Lokmat Sakhi >Food > हलवाई करतात तसा परफेक्ट स्पाँजी ढोकळा १० मिनीटांत होईल तयार, करुन ठेवा- ४ महिने टिकणारे ढोकळा प्रिमिक्स

हलवाई करतात तसा परफेक्ट स्पाँजी ढोकळा १० मिनीटांत होईल तयार, करुन ठेवा- ४ महिने टिकणारे ढोकळा प्रिमिक्स

Dhokla Premix Recipe for Instant Dhokla making : हे प्रिमिक्स फक्त डाळीचे नसून डाळ आणि तांदूळ या दोन्हीचा वापर करुन केलेले असल्याने ते पचायला हलके असते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2023 05:34 PM2023-10-12T17:34:48+5:302023-10-12T17:37:12+5:30

Dhokla Premix Recipe for Instant Dhokla making : हे प्रिमिक्स फक्त डाळीचे नसून डाळ आणि तांदूळ या दोन्हीचा वापर करुन केलेले असल्याने ते पचायला हलके असते

Dhokla Premix Recipe for Instant Dhokla making : A perfect spongy dhokla is ready in 10 minutes just like Halwai, keep it - dhokla premix that lasts for 4 months | हलवाई करतात तसा परफेक्ट स्पाँजी ढोकळा १० मिनीटांत होईल तयार, करुन ठेवा- ४ महिने टिकणारे ढोकळा प्रिमिक्स

हलवाई करतात तसा परफेक्ट स्पाँजी ढोकळा १० मिनीटांत होईल तयार, करुन ठेवा- ४ महिने टिकणारे ढोकळा प्रिमिक्स

कोणी पाहुणे आले किंवा आपल्यालाही अगदी वेगळं काही खावसं वाटतं तर आपण पटकन पोहे, उपमा करतो किंवा सरळ बाहेर जाऊन सामोसा, ढोकळा, वडा असं काहीतरी घेऊन येतो. बाहेरुन आणलेले कितपत चांगले असते सांगता येत नाही आणि त्यासाठी भरपूर पैसेही मोजावे लागतात. पण घरातच थोडीशी तयारी असेल तर आपण ऐनवेळी झटपट मस्त मऊ-लुसलुशीत ढोकळा करु शकतो. हा ढोकळा वेळेवर केल्याने अतिशय छान लागतो आणि तो करायलाही फारसा वेळ लागत नाही. यासाठी बाजारातून कोणत्याही ब्रँडचे ढोकळ्याचे पीठ आणण्याची आवश्यकता नसते तर घरच्या घरी आपण प्रिमिक्स तयार करुन ठेवल्यास हे काम अगदी झटपट होते (Dhokla Premix Recipe for Instant Dhokla making). 

हा ढोकळा इतका छान फुलतो की तो आपण घरी केलाय की हलवायाकडून आणलाय तेही समजणार नाही. आपल्याला ढोकळा करायचा असेल तेव्हा फक्त पाणी घालून वाफ काढायची आणि लुसलुशीत, जाळीदार ढोकळा तयार होतो. विशेष म्हणजे हे प्रिमिक्स फक्त डाळीचे नसून डाळ आणि तांदूळ या दोन्हीचा वापर करुन केलेले असल्याने ते पचायला हलके असते आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच अतिशय आवडीने खाऊ शकतात. एकदा हे प्रिमिक्स केले की किमान ४ महिने टिकत असल्याने आपण ते थोडे थोडे लागेल तसे वापरु शकतो. आता हे प्रिमिक्स नेमके कसे तयार करायचे पाहूया. 

१. जाड इडलीसाठी वापरतो तो १ किलो तांदूळ, पाऊण किलो हरभरा डाळ आणि पाव किलो पिवळी मूग डाळ घ्यायची. 

(Image : Google )
(Image : Google )

२. हे सगळे स्वच्छ धुतल्यावर २४ तास सुती कपड्यावर फॅनखाली वाळवायचे, उन्हात अजिबात सुकवू नये.  

३. हे पूर्ण सुकलेले डाळ-तांदूळ गिरणी किंवा घरघंटीवर थोडे रवाळ दळून आणायचे.

४. एका मोठ्या परातीत हे पीठ काढून घ्यायचे म्हणजे त्यामध्ये इतर जिन्नस मिक्स करता येतात.

५. मिक्सरच्या भांड्यात ६० ग्रॅम लिंबू सत्व म्हणजेच सायट्रीक अॅसिडची पावडर घालायची. 

६. यामध्येच ६० ग्रॅम खाण्याचा सोडा आणि ८० ग्रॅम मीठ आणि १५० ग्रॅम साखर घालून हे सगळे मिक्सरमध्ये बारीक करुन घ्यायचे. 

७. बारीक केलेले हे मिश्रण दळून आणलेल्या पीठात घालायचे आणि हाताने सगळे एकजीव करायचे. 

८. त्यानंतर बारीक चाळणीने हे मिश्रण चाळून घ्यायचे आणि हवाबंद डब्यात ठेवायचे. 

९. डबा किंवा बरणीत ठेवताना त्यामध्ये ओलावा, मॉईश्चर अजिबात नसेल याची काळजी घ्या. त्यासाठी डबा किंवा बरणी फॅनखाली नाहीतर उन्हात चांगली वाळवून घ्यायला हवी. 

१०. तुम्ही मुंबई किंवा समुद्रकिनारा असलेल्या दमट हवामानाच्या भागात राहत असाल तर हे पीठ शक्यतो फ्रिजमध्ये ठेवावे. 

११. ढोकळा करायचा असेल तेव्हा १.५ वाटी पीठात चिमूटभर हळद आणि १ वाटी पाणी घालून पीठ चांगले भिजवून घ्यायचे. 

१२. एका भांड्याला तेल लावून त्यामध्ये हे पीठ घालून मध्यम आचेवर १५ ते १७ मिनीटे हे चांगले शिजवून घेतले की मस्त मऊ ढोकळा तयार होतो.  

Web Title: Dhokla Premix Recipe for Instant Dhokla making : A perfect spongy dhokla is ready in 10 minutes just like Halwai, keep it - dhokla premix that lasts for 4 months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.