भात पचायला हलका असतो, पोळी खाण्यापेक्षा गरमागरम भात आपल्याला आवडतो म्हणून आपण अनेकदा भात-आमटी, भात-वरण किंवा भात आणि भाजी खाणे पसंत करतो. लहान मुलांना तर दूध सोडल्यानंतर सगळ्यात आधी भातच दिला जातो. त्यामुळे भात आपल्याकडे प्रामुख्याने खाल्ला जाणारा पदार्थ. पोळी-भाजी काहीवेळा कोरडी, कंटाळवाणी होऊ शकते. अशावेळी भात असेल तर आपण भातालाच प्राधान्य देतो. अनेकांना तर भात खाल्ल्याशिवाय जेवण झाल्यासारखे वाटत नाही. नेहमी तोच तोच पांढरा भात खाल्ला की कंटाळा येतो म्हणून आपण भाताचे, खिचडी, पुलाव, मसालेभात, जीराराईस, मसूरभात, पालकभात दहीभात असे वेगवेगळे प्रकारही करतो. पोळीपेक्षा भात करणेही तुलनेने सोप असल्याने आपल्याकडे भात जास्त प्रमाणात खाल्ला जातो. पण भात आपल्या आरोग्यासाठी खरंच किती फायदेशीर असतो हे पाहणेही तितकेच महत्त्वाचे आहे (Disadvantages of Eating Rice Daily).
१. डायबिटीसचे प्रमाण वाढते
भातामध्ये कॅलरीजचे प्रमाण जास्त असते. भातामुळे शरीरातील साखरेची पातळी वाढते. जास्त प्रमाणात भात खाल्ल्याने मधुमेहाचा धोका वाढू शकतो. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी भाताचे सेवन अतिशय कमी प्रमाणात करायला हवे.
२. वजन वाढते
शिजवलेल्या भातामध्ये कॅलरीजचे प्रमाण खूप जास्त असते, त्यामुळे दररोज जास्त प्रमाणाता भात खाल्ल्याने वजन वाढू शकते. त्यामुळे ज्यांचे वजन जास्त आहे अशांना वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी भात मर्यादित प्रमाणात खाण्याचा सल्ला आहारतज्ज्ञांकडून दिला जातो.
३. हृदयरोगाची शक्यता
अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रीशनच्या एका संशोधनानुसार, जास्त प्रमाणात भात खाणे हृदयाच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकते. भातामुळे हार्ट अॅटॅकचा धोका वाढण्याची शक्यता असल्याने रोजच्या आहारात भाताचा योग्य प्रमाणातच समावेश करायला हवा.
४. गॅसेसचा त्रास
तुम्हाला भात खूपच आवडत असेल तर नेहमी पांढरा तांदूळ खाण्यापेक्षा आपण ब्राऊन राईस, म्हणजेच हातसडीचा तांदूळही खाऊ शकतो. पांढऱ्या तांदळात फायबरचे प्रमाण तुलनेने कमी असते, त्यामुळे हा भात जास्त प्रमाणात खाल्ल्यास गॅसेसची समस्या होऊ शकते. यामुळे पोट जड होणे, फुगणे, पोटात किंवा छातीत गॅसेस फिरणे अशा समस्या निर्माण होतात. त्यामुळे ज्यांना गॅसेसचा त्रास आहे अशांनी कमी प्रमाणात भात खायला हवा.