Join us  

दीप अमावस्या स्पेशल : कणकेचे - बाजरीचे दिवे करण्याची पारंपरिक रेसिपी, दिव्याच्या आवसेला गोड दिवे हवेतच..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2023 2:02 PM

Dip Amavasya Kanik Dive Recipe : पूर्वापार चालत आलेली कणकेच्या दिव्यांची रीत, पाहा रेसिपी...

आपल्याकडे प्रत्येक अमावस्येचे वेगवेगळे महत्व सांगण्यात आले आहे. त्याप्रमाणे आषाढ महिन्यातील अमावस्येला दिव्याची आवस किंवा दीप अमावस्या म्हणून ओळखले जाते. आज या अमावस्येच्या दिवशी सोमवार आल्याने तिला सोमवती अमावस्या म्हटले गेले आहे.  दीप पूजनाला आपल्याकडे विशेष महत्त्व असल्याने  कोणत्याही कार्यक्रमापूर्वी आपण आवर्जून दिप प्रज्वलन करतो(Dip Amavasya Kanik Dive Recipe). 

आज दिव्यांच्या अमावस्येच्या निमित्ताने देवापुढे विविध प्रकारचे दिवे मांडून त्यांची पूजा केली जाते घरातील दिव्यांबरोबरच आजच्या दिवशी कणकेचे दिवे बनवण्याची पद्धत आहे. या दिवशी कणकेचा दिवा करून लावल्याने पुर्वजांच्या आत्म्यास शांती लाभते असे म्हटले जाते. काही जणांकडे हे दिवे गोड करतात तर काही जणांकडे हळद घालून साधे करतात. अनेक घरांमध्ये बाजरीच्या पिठाचे दिवे करण्याचीही पद्धत आहे. आता हे दिवे कसे करायचे पाहूया...

१. कणकेचे गोड दिवे

एका बाऊलमध्ये गूळ घेऊन त्यात पाणी घालून हा गूळ विरघळून घ्यायचा. त्यानंतर दुसरीकडे कणकेत थोडेसे मीठ आणि तेल घालून त्यामध्ये गुळाचे पाणी घालायचे आणि त्याची घट्टसर कणीक मळायची. या कणकेतून छोटे गोळे काढून या गोळ्यांना मध्यभागी बोटाने दाबून पुढे वातीसाठी टोक काढायचे. एकसारखे दिवे केल्यानंतर त्यामध्ये तूप आणि फुलवात घालून देवापुढे या दिव्यांचा नैवेद्य दाखवायचा. घरातील मुलाबाळांना या दिव्यांनी ओवाळण्याचीही रीत आहे. 

२. कणकेचे पिवळे दिवे

कणकेमध्ये मीठ, हळद आणि तेल घालून कणीक मळायची आणि त्याचे पणतीच्या आकाराचे लहान लहान दिवे करायचे. काही जण याचे पाच वाती ठेवता येतील असेही पसरट दिवे करतात. यातही तेलाच्या किंवा तुपाच्या वाती लावतात.

(Image : Google)

३. बाजरीचे दिवे

बाजरीच्या पिठात गूळ घालून त्याचे दिवे करण्याची पद्धत आहे. ग्रामीण भागात आजही हे दिवे आवर्जून केले जातात. बाजरीचे असल्याने हे दिवे कणकेच्या दिव्यांपेक्षा जास्त पौष्टीक असतात. नीट वळले जाण्यासाठी यामध्ये थोडे ज्वारीचे पीठ घातले तरी चालते. 

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.