सणावाराला पुरणावरणाचा स्वयंपाक जेव्हा केला जातो, तेव्हा त्या स्वयंपाकात काही हमखास ठरलेले, पुर्वीपासून चालत आलेले पदार्थ असतात. ते पदार्थ केले तरच पुरणावरणाचा स्वयंपाक पुर्ण झाला, असे मानले जाते. या पदार्थांपैकीच एक आहे वाटली डाळ. सगळ्या स्वयंपाकात अगदी उठून दिसणारी असते ही डाळ. त्यामुळे तिची चवदेखील तशीच खास जमायला हवी. कधीकधी ही डाळ अगदीच मोकळी आणि कोरडी होते. एवढी कोरडी की नुसती खाल्ली तर कधीकधी घास छातीत अडकल्यासारखा होतो. काही वेळेस काहीतरी बिघडतं आणि डाळ मग अगदीच गचका होऊन जाते. हे सगळं टाळायचं असेल, तर वाटल्या डाळीची ही एक मस्त आणि खमंग रेसिपी करून बघा. अशी डाळ खाल्ली तर जेवणाचा आनंद नक्कीच द्विगुणित होईल.
वाटल्या डाळीसाठी लागणारे साहित्य१ मध्यम वाटी हरबऱ्याची डाळ, ४ टेबल स्पून तेल, हळद, मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता, कोथिंबीर, हिरवी मिरची, लिंबू, थोडीशी साखर आणि चवीपुरते मीठ.
कशी करायची वाटली डाळ?- सगळ्यात आधी हरबऱ्याची डाळ ३ ते ४ तास पाण्यात भिजवावी. त्यानंतर डाळीतले पाणी काढून टाकावे. ती थोडीशी सुकवावी आणि मिक्सरमधून फिरवून घ्यावी. अगदी बारीक वाटू नये. जरा भरड- भरड असावी. - यानंतर कढईत तेल तापवत ठेवावे. त्यात मोहरी, जिरे, हिंग, हळद, मिरची आणि कढीपत्ता असे सगळे टाकून फोडणी करून घ्यावी. फोडणी झाल्यावर त्यात वाटलेली चणा डाळ टाकावी आणि मध्यम आचेवर व्यवस्थित परतून घ्यावी. गॅस मोठा करू नये. कारण डाळ करपण्याची शक्यता असते.
- डाळ परतली गेली की त्यावर हाताने जरा पाणी शिंपडावे. खूप पाणी शिंपडू नये. वाटली डाळ करताना ही स्टेप सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे. कारण तुम्ही पाणी किती आणि कसे शिंपडता यावर तुमची डाळ कोरडी हाेणारी, गचका होणार की मस्त बेताची मोकळी होणार हे ठरते. त्यामुळे अंदाज घेऊन जरा बेतानेच पाणी शिंपडावे.
- पाणी शिंपडले की लिंबाचा रसही थोडा टाकावा. चवीनुसार मीठ टाकावे, चिमुटभर साखर टाकावी आणि त्यानंतर कढईवर झाकण ठेवून चांगली वाफ येऊ द्यावी.- डाळ शिजली, मऊसर झाली की वरून कोथिंबीर टाकावी. मस्त, चटपटीत आणि खमंग डाळ तयार.