Join us  

घी राइस खाया क्या? घी राइस खाण्याचे 4 फायदे, तो करण्याची मस्त कृती. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2021 9:25 PM

How To make Ghee Rice: कम्फर्ट फूड च्या यादीतला एक पदार्थ म्हणजे घी राइस. अर्थात तूप भात. पण हा पदार्थ म्हणजे शिजवलेल्या भातावर तूप घालून खाणं नव्हे. तर घी राइस करण्याची पध्दत वेगळी आहे पण सोपी आहे. तसेच हा भात साधं वरणं, डाल तडका किंवा कोणतीही पातळ रश्याची भाजी यासोबत खाल्ला तरी मजा आणतो.

ठळक मुद्देशाकाहारींसाठी साजूक तूप आणि भात म्हणजे प्रथिनांचा उत्तम स्रोत मानला जातो. साजूक तूप आणि भात या दोन्ही गोष्टी पचनास चालना देतात.साजूक तूप आणि भात यांच्याद्वारे प्रथिनं आणि चांगले फॅटस मिळत असल्यानं घी राइस खावूनही पूृर्ण जेवणाचा आनंद मिळतो.

रोज दोन्ही वेळेस चारी ठाव जेवण करण्याचाही कंटाळा येतो. पदार्थांनी भरलेल्या ताटापेक्षा, ताटात आपल्या आवडीचे किंवा जिभेला आणि मनाला एकाच वेळेस आनंद देऊ शकतील असे मोजकेच एक दोन पदार्थ खावेसे वाटतात. असे कम्फर्ट फूड खाल्ल्याने जेवणातला तोचतोचपणा टाळला जातो, आलेला कंटाळा निघून जातो . पोट तर भरतंच पण मनाला आनंद मिळतो. अशा कम्फर्ट फूड च्या यादीतला एक पदार्थ म्हणजे घी राईस. अर्थात तूप भात. पण हा पदार्थ म्हणजे शिजवलेल्या भातावर तूप घालून खाणं नव्हे. तर घी राइस करण्याची पध्दत वेगळी आहे पण सोपी आहे. तसेच हा भात साधं वरणं, डाल तडका किंवा कोणतीही पातळ रश्याची भाजी यासोबत खाल्ला तरी मजा आणतो.

घी राइस खाल्ल्याने पोट भरतं शिवाय शरीराचं पोषणही होतं. आहार तज्ज्ञांनी हा घी राइस खाणं का महत्त्वाचं आहे याची कारणं सांगितली आहेत. ती वाचून आठवड्यातून एकदा तरी हा घी राइस आपण आवर्जून खाल्ल्याशिवाय राहाणार नाही. शिवाय हा भात इतका रुचकर लागतो की एका पेक्षा जास्त वेळा केला तरी कंटाळा येणार नाही.

Image: Google

  का खावा घी राइस?

1. शाकाहारींसाठी साजूक तूप आणि भात म्हणजे प्रथिनांचा उत्तम स्रोत मानला जातो जर त्यासोबत भाजी किंव वरण, आमटी असली की हा घी राइसमुळे संपूर्ण जेवण जेवल्याची भावना निर्माण होते आणि तसे घटकही शरीरात जातात.

2. साजूक तूप आणि भात या दोन्ही गोष्टी पचनास चालना देतात. त्यामुळे बध्दकोष्ठतेचा त्रास दूर होतो. तसेच केवळ एक अर्धा चमचा तूप खाल्ल्यानेही शरीरातील विषारी घटक बाहेर पडून ते डीटॉक्स होतं. तसेच भात  प्रोबायोटिकप्रमाणे काम करुन पचनाला मदत करणार्‍या आतड्यातील जिवाणूंना चालना देतो.

3. तुपामधील फॅटी अँसिड रक्तातील साखर नियंत्रित करण्यास, चयापचयाची क्रिया व्यवस्थित होण्यास मदत करतात. तुपामधे लिनोलेनिक अँसिड असतं जे हदयाशी संबंधित आजारांचा धोक कमी करतो.

4. साजूक तूप आणि भात यांच्याद्वारे प्रथिनं आणि चांगले फॅटस मिळत असल्यानं घी राइस कोणत्याही जेवणाच्या ( दुपारच्या / रात्रीच्या ) वेळेस खाल्ला तरी पोट भरल्याची जाणीव देतो आणि घी राइस खाऊन भरपूर वेळ पोट भरल्यासारखं राहातं.

Image: Google

घी राइस कसा करणार?

घी राइस करणं अतिशय सोपं आहे. त्यासाठी 1 मोठा चमचा साजूक तूप, 8 काजू, 2 छोटे चमचे बेदाणे, 1 तमाल पत्रं, 1 दालचिनीचा तुकडा, 1 हिरवा वेलदोडा, 5 लवंगा,काळी मिरे, अर्धा कांदा, 1 हिरवी मिरची दोन तीन तुकडे केलेली, 1 कप बासमती तांदूळ ( वीस मिनिटं आधी पाण्यात भिजवून घेतलेला) , 2 कप पाणी, 1 मोठा चमचा लिंबाचा रस आणि चवीपुरती मीठ एवढी सामग्री घ्यावी.

घी राइस करताना आधी तांदूळ निवडून स्वच्छ धुवून 20 मिनिटं भिजवावेत. नंतर त्यातलं पाणी काढून ते थोडा वेळ निथळत ठेवावेत. कढईमधे साजूक तूप घेऊन त्यात काजू आणि बेदाने लालसर परतून घ्यावेत. ते काढल्यानंतर त्यातच तमाल पत्र, दालचिनी, वेलची, लवंगा आणि काळी मिरी परतून घ्यावीत. ते परतले गेले की कांदा घालून तो सोनेरी रंगावर परतून घ्यावा. नंतर मिरचीचे तुकडे घालावेत. मिरची परतली की त्यात निथळून ठेवलेले तांदूळ घालून ते मिनिटभर परतावेत. तांदूळ परतले गेले की त्यात दोन कप पाणी, लिंबाचा रस आणि मीठ घालून ते चांगलं ढवळून घ्यावं. कुकरमधे करत असल्यास दोन शिट्या घेऊन गॅस बंद करावा. कढईतच शिजवणार असल्यास 20 मिनिट झाकून मंद गॅसवर शिजू द्यावा. सर्वात शेवटी तयार भातावर परतून बाजूला ठेवलेले काजू आणि बेदाणे घालावेत.