Join us  

Diet Tips : डाळी आणि कडधान्यं खाण्याचे ३ महत्त्वाचे नियम, प्रोटीनच्या नावाखाली वाट्टेल तसं खाल तर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2022 11:53 AM

Diet Tips : घाईत असल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी काय भाजी करायची असा प्रश्न आपल्याला पडतो. घरात दुसरी कोणती भाजी नसेल की आपण पटकन एखादी डाळ किंवा कडधान्य भिजत घालतो आणि सकाळी ते परतून डब्यात देतो...असे करणे सोयीचे असले तरी फायदेशीर नक्कीच नाही...

ठळक मुद्देडाळींचे लाडू, डोसा, इडली, पापड, लोणची, हलवा, डाळ असे वेगवेगळे पदार्थ करता येऊ शकतात.    भारतात ६५ हजार डाळी आणि वेगवेगळ्या प्रकारच्या शेंगा मिळतात. त्यातील किमान ५ गोष्टींचा एका आठवड्यात खायला हव्यात

आपली तब्येत चांगली हवी तर आहार संतुलित हवाच. पण तो घेण्याची पद्धतही योग्य हवी (Diet Tips). आपण आहारात निमितपणे डाळी आणि कडधान्ये (pulses and legumes) खातो. पण त्या खाण्याची योग्य पद्धत काय? (Rite way to eat) कशा पद्धतीने खाल्ल्यास आपल्याला त्यातून जास्त पोषण मिळू शकते याबाबत आपल्याला पुरेशी माहिती असतेच असे नाही. ऑफीसला जायची घाई, घरातले इतर काम आणि स्वयंपाकाची घाई यामध्ये बरेचदा आपली तारांबळ उडते आणि घाईघाईत आपण स्वयंपाक करतो. तो चविष्टही होतो. पण त्यातून पोषण कितपत मिळते हा विचार करण्याचा मुद्दा आहे. हिच गोष्ट लक्षात घेऊन प्रसिद्ध आहारतज्ज्ञ ऋजूता दिवेकर डाळी आणि कडधान्ये खाण्याबाबत काही महत्त्वाचे नियम सागंतात. हे नियम फॉलो केल्यास आपण खात असलेल्या अन्नातून आपल्याला नक्कीच जास्त पोषण मिळण्यास मदत होईल. 

(Image : Google)

१. डाळी, कडधान्ये भिजत घाला आणि मोड आणणे गरजेचे आहे. अनेकदा आपण घाईत असल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी काय भाजी करायची असा प्रश्न आपल्याला पडतो. घरात दुसरी कोणती भाजी नसेल तर आपण मूग, चवळी, किंवा मसूर यांसारखी कडधान्ये रात्री भिजत घालतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्याची उसळ करतो. रात्रभर भिजवल्यामुळे हे कडधान्य हलके झालेले असले तरी मोड न आल्याने त्याची प्रक्रिया पूर्ण झालेली नसते. मोड आल्यास त्यांची प्रक्रिया पूर्ण होते आणि आपल्याला योग्य ते पोषण मिळते. डाळी किंवा शेंगा यांमध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन्स आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात. पण त्यातील अमिनो अॅसिड शरीरात जीरवणे आपल्याला वाटते तितके सोपे नसते. त्या डाळी किंवा धान्यांची योग्य ती प्रक्रिया पूर्ण झाली नाही तर आपल्याला गॅसेस, अपचन यांसारख्या तक्रारी उद्भवतात. ज्यांना अशाप्रकारच्या तक्रारी आहेत त्यांनी आपण डाळी आणि कडधान्ये कशापद्धतीने खातो याचा पुन्हा एकदा विचार करायला हवा. त्यामुळेच पोषण विरोधी घटक नष्ट होण्यासाठी आणि प्रोटीन आणि व्हिटॅमिन्स योग्य त्या प्रमाणात शरीराला मिळण्यासाठी त्यावर योग्य ती प्रक्रिया झालेली चांगली. 

२. तसेच कडधान्यांच्या उसळी नुसत्या खाऊन उपयोग नाही. तर त्यासोबत धान्यांचे प्रमाण योग्य असायला हवे. म्हणजेच उसळीसोबत पोळी, भाकरी किंवा भात खाणे गरजेचे आहे. या दोन्हींचे आहारातील गुणोत्तर योग्य असेल तर आरोग्यासाठी ते फायदेशीर ठरते. धान्यातील महत्त्वपूर्ण पोषक घटकांमुळे डाळी किंवा कडधान्ये यांचे योग्य पद्धतीने पचन होते आणि शरीराला आवश्यक असणारी पोषणमूल्ये मिळण्यास मदत होते. त्यामुळे तुम्ही लवकर वयस्कर होत नाही, हाडे मजबूत राहायला मदत होते आणि प्रतिकारशक्ती चांगली राहते. 

३. भारतात डाळी आणि कडधान्यांचे बरेच प्रकार पाहायला मिळतात. यातील जास्तीत जास्त प्रकारांचा आपल्या आहारात समावेश असेल असा प्रयत्न करायला हवा. ज्यामुळे आपल्याला सर्व प्रकारचे पोषक घटक मिळण्यास मदत होईल. तसेच या डाळी आपण वेगवेगळ्या प्रकारात खाऊ शकतो, त्या सगळ्या प्रकारांचा आहारात आवर्जून समावेश करायला हवा. भारतात ६५ हजार डाळी आणि वेगवेगळ्या प्रकारच्या शेंगा मिळतात. त्यातील किमान ५ गोष्टींचा एका आठवड्यात आपण नक्कीच समावेश करु शकतो. यामध्ये लाडू, डोसा, इडली, पापड, लोणची, हलवा, डाळ असे वेगवेगळे पदार्थ करता येऊ शकतात.   

टॅग्स :अन्नहेल्थ टिप्सआहार योजना