Lokmat Sakhi >Food > Diet : बॅलन्स डाएट म्हणजे काय? पौष्टिक खाऊनही का होतात तब्येतीचे हाल?

Diet : बॅलन्स डाएट म्हणजे काय? पौष्टिक खाऊनही का होतात तब्येतीचे हाल?

शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपायचं असेल तर आपला आहार हा संतुलित असायल हवा. आणि आहार म्हणजे केवळ दोन वेळेसचं जेवण नसून दिवसभर आपण जे खातो पितो तो आहारच असतो. या दिवसभराचय खाण्या पिण्यात संतुलित आहाराचा विचार व्हायला हवा. आणि नुसता विचार नाही तर तशी कृती व्हायला हवी असं डॉक्टर्स आणि आहार तज्ज्ञ सांगतात. हा संतुलित आहार म्हणजे नक्की काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2021 01:39 PM2021-08-07T13:39:25+5:302021-08-07T13:45:32+5:30

शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपायचं असेल तर आपला आहार हा संतुलित असायल हवा. आणि आहार म्हणजे केवळ दोन वेळेसचं जेवण नसून दिवसभर आपण जे खातो पितो तो आहारच असतो. या दिवसभराचय खाण्या पिण्यात संतुलित आहाराचा विचार व्हायला हवा. आणि नुसता विचार नाही तर तशी कृती व्हायला हवी असं डॉक्टर्स आणि आहार तज्ज्ञ सांगतात. हा संतुलित आहार म्हणजे नक्की काय?

Diet: What is Balance Diet? Why do you get unhealthy even after eating nutritious food? | Diet : बॅलन्स डाएट म्हणजे काय? पौष्टिक खाऊनही का होतात तब्येतीचे हाल?

Diet : बॅलन्स डाएट म्हणजे काय? पौष्टिक खाऊनही का होतात तब्येतीचे हाल?

Highlightsशरीराचं पोषण तेव्हाच होतं जेव्हा उष्मांक ज्यातून मिळतील अशी ताजी हंगामी फळं, सर्व प्रकारच्या भाज्या, प्रथिनं आणि विविध धान्यं यांचा समावेश आपण आपल्या आहारात जाणीवपूर्वक करतो.पोषक घटकांचा समावेश असलेल्या संतुलित आहारामुळे मानसिक आरोग्य सुधारतं.डॉक्टर्स, आहारतज्ज्ञ हे नेहेमी संतुलित आहारावर भर देण्याचा सल्ला देत असतात. कारण संतुलित आहारामुळे आजारपणं दूर राहातात आणि स्थूलपणासारख्या समस्या दूर होतात.छायाचित्रं:- गुगल


उत्तम आरोग्यासाठी संतुलित आहार महत्त्वाचा असतो. हे वाक्य आपण सतत वाचत आणि ऐकत असतो. पण आपण जो आहार रोज घेतो तो संतुलित आहे का हे मात्र तपासून पाहात नाही. हे आपलं आपल्याला तपासून पाहाता यावं आणि त्यानुसार आपल्या आहारात योग्य ते बदल करुन तो संतुलित होण्यासाठी संतुलित आहाराची संकल्पना, त्याचे मार्ग आणि फायदे माहिती असायला हवेत. डॉक्टर्स, आहारतज्ज्ञ हे नेहेमी संतुलित आहारावर भर देण्याचा सल्ला देत असतात. कारण संतुलित आहारामुळे आजारपणं दूर राहातात आणि स्थूलपणासारख्या समस्या दूर होतात.

छायाचित्र:- गुगल

संतुलित आहार म्हणजे काय?

साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर संतुलित आहार म्हणजे असा आहार जो आपल्या शरीराला योग्य काम करता यावं यासाठी शरीराला आवश्यक सर्व पोषक घटकांचा पुरवठा शरीराला करतो. शरीराचं पोषण तेव्हाच होतं जेव्हा उष्मांक ज्यातून मिळतील अशी ताजी हंगामी फळं, सर्व प्रकारच्या भाज्या, प्रथिनं आणि विविध धान्यं यांचा समावेश आपण आपल्या आहारात जाणीवपूर्वक करतो. संतुलित आहाराकडे जर लक्ष दिलं नाही तर विविध आजार मागे लागण्याची शक्यता असते. ज्याचा परिणाम आपल्या रोजच्या जीवनावर आणि कामावर होतो.

* फळांमधे शरीरास आवश्यक अशी पोषक तत्त्व असतात. फळांमधे मिठाया किंवा गोड पदार्थ खाण्याची इच्छा कमी करण्याची क्षमता असते. फळांमधे नैसर्गिक साखर आणि फायबर असतं. हे दोन घटक आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवतात. त्यामुळे रोज एक तरी फळ खायलाच हवं. फक्त ज्यांना मधुमेह आहे त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार फळं खावीत.

