वांग्याचं भरीत आणि त्याच्या जोडीला बाजरीची किंवा ज्वारीची भाकरी (Dhaba style baingan bharta recipe) हा अनेक जणांचा आवडीचा मेन्यू.. भरीत आणि भाकरीच्या जोडीला ठेचा, चटणी आणि हिरवीगार कांद्याची पात असली की हा बेत तर मग बघायलाच नको. शिवाय चातुर्मास संपून अनेक जण या दिवसांत कांदे- वांगे खायला सुरुवातही करतात. म्हणूनच तर भरीत करायचा विचार असेल तर सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर यांनी शेअर केलेली ही अस्सल झणझणीत ढाबा स्टाईल भरीत रेसिपी (How to make spicy, delicious baingan bharta?) एकदा बघूनच घ्या. जेवणात आणखी रंगत येईल हे नक्की.
भरीत रेसिपीसाहित्य२ वांगी, ६ लसूण पाकळ्यातूप किंवा तेल २ टीस्पूनवाळलेल्या लाल मिरच्या २जिरे २ टीस्पून१ टेबलस्पून बारीक चिरलेला लसूण२ टीस्पून आलं१ हिरवी मिरचीपाव कप बारीक चिरलेला कांदापाव कप बारीक चिरलेला टोमॅटोचिमुटभर हळदचवीनुसार तिखट आणि मीठ२ टेबलस्पून कोथिंबीर
रेसिपी१. सगळ्यात आधी वांग्याला चाकुने ६ ते ७ बारीक छिद्र करून घ्या आणि त्या छिद्रांमध्ये लसूण पाकळ्या अडकवून टाका.
२. वांग्याला बाहेरच्या बाजूने तेल लावा आणि वांगे गॅसवर भाजायला ठेवून द्या.
३. वांगे चांगले भाजून झाले की ते थंड होऊ द्या. थंड झाल्यानंतर त्याची साले काढून टाका आणि वांग्याचा गर ठेचून घ्या.
४. आता एका कढईमध्ये तुमच्या आवडीनुसार तेल किंवा तूप तापायला ठेवा. तापल्यानंतर त्यात लाल मिरच्या टाका आणि जिरे टाकून फोडणी करून घ्या.
५. फोडणी झाल्यानंतर त्यात लसूण, आलं, हिरव्या मिरच्या आणि कांदा टाकून परतून घ्या. सगळ्यात शेवटी टोमॅटो टाकून परतून घ्या.
६. टोमॅटो परतून झाला की त्यात भाजलेल्या वांग्याचा गर आणि चवीनुसार तिखट, मीठ टाका. झाकण ठेवून वाफ येऊ द्या. त्यानंतर कोथिंबीर टाका आणि गरमागरम भरीत भाकरी- पोळीसोबत खाण्याचा आनंद घ्या.