Join us  

 Diet Plan : चतुर्मास आणि आहार- वेटलॉस यांचं गणित जुळवता येतं, ऋजुता दिवेकर सांगतात त्यासाठी आहारसूत्र!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2021 2:10 PM

चतुर्मासाला जशी अध्यात्मिक आणि धार्मिक बाजू आहे तशी आरोग्याचीही बाजू आहे. किमान आरोग्याचा विचार करुन चतुर्मास पाळा असं म्हटलं जातं. अर्थात असा सल्ला फक्त घरातील जेष्ठ व्यक्ती देतात असं नाही. आहारतज्ज्ञ आणि आरोग्यतज्ज्ञही पावसाळ्यात चतुर्मासात खाणंपिणं सांभाळा असं सांगत असतात. प्रसिध्द आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी चतुर्मासात काय खावं आणि काय खाऊ नये याबाबत सविस्तर मार्गदर्शन केलं आहे.

ठळक मुद्दे चतुर्मासाचं एक वैशिष्ट्य असतं आणि तेच आपल्या आरोग्यावर परिणाम करत असतं.पावसाळा म्हणजे आहारात नैसर्गिक घटकांची संपन्नता असण्याचा काळ. ही संपन्नता आपल्या आहारात आणण्याची गरज आहे. वनभाज्या जीवनसत्वं आणि इतर पोषक घटकांचा खजिना असतो. तो चतुर्मासातील आपल्या आहारात असायलाच हवा.छायाचित्रं- गुगल

ऋतु बदलतो तसं आपणही बदलायला हवं. प्रत्येक ऋतु त्याचे त्याचे नियम आणि स्वभाव घेवून येतो. त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. ऋतुनुसार खाण्या-पिण्याचे, आहार विहाराचे नियम पाळले नाही तर पावसाळ्याचा मला त्रासच होतो, उन्हाळा मला बाधतोच, थंडीत मी आजारीच पडते असा अनेकींचा अनुभव असतो. इथे चूक त्या ऋतुची नसते. एक ऋतु जाऊन दुसरा ऋतु त्याची जागा घेतो, वातवरण बदलतं पण आपण आपल्य सवयीच बदलणार नसू तर मग आरोग्याच्या तक्रारी उदभवणारच.

छायाचित्र- गुगल

सर्व ऋतुत पावसाळ्यात खाण्या पिण्याची सर्वात जास्त काळजी घ्यायला हवी असं घरातली जेष्ठ मंडळी सांगत असतात. चतरुमास आहे, अमूक खा, तमूक खाऊ नका असे नियम मोठ्यांकडून घातले जातात. पण घरातल्या सर्वांनाच ते पटतात असं नाही. चतुर्मासाला जशी अध्यात्मिक आणि धार्मिक बाजू आहे तशी आरोग्याचीही बाजू आहे. किमान आरोग्याचा विचार करुन चतुर्मास पाळा असं म्हटलं जातं. अर्थात असा सल्ला फक्त घरातील जेष्ठ व्यक्ती देतात असं नाही. आहारतज्ज्ञ आणि आरोग्यतज्ज्ञही पावसाळ्यात चतुर्मासात खाणंपिणं सांभाळा असं सांगत असतात. प्रसिध्द आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी चतुर्मासात काय खावं आणि काय खाऊ नये याबाबत सविस्तर मार्गदर्शन केलं आहे.ऋजुता दिवेकर म्हणतात की, चतुर्मासाचं एक वैशिष्ट्य असतं आणि तेच आपल्या आरोग्यावर परिणाम करत असतं. चतुर्मासात हवामान सतत बदलत असतं. कधी खूप पाऊस असतो तर कधी एकदम गरम व्हायला लागतं. कधी कधी एकदम ऊन आणि थोड्याच वेळात धो धो पाऊस असं विचित्र हवामान चतुर्मासात अनुभवायला येतं. ¬जुता दिवेकर म्हणतात म्हणूनच आपण आपल्या आहारात सकारात्मक बदल करणं गरजेचं असतं. इतक्या बदलत्या वातावरणात आपली तब्येत तंदुरुस्त ठेवायची असेल तर आहार नियम पाळणं गरजेचं आहे.

छायाचित्र- गुगल

चतुर्मासात हे टाळाच

1.  पावसाळ्यात बाहेरचं खाऊ नका असा सल्ला मोठे जे देतात तो अगदी योग्य असल्याचा ऋजुता सांगतात. त्या म्हणतात की पावसाळा अनेक रोगाचे जीवाणू किटाणू घेऊन येतो. बाहेरच्या खाण्यातून ते सहज शरीरात प्रवेश करतात आणि आरोग्यास घातक ठरतात. आजरांच्या जीवाणू-विषाणू आणि किटाणुंपासून वाचायचं असेल तर चार महिने बाहेरचं न खाण्याचं पथ्यं पाळणं योग्य होईल 2. चतुर्मासात मांसाहार कमी करायला हवा. मांस, अंडे आणि मासे या काळात खाणं टाळावं. पावसाळ्यात मासे खाऊ नये कारण पावसाळा म्हणजे माशांचा प्रजनन काळ असतो. त्यामुळे मासे न खाण्याचा सल्ला दिला जातो. तसेच आहारात कांदा आणि लसूण यांचं प्रमाणही एकदम कमी करावं.

छायाचित्र- गुगल

चतुर्मासात काय खावं?

पावसाळ्यात एवढ्या गोष्टी टाळायच्या मग खायचं काय? या प्रश्नाला उत्तर देताना ऋजुता म्हणतात की, पावसाळा म्हणजे आहारात नैसर्गिक घटकांची संपन्नता असण्याचा काळ. या काळात मिळणारी फळं आणि भाज्या या खायलाच हव्यात. चतुर्मासात उपवासही खूप असतात. म्हणूनच आहारात राजगिरा, कुट्टू आणि केळाचं पीठ यांचा समावेश करवा. रताळी, अरबी ही कंदमुळं या काळात खाणं लाभदायक असतं.

* पावसाळ्यात बाजारात न पिकवता आलेल्या अनेक वनभाज्या येतात. या भाज्या केवळ पावसाळ्यातच उपलब्ध असतात. या वनभाज्या म्हणजे पोषण कमावण्याचा मुख्य स्त्रोत आहे. आळुची पानं, शेवळा, अंबाडी यासारख्या भाज्या आहारत असायला हव्यात.

छायाचित्र- गुगल

* ऋजुता म्हणतात आपण कुठेही राहात असलो तरी आपल्या आसपासच्या गावात जंगली भागात कुठली ना कुठली रानभाजी येते आणि ती बाजारात उपलब्ध असतेच. या वनभाज्या जीवनसत्वं आणि इतर पोषक घटकांचा खजिना असतो. तो चतुर्मासातील आपल्या आहारात असायलाच हवा. चतुर्मासातील हे आहार नियम आपल्या जसं आरोग्य जपण्यास मदत करतात तसेच वजन कमी करण्यासही मोठा हातभार लावतात. त्यामुळे ऋजुता दिवेकर म्हणतात त्याप्रमाणे चतुर्मासात आहारसूत्र हे पाळायलाच हवं.