्रमाण वाढलं तर या अवयवांवर परिणाम होता. ते योग्यरित्या कार्य करू शकत नाहीत. यामुळे त्यांचे कार्य हळूहळू बिघडू शकते.
कॅन्सरचा धोका
अद्याप कोणतेही ठोस पुरावे नाहीत, मात्र काही रिसर्चमध्ये असं सूचित करतात की, ॲल्युमिनियमच्या दीर्घकाळ संपर्कात राहिल्याने डीएनएचं नुकसान होऊ शकतं, ज्यामुळे कॅन्सरसारख्या आजारांचा धोका वाढू शकतो.
ॲल्युमिनियम फॉइल वापरताना ही खबरदारी घ्या
- गरम किंवा एसिडिक पदार्थ फॉइलमध्ये ठेवू नका.
- अन्न साठवण्यासाठी काचेचे किंवा स्टीलचे कंटेनर वापरा.
- विशेषतः मुलांच्या टिफिनमध्ये ॲल्युमिनियम फॉइल टाळा.
- फक्त थंड आणि ड्राय वस्तू गुंडाळण्यासाठी फॉइल वापरा.
- अन्न शिजवण्यासाठी फॉइलचा जास्त वापर करू नका.