३१ डिसेंबर म्हणजे सरत्या वर्षाला निरोप देण्याचा दिवस. नवीन वर्षाचे स्वागत करताना आपल्या कुटुंबातील मंडळी, मित्रमंडळी आपल्या सोबत असावीत असं आपल्याला वाटतं. त्याचदृष्टीने आपण या दिवशी गेटटूगेदर प्लॅन करतो. आपल्याकडे बरेच जण येणार असतील की खायला काय करायचे असा एक मोठा प्रश्न महिला वर्गापुढे उभा असतो. अनेकदा आपल्याला सतत विकतचे नको वाटते, अशावेळी घरीच पण झटपट होईल आणि पोटभरीचं असं काय करायचं असा प्रश्न आपल्याला पडतो (Dinner Menu For 31st December Party).
लहान मुलं आणि मोठे असा सगळ्यांचा विचार करुन काहीतरी करायचं म्हणजे कसरत असते. झटपट होणारा मेन्यू असेल तर महिलाही स्वयंपाकघरातून थोड्या मोकळ्या होतात आणि सगळ्यांसोबत मज्जा-मस्ती करु शकतात. पाहूयात असेच काही हटके पर्याय...
१. मटार उसळ आणि ब्रे़ड
सध्या मटारचा सिझन असून बाजारात हिरवेगार मटार मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत. खोबरं, मिरची, कोथिंबीर, आलं, मिरची यांची पेस्ट करुन त्यामध्ये ही उसळ अतिशय छान होते. गव्हाचा ब्रेड किंवा साध्या ब्रेडसोबत ही गरमागरम उसळ फारच चविष्ट लागते. थंडीच्या दिवसांत हा मेन्यू सगळ्यांना आवडणारा असतो. यासोबत सलाड, गुलाबजाम, जिलेबी असे काहीही आणू शकतो.
२. चाट
चाटमध्ये आपण रगडा पुरी, पाणीपुरी, शेव-बटाटा पुरी, भेळ असे सगळे प्रकार करु शकतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच चाटचे प्रकार आवडत असल्याने त्यावर सगळेच ताव मारतात. चुरमुरे, फरसाण, पुऱ्या बाजारातून आणल्यावर तिखट पाणी आणि गोड चिंचेची चटणी आपण घरात करु शकतो. बटाट्याच्या टिक्कीही करायला सोप्या असतात. याशिवाय वाटाण्याची किंवा मूगाची उसळ आणि कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, चाट मसाला अशा मोजक्या पदार्थांत चांगला मेन्यू करता येतो. याच्या जोडीला गरमागरम सूप किंवा कॉफी असेही ठेवू शकतो.
३. छोले-पुरी
छोल्याची उसळ हा अनेकांचा आवडता मेन्यू असतो. ही उसळ करायलाही तुलनेने सोपी असते. यासोबत गरमागरम पुऱ्या आणि सलाड, जीरा राईस असा मेन्यू आपण करु शकतो. थंडीच्या दिवसांत गरम आणि चमचमीत खावेसे वाटत असल्याने हा मेन्यू ३१ डिसेंबरच्या पार्टीसाठी अतिशय छान होऊ शकतो.