फिट आणि फाईन राहण्यासाठी आपली जीवनशैली चांगली असणे अतिशय आवश्यक असते. आता जीवनशैली म्हणजे काय तर आपण घेत असलेला आहार, व्यायाम, झोप, ताणविरहीत जीवन यांचा त्यामध्ये समावेश होतो. यामध्ये सर्वात महत्त्वाचा असतो तो आपला आहार. आपण जो आहार घेतो त्यानुसार आपली तब्येत चांगली राहण्यास मदत होत असते. सतत जंक फूड खाल्ले, अवेळी जेवलो किंवा खूप मसालेदार आणि शरीराला अनावश्यक असणारे घटक आहारात असतील तर शरीराला त्याचा काहीच फायदा होत नाही. महिलांना तर घरातील, बाहेरील, ऑफीसची आणि इतरही अनेक गोष्टी सांभाळायच्या असतात. ही सगळी शारीरिक कामे आणि मानसिक ताण यांमुळे आपल्याला फार थकून जायला होते. पण शरीरातील ताकद चांगले ठेवायची असेल तर आहारात (Diet Tips) काही गोष्टींचा आवर्जून समावेश करायला हवा. पाहूयात आहारात कोणत्या ४ गोष्टींचा समावेश केल्यास आपली तब्येत चांगली राहण्यास मदत होईल.
१. पालक
बाजारात अगदी सहज मिळणारी ही भाजी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आहारात आवर्जून असायला हवी. पालकामध्ये असणाऱ्या व्हिटॅमिन्समुळे स्नायूंना बळकटी मिळण्यास मदत होते. पालकाचा आहारात नियमित समावेश केल्यास तुम्हाला हळूहळू आपला स्टॅमिना वाढत आहे असे जाणवेल. पालकाची भाजी करण्याबरोबरच पालकाची भजी, पालक राईस, पालक पराठे, पालक पुऱ्या असे अनेक प्रकार करता येतात. त्यामुळे तुम्ही आहारात पालकाचा आवर्जून समावेश करा.
२. विविध प्रकारची धान्ये
आपल्याकडे जेवणात साधारणपणे गव्हाची पोळी आणि भात अशी दोन मुख्य धान्ये वापरली जातात. पण आपल्याकडे ज्वारी, बाजरी, नाचणी अशी इतर अनेक धान्येही पिकतात. केवळ गहू आणि तांदूळ खाण्याऐवजी या इतर धान्यांचाही आहारात समावेश करायला हवा. त्यामुळे आपल्या शरीराची ताकद वाढण्यास निश्चितच मदत होते. बराच वेळ शरीराची उर्जा टिकून राहण्यासाठी या धान्यांचा उपयोग होत असल्याने रोजच्या आहारात विविध प्रकारच्या धान्यांचा वापर आवर्जून करायला हवा.
३. केळं
केळं हे आपल्याकडेअगदी सहज मिळणारं फळ. तसंच केळ्याची किंमतही कमी असल्याने ते प्रत्येक जण सहज खरेदी करु शकतो. केळ्यामध्ये फायबर, पोटॅशियम, लोह आणि व्हिटॅमिन बी ६ असे शरीराला अतिशय आवश्यक असणारे घटक पुरेशा प्रमाणात असतात. केळं चवीलाही गोड असल्याने एक केळं खाल्ल्यास आपले पोट भरते आणि आपल्याला एकदम एनर्जी आल्यासारखे वाटते. त्यामुळे रोज एक केळं आवर्जून खायला हवं.
४. दाणे आणि बिया
आपल्या आहारात दाणे आणि बियांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे हे आपल्याला माहित असते. पण ते खायचा आपण कंटाळा करतो. दाणे, फुटाणे, सुकामेवा अशा गोष्टींचा आहारात आवर्जून समावेश करायला हवा. इतकेच नाही तर भोपळ्याच्या बिया किंवा इतरही बियांचा आहारात योग्य प्रमाणात समावेश हवा. दाणे आणि बिया या प्रकारातील गोष्टी शरीराला प्रोटीन आणि फायबर मिळण्यास उपयुक्त असतात. प्राणी बरेचदा बिया आणि दाणे प्रकार खाऊन जगत असल्याने त्यांच्याकडे असणारी ताकद किती जास्त असते हे आपल्याला माहित आहे. त्याचप्रमाणे दाणे, बियांचा समावेश केल्यास आपल्यालाही ताकद मिळू शकते.