Join us

ढाबास्टाईल जीरा राईस घरीच करा; सोपी रेसिपी, नेहमीच्या भाताला चविष्ट पर्याय..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2023 18:18 IST

Dhaba Style Easy Jeera Rice Recipe : भाताचा वेगळा तरीही झटपट सोपा प्रकार करायचा असेल तर ट्राय करा जीरा राईस

भात खाल्ल्याशिवाय अनेकांना चैन पडत नाही. गरमागरम भाताशिवाय जेवण पूर्ण झाल्यासारखं वाटतच नाही. दुपारच्या वेळी बरेच जण डबा नेतात पण रात्री तरी ताटात गरमागरम भात लागतोच. नेहमी कुकरला लावलेला भात आणि आमटी किंवा वरण खाण्यापेक्षा भाताचा वेगळा काहीतरी प्रकार असला की आपल्याला बरे वाटते. मग आपण साहजिकच खिचडी, पुलाव, मसालेभात, मसूर भात, पालक भात, दही भात असे काही ना काही वेगळे प्रकार ट्राय करतो. पण यासाठी हातात थोडा वेळ असावा लागतो. त्यापेक्षा झटपट होणारा आणि एकदम ढाबा किंवा हॉटेलस्टाईल जीरा राईस अगदी पटकन होतो. नेमकं माप घेतलं तर हा जीरा राईस अतिशय चविष्ट लागतो. एखादी ग्रेव्हीची भाजी, दाल तडका किंवा अगदी नुसताही आपण हा जीरा राईस खाऊ शकतो. म्हणूनच हॉटेलमध्ये किंवा ढाब्यावर केल्या जाणाऱ्या या जीरा राईसची झटपट-सोपी अशी रेसिपी आज आपण पाहणार आहोत (Dhaba Style Easy Jeera Rice Recipe). 

साहित्य -

१. बासमती तांदूळ - १ वाटी 

२. काळी मिरी - ५ ते ६ 

३. वेलदोडा - २ 

४. काळा वेलदोडा - १ 

५. लवंगा - २ 

६. दालचिनी - १ इंच

(Image : Google)

७. कांदा - १ 

८. जीरे - २ चमचे 

९. कोथिंबीर - अर्धी वाटी बारीक चिरलेली

१०. मीठ - चवीनुसार 

११. पाणी - १.५ वाटी 

१२. तूप - १ चमचा

१३. लिंबू - अर्धे 

कृती 

१. कुकरमध्ये १ चमचा तूप घालून त्यामध्ये खडा मसाला आणि जीरे घालून थोडे परतून घ्यायचे. 

२. त्यानंतर यामध्ये बारीक उभा चिरलेला कांदा घालून तो थोडा परतायचा.

३. बासमती तांदूळ धुवून घेऊन तो यामध्ये घालायचा आणि मग पाणी घालायचे. 

४. मीठ आणि लिंबाचा रस घालून सगळे डावाने चांगले एकजीव करुन घ्यायचे. 

५. कुकरचे झाकण लावून साधारण २ शिट्ट्या करायच्या. 

६. गरमागरम फडफडीत असा चविष्ट जीरा राईस तयार होतो. यावर कोथिंबीर घालून दाल तडका किंवा ग्रेव्ही असलेल्या भाजीसोबत अतिशय मस्त लागतो. 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.