Join us

Datta Jayanti 2024: दत्त जयंतीला घरच्या साहित्यातून नैवेद्याला करा सुंठवडा; वाचा बहुगुणी लाभ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2024 12:04 IST

Datta Jayanti 2024: दत्त जयंतीला सुंठवडा करण्याचा प्रघात आहे, तो कसा करायचा, याबरोबरच तो खाल्ल्याने होणारे फायदेही आपण जाणून घेऊ.

प्रत्येक उत्सवाचा प्रसाद, नैवेद्य हा ऋतूसुसंगत असतो. सणवारानुसार आपल्या आहारातही बदल होतो. उन्हाळ्यात गुढी पाडव्याला आपण कडुलिंब खातो, संक्रांतीला तीळ खातो त्याचप्रमाणे दत्तजयंतीला आवर्जून सुंठवड्याचा नैवेद्य दाखवला जातो. हा उत्सव हिवाळ्यात येत असल्याने सुंठवडा पंजिरीचा प्रसाद आरोग्यासाठीही महत्त्वपूर्ण ठरतो. शिवाय घरच्याच साहित्यातून तो बनवता येतो. मात्र हा प्रसाद एका दमात न खाता चिमूट चिमूट घेऊन खावा नाहीतर जोरात ठसका लागू शकतो. त्याची रेसेपी पाहण्याआधी जाणून घेऊया सुंठवडा खाण्याचे फायदे -

१. सुंठ हे आल्यापासून तयार होते. आले वाळले की त्याची पावडर केली जाते आणि त्यालाच आपण सुंठ म्हणतो. आयुर्वेदात सुंठाचे अतिशय महत्त्व सांगितले आहे. सुंठ उष्ण असल्याने थंडीच्या दिवसांत सर्दी-कफ यांपासून शरीराचे रक्षण व्हावे म्हणून सुंठ खाल्ले जाते. 

२. थंडीच्या दिवसांत पाणी कमी प्यायल्याने बद्धकोष्ठता, अपचन यांसारख्या समस्या उद्भवण्याची शक्यता असते. अशावेळी सुंठवडा खाल्ल्यास पचनक्रिया सुरळीत होण्यास त्याची चांगली मदत होते. 

३. थंडीच्या दिवसांत अनेकांना हाडांचे विकार उद्भवतात. संधीवाताच्या समस्या असणाऱ्यांनाही या काळात त्रास होतो. अशावेळी सुंठ खाल्ल्यास हाडांच्या समस्या दूर होण्यास मदत होते. 

४.  पोटावर चरबी साठू नये म्हणूनही सुंठ उपयुक्त ठरतो. इतकेच नाही तर हृदयविकार, डायबिटीस यांसारख्या विकारांचा त्रास होऊ नये म्हणून सुंठ खाण्याचा फायदा होतो. त्यामुळे थंडीच्या दिवसांत सुंठ खाणे फायदेशीर ठरते.  

सुंठवडा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य –

- अर्धा कप खारीकचे तुकडे- १५ बदाम- १० काजू-  १चमचा बडीशेप-  १ चमचा पांढरे तीळ-  १ चमचा खसखस-  ४ वेलची-  अर्धा कप सुख्या खोबऱ्याचा किस-  ३ चमचे साखर- १ चमचा खडी साखर- १ चमचे मनुके- १ चमचा सुंठ पावडर

असा तयार करा सुंठवडा –

आधी कढईमध्ये सर्व सुखा मेवा हलकासा भाजून घ्यायचा आहे. सर्वात आधी खारीख भाजून घ्यायचे आहे. त्यानंतर बदाम, काजू, बडीशेप, पांढरे तीळ, खसखस, सोललेली वेलची, सुख्या खोबऱ्याचा किस हे सर्व कढईमध्ये एक एक करुन भाजून घ्या. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काजू आणि बदाम सोडून बाकी सर्व सुकामेवा टाकून त्यामध्ये तीन चमचे साखर आणि एक चमचा खडी साखर टाकून वाटून घ्यायचे आहे. त्यानंतर आता यामध्ये खोबऱ्याचा किस, काजू, बदाम आणि सुंठ पावडर टाकून पुन्हा मिक्सरमधून हे मिश्रण बारीक करुन घ्यायचे आहे. आता यावर मनुके टाकून सर्व मिश्रण एकत्र करुन घ्यायचे आहे. अशापद्धतीने सुंठवडा तयार झाला आहे. हा सुंठवडा खायला खूप चविष्ट असतो त्यासोबत तो शरीरासाठी खूपच फायदेशीर असतो. या जन्माष्टमीनिमित्त तुम्ही घरीच सुंठवडा तयार करु शकता.

टॅग्स :दत्त जयंतीअन्न