डायबिटीस ही अतिशय सामान्य जीवनशैलीविषयक समस्या आहे. गेल्या काही वर्षात डायबिटीस असणाऱ्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. डायबिटीस म्हटल्यावर आहारावर बरीच बंधने येतात. डायबिटीस असणाऱ्यांनी आहारात भात, गोड पदार्थ, स्निग्ध पदार्थ यांचा समावेश कमीत कमी करावा असे सांगितले जाते. त्याचप्रमाणे डायबिटीस असणाऱ्या रुग्णांनी शरीराला पोषक असे घटक मिळायला हवेत. बीट हा सॅलेडमधील एक महत्त्वाचा घटक असून बीट, काकडी, गाजर, कोबी, मुळा यांसारखे सॅलेड आलटून पालटून खायला हवे. बीट काही प्रमाणात गोड असल्याने तसेच डायबिटीस असणाऱ्यांनी बीट जास्त खाऊ नये असे म्हटले जाते. पण बीटात लोह भरपूर असल्याने रक्तवाढीसाठी बीट आवर्जून खाण्यास सांगितले जाते. मग डायबिटीस असणाऱ्यांनी बीट कसं खावं याविषयी डायटिशियन शिवानी फोतेदार यांनी एक सोपी रेसिपी सांगितली आहे. ही रेसिपी कशी करायची पाहूया (Diabetic Special Beet Root salad Recipe)...
१. बीटाची सालं काढून त्याचे लहान तुकडे करावेत आणि ते पाण्यात घालून १५ ते २० मिनीटे चांगले मऊ होईपर्यंत शिजवावेत.
२. या बीटातील पाणी काढून टाकून बीट एका बाऊलमध्ये काढून घ्यावे.
३. एका लहानशा कढईत २ चमचे खोबरेल तेल घालावे आणि त्यात १ चमचा मोहरी घालावी, मग त्यात कडीपत्त्याची पाने घालावीत.
४. यामध्ये २ चमचे किसलेले खोबरे आणि २ चमचे भाजलेले दाणे, १ चमचा तीळ घालावेत.
५. चवीप्रमाणे यावर मीठ घालावे म्हणजे या सॅलेडला चांगली चव येण्यास मदत होते.
६. डायबिटीस असणाऱ्यांनी कच्चे आणि ज्यूस करुन बीट खाऊ नये.
७. फोडणी करताना त्यामध्ये हळद घातल्यास इन्शुलिन नियंत्रणात राहण्यास चांगली मदत होते.
८. तसेच बीटाचे सॅलेड करण्यासाठी व्हिनेगर किंवा अॅपल सायडर व्हिनेगर वापरल्यास त्याचा चांगला फायदा होतो.