रोज सकाळी उठल्यावर मुलांच्या आणि सगळ्यांच्याच डब्याला काय करायचं असा यक्षप्रश्न आपल्यासमोर असतो. यामध्ये पोळ्या किंवा फुलके तर रोजचे असतातच. फक्त भाजी कोणती करायची हा प्रश्न मात्र कायम असतो. अनेकदा मुलं पोळी-भाजी नको म्हणून रडरड करतात. मग आपण कधीतरी पुऱ्या, मेथीचे किंवा बटाट्याचे पराठे असे काही ना काही वेगळे करतो. पण एखाद दिवस गेल्यावर पुन्हा पोळ्या किंवा फरफारतर भाकरीवरच येतो. लहान मुलं काय किंवा मोठे काय हॉटेलमध्ये गेल्यावर जितक्या आवडीने आणि पोटभर जेवतात तेवढे घरात किंवा डब्यात दिल्यावर जेवतातच असे नाही. अशावेळी रोजच्याच गव्हाच्या पिठाचे थोडे वेगळ्या पद्धतीचे पराठे केले तर जेवणाची रंगत नक्कीच वाढेल. विशेष म्हणजे मुलांनाही आपल्यासाठी स्पेशल काहीतरी केलंय असं वाटेल आणि तेही न कुरकरुता ४ घास जास्त जेवतील. डब्यालाच नाही तर कधीतरी नाश्त्यालाही हे गरमागरम पराठी आपण नक्कीच करु शकतो. पाहूयात या आगळ्यावेगळ्या पराठ्यांची खास रेसिपी (Different Types of Roti Cooking Tips Recipe)...
१. मलई पराठा
१. कणीक थोडी मऊ भिजवून घेऊन आपण पोळी लाटतो त्याप्रमाणे पुरीइतक्या आकाराची पोळी लाटून घ्या.
२. त्यामध्ये साजूक तूप लावून ते बोटाने सगळीकडे पसरुन घ्या.
३. या पुरीला चारही बाजुने आतमध्ये घडी घालून घ्या.
४. मग ही घडी लाटून जाडसर पराठा करा.
५. चौकोनी आकाराचा हा पराठा तव्यावर चांगला भाजून घ्या आणि भाजतानाही याला तूप लावा.
२. लच्छा पराठा
१. नेहमीपेक्षा थोडी जास्त कणीक घेऊन हाताने हा गोळा पोळपाटावर वळून घ्या.
२. कणकेचा लांब रोल गोलाकार फिरवून त्याचा पुन्हा गोळा करुन घ्या.
३. वरच्या बाजुला हाताने हा गोळा दाबून हलक्या हाताने पराठा लाटा.
४. या पराठ्याला छान लेयर पडत असल्याने तो खाताना छान लागतो.
५. हा पराठा भाजताना याला तव्यावर चांगले तूप लावा.
3. बटर लसूणी नान
१. थोडी आडवी पोळी लाटून घ्या आणि त्यावर बटर लावा.
२. त्यावर काळे तीळ, बारीक केलेला लसूण आणि कोथिंबीर घाला.
३. पराठा तव्यावर तूप घालून त्यावर छानसा खरपूस भाजून घ्या.
४. हॉटेलमध्ये ज्याप्रमाणे गार्लिक नान मिळते त्याचप्रमाणे हे नान अतिशय छान लागते.