* भाज्या हा तर रोजच्या आहाराचा महत्त्वाचा भाग असायला हवा. भाज्यांमधे भरपूर प्रमाणात जीवनसत्त्वं, खनिजं आणि अँण्टिऑक्सिडण्टस असतात. शरीरातील पोषणाची कमतरता भरुन काढण्यासाठी विविध रंगाच्या वेगवेगळ्या भाज्या खायला हव्यात. पालक, शेंग वर्गातल्या भाज्या, ब्रोकोली या भाज्या म्हणजे पोषणाचं भांडार आहेत.या भाज्या जेवणात असायलाच हव्यात. पण अनेकदा जे पोषक ते न आवडण्याची शक्यताच जास्त. जर भाजी आवडत नसेल तर या भाज्या सूप, सलाड, प्यूरी, ज्यूस आणि स्मुदी या स्वरुपात खाव्यात.

* शरीरावरील जखमा भरण्यासाठी, स्नायू मजबूत करण्यासाठी प्रथिनं ही पोटत जायलाच हवीत. प्रथिनांचा सर्वात सुरक्षित मार्ग म्हणजे वनस्पतीजन्य प्रथिनं. ही प्रथिनं शेंगदाणे, बदाम, शेंगवर्गीय विविध भाज्या, सोयाबीनचे पदार्थ यातून मिळतात. हे पदार्थ शरीराला प्रथिनांसोबतच फायबर आणि इतर पोषक घटकही पुरवतात.

* आपल्या भारतीय आहार संस्कृतीत अन्नधान्याला खूप महत्त्व आहे. गहू, ज्वारी, बाजरी, नागली , मका या धान्यांची पोळी, भाकरी ही रोजच्या जेवणात असायला हवी. आपल्या जेवणाला पूर्णत्त्व देण्याचं काम ही धान्यं करत असतात.

छायाचित्र:- गुगल

* उर्जा आणि पेशींच्या वाढीसाठी आहारात फॅटस असणंही आवश्यक आहे. फक्त फॅटचा समावेश खूप जपून आणि समजून उमजून करावा लागतो. जास्त फॅटयुक्त पदार्थ खाल्ले तर शरीरात जास्त उष्मांक तयार होतात . यामुळे वजन वाढतं. म्हणूनच आहार तज्ज्ञ सॅच्युरेटेड फॅटसच्या ऐवजी अनसॅच्युरेटेड फॅटस असलेले पदार्थ रोजच्या आहारात घ्यायला लावतात. ऑलिव्ह ऑइल, पीनट बटर, शेंगदाणा तेल, सनफ्लॉवर आणि कॉर्न ऑईल सारखे वनस्पती तेल, , बदाम शेंगदाणे, काजू, तीळ यातून शरीराला लाभदायी असलेले फॅटस मिळतात. या घटकातून शरीराला ऊर्जा तर मिळते पण वजन वाढत नाही.

* प्रथिनं, कॅल्शियम आणि ड जीवनसत्त्वासाठी दुग्धजन्य पदार्थही महत्त्वाची असतात. पण दुग्धजन्य पदार्थात जास्त फॅटस असतात. पण सर्वच दुग्धजन्य पदार्थात खूप फॅटस असतात असं नाही तर गाईचं दूध, दही, पनीर या घटकांमधे शरीरास उपयुक्त फॅटस असतात. हाडांचं आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी हे घटक आहारात असणं खूप महत्त्वाचं असतं.

छायाचित्र:- गुगल

संतुलित आहाराचे फायदे

1. संसर्गजन्य आजारांपासून स्वत:ची सुरक्षा करायची असेल तर संतुलित आहार आवश्यक आहे. आपल्या रोजच्या आहारात जीवनसत्त्वं, खनिजं आणि इतर सर्व पोषक तत्त्वं असतील तर आपली रोग प्रतिकार शकती वाढते. संतुलित आहार नियमित घेतल्यास कर्करोग, हदयरोग, मधुमेह यासारख्या आजारांचा धोका टळतो.

2. संतुलित आहारामुळे वजन नियंत्रित राहतं. वजन कमी करण्यासाठी वजन कमी करणारा आहार कायम घेत राहाणं शक्यही नसतं आणि त्यामुळे शरीराचं नुकसानही होतं. त्यामुळे संतुलित आहारच वजन नियंत्रित ठेवण्यास, कमी करण्यास आणि सोबत आरोग्य राखण्यास मदत करतो.

3. पोषक घटकांचा समावेश असलेल्या संतुलित आहारामुळे मानसिक आरोग्य सुधारतं. तज्ज्ञ म्हणतात की आहारात सर्व पोषक तत्त्वांचा योग्य मेळ नैराश्य , चिंता यासारख्या आजारांची लक्षणं कमी करतो.

शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपायचं असेल तर आपला आहार हा संतुलित असायल हवा. आणि आहार म्हणजे केवळ दोन वेळेसचं जेवण नसून दिवसभर आपण जे खातो पितो तो आहारच असतो. या दिवसभराचय खाण्या पिण्यात संतुलित आहाराचा विचार व्हायला हवा. आणि नुसता विचार नाही तर तशी कृती व्हायला हवी असं डॉक्टर्स आणि आहार तज्ज्ञ सांगतात.

Web Title: Diet: What is Balance Diet? Why do you get unhealthy even after eating nutritious food?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.