स्वयंपाकघरात प्रेशर कुकर किती महत्त्वाचा असतो हे वेगळं सांगण्याची गरज नाही. तो महत्त्वाचाच असतो हे गृहीतच धरलेलं असतं. वरण, भात, भाजी , उसळी यासाठी प्रेशर कुकर लागतोच. तो जरा काही बिघडला तर स्वयंपाकघरात गोंधळ उडालाच म्हणून समजा. कोणतंही यंत्र हे जपून वापरायचं असतं, नीट समजून उमजून वापरायचं असतं हा पहिला नियम. प्रेशर कुकर हे साध्या डिश वाटी प्रमाणं भांडं नसून तेही एक यंत्र आहे. त्यामुळे प्रेशर कुकरही जपून वापरायला हवा. प्रेशर कुकर हा जितका सोयीचा आहे तितकाच तो धोकादायक सुध्दा असतो. पण प्रेशर कुकरच्या या नकारात्म्क बाजूकडे लक्षच जात नाही. एखाद्या दिवशी वर्तमानपत्रात प्रेशर कुकरसंबंधी अपघाताची घटना वाचली की थोडा धक्का बसतो इतकंच. पण का झाला असेल प्रेशर कुकरनं अपघात, प्रेशर कुकर वापरताना काय काळजी घ्यायला हवी असे प्रश्न पडत नाही, त्याची उत्तरंही शोधली जात नाहीत. ज्या बिनधास्तपणे प्रेशर कुकर वापरण्याची आपली सवय असते, ती तशीच कायम राहाते. पण प्रेशर कुकरसंबंधीच्या आपल्या सवयी आपण तपासून पाहायला हव्यात. त्यात जर चुका असतील तर त्या वेळीच सुधरल्या तर प्रेशर कुकरही व्यवस्थित राहातो आणि आपल्या जिवाचा धोकाही टळतो.
प्रेशर कुकर हाताळताना कुकरचं झाकण, रिंग, शिटी, व्हॉल्व्ह, हॅण्डल या प्रत्येक भागाची नीट काळजी घ्यायला हवी. आपला प्रेशर कुकर नीट चालण्यासाठी हे सर्व घटक व्यवस्थित असणं फार महत्त्वाचं असतं. यातल्या कुठल्याही घटकाकडे दुर्लक्ष झाल्यास कुकर खराब होतो आणि अनपेक्षित अपघाताचाही धोका असतो.
छायाचित्र:- गुगल
प्रेशर कुकर वापरताना..
1. प्रेशर कुकर वापरताना कुकरची रिंग, शिट्टी, सेफ्टी व्हॉल्व्ह, झाकण लावताना ते नीट लावलं गेलं आहे की नाही हे नीट तपासून पाहायला हवं. कुकरची रिंग वर्षातून एकदा बदलायला हवी.
2. प्रेशर कुकर घेताना कायम आपण तो लिटरच्या प्रमाणात घेतो. म्हणजेच आपण आपल्या गरजेचा कुकरशी मेळ घालतो. पण हा मेळ प्रत्यक्ष कुकर वापरताना जुळतोच असं नाही. घरात जास्त माणसांचा स्वयंपाक असेल तर कुकरच्या क्षमतेचा विचार न करता कुकरमध्ये जास्त सामग्री घातली जाते. कुकर ब्लास्ट होण्याच्या ज्या घटना घडतात त्या कुकरमधे प्रमाणापेक्षा जास्त शिजवलं जाणं हे असतं.
प्रेशर कुकरमधे अन्न जास्त प्रमाणात शिजवायला ठेवलं तर कुकरमधला वाफेचा दाब जिथून बाहेर पडतो तिथे अन्न फसतं. वाफेला बाहेर जायला जागाच मिळत नाही. कुकरच्या आतल्या आत खूप वाफ तयार होते. कुकरच्या आत वाफेचा दाब निर्माण होतो आणि कुकरचा स्फोट होण्याची शक्यता वाढते. इलेक्ट्रिक प्रेशर कुकर वाफ जास्त झाली का आपोआप बंद होतो पण तसं गॅसवर ठेवून वापरल्या जाणार्या कुकरच्या बाबतीत होत नाही. म्हणूनच आपण कुकरमधे किती अन्न शिजवायला ठेवतो आहे याची कायम काळजी घ्यावी.
छायाचित्र:- गुगल
3. स्वयंपाक करताना तो निगुतीनं करणं, शांततेनं करणं आवश्यक असतं. ही बाब स्वयंपाक चवदार होण्यासाठी जितकी गरजेची असते तितकीच स्वयंपाक सुरक्षित होण्यासठी देखील महत्त्वाची असते. प्रेशर कुकरमधली पूर्ण वाफ गेल्याशिवाय कुकरचं झाकण उघडायचं नसतं. आणि जर उघडायचं झाल्यास आधी झाकणावरील शिट्टी काढून घ्यावी. शिट्टी काढून घेतल्यानंतर पूर्ण वाफ जावू द्यावी मग कुकर उघडावा. जर घाई घाईत कुकरखालचा गॅस बंद केल्यानंतर कुकरमधली वाफ पूर्ण शमलेली नसताना कुकरचं झाकण जोरकसपणे उघडल्या गेल्यास एकाच वेळी भरपूर वाफ बाहेर पडते, यामुळे हात, चेहेरा भाजण्याची शक्यता असते. एकदम वाफ बाहेर पडल्यामुळे भांड्यातील अन्न बाहेर येण्याची शक्यता असते. कुकरमधे अन्न जास्त असेल तर वाफेचा दाबही जास्त असतो, अशा वेळी जर वाफ न जाताच कुकरचं झाकण उघडलं तर कुकर फुटण्याची शक्यता असते.
4. कुकरमधे अन्न शिजवायला ठेवताना कुकरमधे पुरेसं पाणी घालणं आवश्यक असतं. कधीकधी चुकून पाणी कमी घातलं जातं. कुकर गॅसवर जास्त काळ राहातो, आतलं पाणी संपतं. हे आपल्याला करपल्यासारखा वास यायला लागला की कळतं. अशा वेळी आपण घाई घाई गॅस बंद करुन कुकर उघडायला घेतो, पण ही अत्यंत अयोग्य पध्दत आहे. कुकरमधलं पाणी संपलं असलं तरी कुकरमध्ये वाफ निर्माण झालेली असते.त्यामुळे कुकरचं झाकण एकदम न उघडता शिट्टी काढून घ्यावी. कुकरमधली वाफ बाहेर पडू द्यावी. आणि कुकर हा थोडा वेळ पाण्याखाली धरावा. तो थोड्यावेळ बाजूला ठेवावा आणि मग झाकण उघडावं. कुकर पाण्याखालून काढून लगेच झाकण् उघडणंही घातक ठरतं.
छायाचित्र:- गुगल
5. कुकरमधे शिजवायला ठेवलेल्या अन्नाची प्रकृती काय आहे हे आपल्याला माहिती असायला हवं, म्हणजे कोणता पदार्थ शिजल्यावर किती फुगतो हे माहित असलं तर कुकरमधे अन्न ठेवताना प्रमाणाकडे व्यवस्थित लक्ष राहातं. पण प्रमाणापेक्षा आधीच जास्त अन्न आणि तेही शिजून खूप फुलणारं असेल तर ते कुकरच्या झाकणाला चिकटून बसतं. अन्न नीट शिजतही नाही, आणि कुकरही खराब होतो. तसेच कुकरमधे जास्त आंबवलेले पदार्थ ठेवताना कुकरला शिट्टी लावू नये.