Join us  

मस्त चमचमीत ‘धिरडी चीज पॉकेट्स’; धिरड्याचं नवं मॉडर्न रुप, परफेक्ट पौष्टिक नाश्ता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 4:31 PM

धिरडी म्हंटलं की काहीतरी जुनाट वाटत असेल तर ते चूकच, अत्यंत पौष्टिक असा हा नाश्ता, त्याला जरा मॉडर्न ट्विस्ट दिला तर अजून बेहतरीन.

ठळक मुद्देपौष्टिक आणि चविष्ट, घाईच्या वेळेस उत्तम नाश्ता.

धिरडं म्हंटलं तर चवीला एकदम उत्तम. आपल्याला हवं तसं लो कॅलरी, हाय कॅलरी, हाय प्रोटीन, हाय कार्ब बनवता येऊ शकतं. त्यात भरपूर भाज्या घालता येतात. पुन्हा झटकेपट होणारा, साहित्य कमी जास्त झालं तरी चालतं असा हा प्रकार. पण पॅनकेक आणि डोशाच्या जगात धिरडी जरा मागेच पडतात. आणि आपण आज धिरडी खाल्ली नाश्त्याला असं काही मिरवून सांगतही नाही कुणी. पाठीचं धिरडं पूर्वी निघत असे, आता तर ते ही बंदच झाल्या जमा. मात्र जोवर कुणीतरी सेलिब्रिटी मी धिरडं खातेय असं सांगत नाही तोवर त्याला ग्लॅमर नाही म्हणून थांबू नये, हा अत्यंत पौष्टिक नाश्ता आपल्या आहारात हवाच. मात्र कधीमधी त्या नाश्त्यालाही थोडा मॉडर्न टच देत धिरड्याचंही रंगरुप बदलून टाकलं तर.. म्हणजे धिरड्याचे चीज पॉकेट खाल्लेत का तुम्ही कधी? धिरडी चीज पॉकेट. करुन तर पहा, करायला सोपाच पदार्थ पण नाव असं ट्रेण्डी की कुणाला वाटेल काय हा नवा खाद्यप्रकार.तर कसे करायचे धिरडी चीज पॉकेट्स.

साहित्य

तुम्हाला हवी ती पिठं घ्या. मात्र शक्य असेल तर ज्वारी पीठ अर्धी वाटी, बेसन पीठ अर्धी वाटी. ( बेसन पीठ खमंगपणा आणते, धिरडी खुटखुटीत होतात, मऊ गिळगिळीत होत नाहीत.) तांदूळ पीठ, कणीक, नागली पीठ उपलब्ध जी असतील ती पिठंं चमचा चमचा. ओवा, मीठ, तीळ.लसूण-मिरची-कोथिंबीर बारीक करुन. बाकी आवडत असतील त्या भाज्या कच्च्या बारीक चिरुन किंवा मिक्सरमध्ये फिरवून. नाही घातल्या तरी चालतात.आणि चीज भरपूर, हवे तसे.

कृती

सगळी पीठं . साहित्य एकत्र करुन घ्यायचं. सरसरीत करायचं. डोसा पीठासारखं.तवा तापला की गरगर फिरवत धिरडं घालायचा. दोन्ही बाजूनं तेल घालून खरपूस भाजून घ्यायचं.मग धिरड्यावर हवे तसे चीज घालायचे. दिंड करताना चारी बाजूने दुमडून चौकोन करतो, तसं चारी बाजू दुमडून चाैकोन करायचा. मंद गॅसवर किंचित शेकू द्यायचं. म्हणजे चीज मेल्ट होतं.झालं धिरडी चीज पॉकेट्स तयार.वाटलं तर चटणी, सॉस, लोणचं यासाेबत खा.नाहीतर नुसतं. मुलांच्या हातात ते पॉकेट देता येतं, आणि मस्त पटकन ते गटकवतातही.पौष्टिक आणि चविष्ट, घाईच्या वेळेस उत्तम नाश्ता.करुन पहा. धिरडी चीज पॉकेट्स.

टॅग्स :अन्न