Join us  

भाजी-पदार्थात तिखट चुकून जास्त पडले? ८ उपाय- तिखटपणा कमी होईल- चवही बिघडणार नाही!!!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2023 5:41 PM

Use These Simple Hacks To Fix Your Extra Spicy Food : कामाच्या गडबडीत स्वयंपाक करताना आपल्या हातून मीठ किंवा मसाले जास्त पडतात यासाठी सोपे उपाय...

स्वयंपाक करताना आपण पदार्थांची चव वाढवण्यासाठी वेगवेगळ्या मसाल्यांचा वापर करतो. खरंतर प्रत्येक पदार्थानुसार आपण त्यात विविध चवींचे मसाले घालतो. गरम मसाला, लाल मिरची पावडर, भाजीचा मसाला, आमटीचा मसाला, गोडा मसाला, काश्मिरी लाल तिखट मसाला अशा असंख्य मसाल्यांचा वापर आपण रोजच्या जेवणात करतो. हे मसाले योग्य प्रमाणांत पदार्थांत घातले तरच पदार्थाची चव चाखायला मजा येते. मसाले जसे पदार्थांना चव आणतात तसेच ते जर चुकून जास्त पडले तर पदार्थांची चव बिघडू सुद्धा शकतात.

बऱ्याचदा कामाच्या गडबडीत स्वयंपाक करताना काही गोष्टी कमी जास्त होऊ शकतात. कधी कधी जेवणात आपल्या हातून मीठ किंवा मसाले जास्त पडतात. अशावेळी आपण तयार केलेला पदार्थ वाया जाण्याची शक्यात असते. जेवणात चुकून जास्त लाल तिखट पडले तर काय करावे हा प्रश्न बऱ्याच गृहिणींना सतावतो. अशावेळी पदार्थांतील तिखटपणा कमी करण्यासाठी काय करावे यासाठी काही टिप्स आहेत, ज्या उपयोगात आणून आपण पदार्थांतील तिखटपणा कमी करू शकता(Use These Simple Hacks To Fix Your Extra Spicy Food).

सुप्रसिद्ध मास्टरशेफ पंकज भदौरिया यांनी आपल्या masterchefpankajbhadouria या इंस्टाग्राम पेजवरून जेवणातील पदार्थांमध्ये चुकून लाल तिखट  जास्त झाले असेल तर, हा तिखटपणा कसा कमी करायचा यासाठी काही उपाय सांगितले आहेत. 

१. रस्सेदार किंवा ग्रेव्ही भाज्यांमधील तिखटपणा कमी करण्यासाठी :- 

१. रस्सेदार किंवा ग्रेव्ही भाज्यांमधील तिखटपणा कमी करण्यासाठी त्यात दूध, दही, क्रिम घालावी यामुळे या ग्रेव्ही प्रकारांतील भाज्यांचा तिखटपणा कमी होतो त्याचप्रमाणे ग्रेव्ही घट्ट होण्यास मदत होते. लाल तिखटामध्ये केमिकल कंपाऊड असतात. ज्यामुळे पदार्थ तिखट होतो. हा घटक कमी करण्याची क्षमता दूधाच्या पदार्थांमध्ये असते. एखादा तिखट पदार्थ कमी तिखट करण्यासाठी त्या पदार्थामध्ये दूध, दही, क्रीम, चीज, पनीर असे पदार्थ मिसळू शकता. ज्यामुळे पदार्थांला छान चव येतेच शिवाय तिखटपणाही कमी होतो.

२. सुक्या भाजीतील तिखटपणा कमी करण्यासाठी :- 

१. सुक्या भाजीतील तिखटपणा कमी करण्यासाठी त्यात घरी बनविलेले घट्ट तूप घालावे. यामुळे सुक्या भाजीतील तिखटपणा कमी होण्यास मदत होते. सुक्या भाजीमधील तिखटपणा कमी करण्यासाठी त्यात थोडे बेसन भाजून ते मिसळा. याने सुक्या भाजीचा तिखपणा कमी होईल.

 

पदार्थांतील तिखटपणा कमी करण्यासाठी काही इतर उपाय :- 

१. आंबट वस्तू मिसळा - स्वयंपाकातील एखाद्या पदार्थामध्ये लाल तिखट जास्त झालं तर आंबट पदार्थ मिसळून तुम्ही तो तिखटपणा कमी करू शकता. जसं की लिंबू, व्हिनेगर, आंब्याची साल अथवा कोकम अशा पदार्थांमध्ये टाकल्यास आंबटपणा वाढतो आणि तिखटपणा बॅलेन्स होतो. अगदी काहीच नाही तर आपण  अशा वेळी भाजी किंवा ग्रेव्हीमध्ये टोमॅटोची प्युरी मिसळून पदार्थाचा तिखटपणा बॅलन्स करू शकतो. 

२. गूळ किंवा साखर - गोडामुळे तिखटपणा लगेच कमी होतो. त्यामुळे एखाद्या पदार्थामधील तिखटपणा कमी करण्यासाठी आपण वरून साखर किंवा गूळ मिसळू शकता. साखर किंवा गूळ मिसळण्यामुळे भाजी किंवा आमटीची चव आणखीन छान होते.

३. नारळाचा रस - रस्सेदार किंवा ग्रेव्ही भाज्यांमध्ये लाल तिखट जास्त पडले असेल तर या पदार्थामध्ये सर्वात शेवटी नारळाचा रस घालू शकता. जर भाजी कोरडी असेल तर ओला नारळ किसून घालावा. नारळाचा रस किंवा नारळ खवून घातल्याने पदार्थांची चव वाढेल आणि तिखटपणा कमी होईल. 

४. लिंबाचा रस - भाजी किंवा इतर पदार्थांमध्ये जास्त तिखट झाल्यास आपण त्यात लिंबाचा रस घालून त्याचा तिखटपणा कमी करु शकतो. भाजीमध्ये लिंबाचा रस वापरल्यास चव वाढेल आणि तिखटपणा देखील कमी होईल.

५. मैद्याचे पीठ - भाजीचा तिखटपणा कमी करण्यासाठी आपण मैद्याचे पीठ वापरू शकता. यासाठी आधी मैद्याचे पीठ हलके भाजून घ्या. त्यानंतर ते भाजीत मिसळा. असे केल्याने भाजीची ग्रेव्ही घट्ट होईल आणि तिखटपणाही कमी होईल.

६. बटाट्याचे काप - जर कोणतीही सुकी भाजी तिखट झाली असेल तर त्यात बटाट्याचे काप करून घालावेत यामुळे भाजीचा तिखपणा कमी होतो. बटाटा भाजीतील अतिरिक्त मसाला व मीठ शोषून घेतो. त्यामुळे जर भाजीत मसाला किंवा मीठ जास्त झाले असेल तर त्यात बटाट्याचे काप घालावेत. याबरोबरच उकडलेले बटाटे स्मॅश करून भाजीत मिसळून तिखटपणा कमी करता येतो. 

७. डाळीचे पीठ - डाळीच्या पीठाने देखील तिखटपणा कमी होतो. डाळीचे पीठ कच्चे न घालता थोडे भाजून मग घालावे. 

८. टोमॅटोचे काप - भाजीमध्ये टोमॅटोचे काप करून घातल्यास तिखटपणा कमी होतो. टोमॅटोचे काप घालण्यासाठी प्रथम हे काप तेलावर हलके भाजून घ्या. टोमॅटोचे काप किंवा त्याऐवजी आपण टोमॅटोची प्युरी वापरून देखील पदार्थातील तिखटपणा कमी करू शकता.

टॅग्स :किचन टिप्सअन्नपाककृती