Join us  

गणपतीच्या नैवेद्यासाठी रव्याचे पांढरे शुभ्र आणि विड्याच्या पानाचे हिरवेगार मोदक, एकदम वेगळा प्रसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2022 8:23 AM

नेहमीच्या मोदकांपेक्षा वेगळ्या प्रकारचे मोदक (diffrent modak recipe) करायचे असतील तर रव्याचे उकडीचे आणि विड्याचे हिरवेगार मोदक अवश्य करुन पाहावे. दिसायला विशिष्ट आणि चवीला चविष्ट.

ठळक मुद्देरव्याची उकड काढताना पाण्यात साजूक तुपाऐवजी डालडा तूप घालावं.विड्याच्या पानाचे मोदक करताना फक्त सारण करावं लागतं. या मोदकांना पारीची गरज नसते. 

मोदक म्हटले की तळणीचे नाहीतर उकडीचे मोदक केले जातात. गणपतीसाठी वेगळ्या प्रकारचे  (different modak) मोदक करायचे असतील तर नेहमीपेक्षा वेगळे असे रव्याचे पांढरे शुभ्र आणि विड्याच्या पानांचे हिरवेगार मोदक करावेत.  हे मोदक दिसायला जितके विशिष्ट तितकेच चवीला चविष्ट असतात. वेगळं काही करण्याची हौस असेल तर हे मोदक अवश्य करुन पाहावे.

Image: Google

रव्याचे उकडीचे मोदक

रव्याचे उकडीचे मोदक करण्यासाठी 2 वाटी खोवलेलं नारळ, 2 वाटी साखर, 1 चमचा वेलदोडे पूड, 4-5 कुस्करलेले पेढे, 2-3 केळी, 6 वाट्या रवा, 7 वाट्या पाणी, 1 चमचा डालडा तूप आणि अर्धा चमचा मीठ घ्यावं. 

रव्याचे उकडीचे मोदक करताना एका भांड्यात खोवलेलं खोबरं, साखर, कुस्करलेले पेढे, बारीक चिरलेली केळी आणि वेलदोडे पूड एकत्र करुन सारण एकजीव करुन घ्यावं. एका भांड्यात पाणी गरम करुन त्यात मीठ आणि डालडा तूप टाकावं. पाण्याला एक उकळी आल्यावर त्यात रवा घालून तो पाण्यात घोटावा. झाकण ठेवून 5 ते 6 मिनिटं रवा वाफवून घ्यावा. एका परातीत रव्याची उकड काढून घ्यावी. ती चांगली मळावी. मोदकाच्या साच्यात छोटा गोळा घालून मध्ये खोलगट करुन खालच्या आणि बाजूच्या बाजूनं दाब द्यावा. त्यात सारण भरुन साचा अलगद बंद करावा. साचा उघडून मोदक बाहेर काढून ठेवावा. अशा प्रकारे सर्व मोदक बनवून घ्यावेत. मोदकपात्रात पाणी घालून उकळी आल्यावर मोदक वाफवायला ठेवावेत. 15-20 मिनिटं मोदक वाफवून घ्यावेत.  पांढरे शुभ्र रव्याचे मोदक तयार होतात. 

Image: Google

विड्याच्या पानाचे हिरवेगार मोदक

विड्याच्या पानाचे मोदक तयार करण्यासाठी 4 वाट्या ओल्या नारळाचा चव, 2 वाट्या खडीसाखरेची पूड, 2 वाट्या साखर, 7-8 विड्याची ताजी पानं, अर्धी वाटी दूध, 1 वाटी गुलकंद  आणि 2 चमचे वेलची पावडर घ्यावी.  

विड्याच्या पानाचे मोदक करताना विड्याची पानं दूध घालून मिक्सरमधून वाटून घ्यावी. कढईमध्ये खोवलेला नारळ, साखर आणि खडीसाखरेची पावडर घालून मिश्रण एकत्र करावं. कढई गॅसवर ठेवावी.  हे मिश्रण शिजताना सतत हलवत राहावं. मिश्रण थोडं गरम झालं की त्यात गुलकंद, वेलची पावडर घालावी.  मिश्रण कढईच्या कडेनं सुटू लागलं की गॅस बंद करावा. मिश्रण थंड होवू द्यावं. ते थंड झालं की मोदक साच्यात मिश्रण घालून मोदक तयार करुन घ्यावेत. विड्याची विशिष्ट चव असलेले हे मोदक खाताना छान रसरशीत लागतात. 

  

टॅग्स :गणेशोत्सवअन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.