दिवाळी हा झगमगता सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अनेक जणांची फराळ बनवण्याची लगबग सुरू आहे. दिवाळीच्यानिमित्ताने अनेक पाहुणे, नातेवाईक आणि मित्रमंडळी घरी येत असतात. त्यांना देण्यासाठी आपण खास मिठाई दुकानातून खरेदी करून एक गोड भेट म्हणून त्यांना देत असतो. मात्र, काही मिठाईमध्ये भेसळयुक्त पदार्थ मिसळले जातात. त्यामुळे मिठाई खरेदी करताना आपण थोडा विचार करतो. मात्र खिशाला परवडणारी मिठाई तुम्ही घरीही बनवू शकाल. कमी साहित्यात उत्तम पदार्थ तयार. बघा घरी कसं करायचं केशर श्रीखंड, मोहनथाळ.
केशर श्रीखंड बनवण्यासाठी साहित्य
केशर - एक चिमूटभर
दही - १ किलो
पिठीसाखर - १ वाटी
उकळलेले दूध - २ टीस्पून
जायफळ पावडर - १ टीस्पून
बारीक वेलाची पावडर - टीस्पून
बदाम - ५-६
पिस्ता - ८-१०
कृती :-
एका मलमलच्या कपड्यात दही रात्रभर बांधून फ्रीजमध्ये एका भांड्यावर टांगून ठेवा. ही प्रक्रिया त्यातील सर्व अतिरिक्त पाणी काढून टाकेल. हे काढून टाकलेले दही एका भांड्यात ठेवा आणि त्यात पिठीसाखर टाका. कोमट दुधात केशर मिसळा, थंड झाल्यावर ते या दह्यात टाका. यानंतर त्यात जायफळ आणि वेलची पावडर टाकून नीट एकत्रित करून थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवा. सोललेली आणि चिरलेली बदाम आणि पिस्ते घालून सजवा आणि थंडगार केशर श्रीखंड सर्व्ह करा.
मोहनथाळ बनवण्यासाठी साहित्य
बेसन - २ कप
तुप - १ कप, ३ चमचे
दूध - ६ टीस्पून
साखर - कप
गुलाबपाणी - १ टीस्पून (ऐच्छिक)
वेलची पावडर - १टीस्पून
केशर - १ टीस्पून
बारीक चिरेला पिस्ता -१ टीस्पून
बारीक चिरलेली बदाम - १ टीस्पून
कृती :-
अर्धा चमचा कोमट पाण्यात केशर मिसळून ठेवा. यानंतर बेसनाच्या पिठात ३ चमचे तूप आणि ३ चमचे दूध टाकून हाताच्या सहाय्याने चांगले एकत्र करून घ्या. या पिठात गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी करा. एकसमान होण्यासाठी ते दाबून झाकून ठेवा. अर्ध्या तासानंतर हे पीठ हाताने फोडून जाड छिद्रे असलेल्या चाळणीने चाळून घ्या. तांब्याच्या भांड्याला तूप लावून ते १ मिनीटासाठी मंद आचेवर गरम करा. त्यात चाळलेले बेसनचे पीठ घालून मध्यम आचेवर ५ मिनिटे ठेवा. हे मिश्रण सातत्याने परतवत रहा. मिश्रण तपकिरी होईपर्यंत भाजून घ्या. यानंतर हे मिश्रण १५ मिनीटांपर्यंत थंड करा.
आता एका नॉन-स्टिक पॅनमध्ये १ कप पाण्यात साखर टाका आणि २ मिनिटे मंद आचेवर शिजवा. नंतर गॅस कमी करा आणि हे पाणी उकळायला लागले की, त्यात २ चमचे दूध मिसळा. आता हे मिश्रण मंद आचेवर ढवळत असताना ३-४ मिनिटांसाठी शिजवून घ्या. पाक झाला की आता त्यात गुलाबजल टाकून बाजूला ठेवा. थंड झालेल्या बेसनामध्ये केशर पाणी, वेलची पूड आणि साखरेचा पाक मिक्स करून ३-४ मिनिटांसाठी ढवळत रहा. यानंतर हे मिश्रण ताटात थापून वड्या पाडून घ्या.