ज्यांचे गणपती दिड दिवसाचे, तीन दिवसाचे आहेत, त्यांच्या गणरायाचे विसर्जन झाले. पण ज्यांचे गणराय १० दिवसांसाठी आलेले आहेत, त्यांना दररोज गणपतीसाठी वेगवेगळा नैवेद्य करावा लागतो. काही जणांच्या घरी तर सकाळी आणि संध्याकाळी दररोज वेगवेगळे नैवेद्य असतात. अशावेळी दररोज काय वेगळा नैवेद्य करावा, हा प्रश्न पडतोच. म्हणूनच तर ही घ्या आणखी एक चवदार, सोपी, झटपट होणारी आणि सगळ्यात मुख्य म्हणजे खूपच कमी साहित्यात तयार होणारी मोदकांची रेसिपी (Delicious modak recipe in just 10 minutes). ही रेसिपी सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर यांनी शेअर केली असून त्याला त्यांनी जिमजॅम बिस्किट मोदक असं नाव दिलं आहे. (Biscuit Modak Recipe by Kunal Kapur)
बिस्किट मोदक करण्याची रेसिपी
१. बिस्किट मोदक करण्यासाठी आपल्याला बिस्किटे आणि तूप किंवा बटर अशा दोनच गोष्टी प्रामुख्याने लागणार आहेत. तुमच्याकडे इतर साहित्य उपलब्ध असेल तर खूपच छान. पण नसेल तर अगदी बिस्किट आणि तूप वापरूनही खूप चवदार मोदक बनवता येतील.
२. बिस्किटे मैद्यापासून तयार केलेली असतात. त्यामुळे तुम्हाला जर मैदा चालणार नसेल तर तुम्ही गव्हाच्या बिस्किटांपासूनही ही रेसिपी करू शकता.
३. बिस्किट मोदक करण्यासाठी आपल्याला १० ते १२ बिस्किटे, दिड टेबलस्पून तूप आणि ४ ते ५ टेबलस्पून पाणी किंवा दूध लागणार आहे.
४. सगळ्यात आधी बिस्किटांचे तुकडे करा आणि ते मिक्सरमधून फिरवून त्याची बारीक पावडर करून घ्या.
ड्रॅगनफ्रुट खाण्याचे ५ फायदे, सुपरफुड म्हणतात या फळाला ते काही उगीच नाही, चवीलाही गोड
५. त्यानंतर गॅसवर कढई गरम करायला ठेवा. त्यात तूप टाका. तूप वितळलं की त्यात बिस्किटांची पावडर टाका आणि सगळं मिश्रण व्यवस्थित परतून घ्या. त्यानंतर त्यात पाणी घाला. पाण्याऐवजी दूध घातलं तर आणखी उत्तम.
६. सगळं मिश्रण आळून आलं की गॅस बंद करा. हे मिश्रण थोडं थंड झाल्यावर मोदकांच्या साच्यात भरा आणि त्याचे मोदक करा.
७. कुणाल कपूर यांनी या मोदकांमध्ये जॅम भरला आहे. तुम्ही त्याऐवजी चॉकलेटही भरू शकता. किंवा काही नाही भरले तरी चालते.