Join us  

फराळाचे तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळलात? पदार्थ तेच, खाण्याची पद्धत निराळी; ट्राय करा चविष्ट कॉम्बिनेशन्स...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2022 3:52 PM

Diwali Faral Food Combinations : आहेत तेच पदार्थ थोडे वेगळ्या पद्धतीने खाल्ल्यास वेगळं काही खाल्ल्याचा आनंद तर मिळतोच पण या पदार्थांचा कंटाळाही येत नाही.

ठळक मुद्देचिवड्यावर आपण आपल्या आवडीनुसार मटकी, कांदा, कोथिंबीर असे काहीही घालून खाल्ले तरी ते चविष्ट लागते.४ दिवसांनंतर फराळाचे पदार्थ खाऊन कंटाळा आला तर नक्की ट्राय करा हे हटके कॉम्बिनेशन्स

दिवाळी म्हटली की फराळ ओघानेच आला. दिवाळीच्या फराळाचे महत्त्व पूर्वीपेक्षा थोडे कमी झाले असले तरी आपण सगळे आवर्जून या दिवसांत चिवडा, लाडू, शंकरपाळी, चकली यांसारखे पदार्थ खातोच. सकाळी अभ्यंग स्नान करुन केला जाणारा फराळ असो किंवा कोणाच्या घरी जाऊन केला जाणारा फराळ. तेच तेच पदार्थ खाऊन आपल्याला २ दिवसांनी कंटाळा यायला लागतो. इतकेच नाही तर यातील बहुतांश पदार्थ कोरडे असल्याने त्याने पुरेसे पोट भरल्यासारखेही वाटत नाही. थंडी सुरू झाल्याने आधीच बद्धकोष्ठतेचा होणारा त्रास आणि त्यात हे फराळाचे पदार्थ. अशात आहेत तेच पदार्थ थोडे वेगळ्या पद्धतीने खाल्ल्यास वेगळं काही खाल्ल्याचा आनंद तर मिळतोच पण या पदार्थांचा कंटाळाही येत नाही. पाहूयात फराळाच्या पदार्थांचे भन्नाट कॉम्बिनेशन्स (Diwali Faral Food Combinations)....

१. शंकरपाळी

शंकरपाळी म्हटली की ती मैद्याची किंवा रव्याची केली जातात. गोडी शंकरपाळी तोंडात टाकल्यावर विरघळावीत अशी असतील तर ठिक आहे. नाहीतर त्याचे प्रमाण कमी, जास्त झाले तर मात्र ही शंकरपाळी काही केल्या संपत नाहीत. अशावेळी  ही शंकरपाळी दुधामध्ये बुडवून खाल्ल्यास खूप छान लागतात. इतकेच नाही तर अनेकांकडे चहा आणि शंकरपाळी हे आवर्जून खाल्ले जाणारे कॉम्बिनेशन आहे. 

(Image : Google)

२. चकली-कडबोळी

चकली खुसखुशीत आणि चविष्ट झाली तर ४ दिवसांत डबा रिकामा होतो. पण हिच चकली थोडी कडक किंवा वातट झाली तर मात्र त्याकडे कोणी बघतही नाही. चकलीची भाजणी भाजलेली असल्याने ती काहीशी कोरडी असते. त्यामुळे चकल्या वजनाने हलक्या असल्याने त्या खाल्ल्या तरी खाल्ल्यासारखे वाटत नाही. अशावेळी चकली दह्यासोबत खावी. ताजं-गोड आणि खवल्यांचं दही असेल तर त्यासोबत चकली अतिशय चविष्ट लागते. 

३. चिवडा-शेव

चिवड्यामध्ये घरोघरी वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात. पातळ पोहे, भाजके पोहे, नायलॉन पोहे अशा विविध प्रकारच्या पोह्यांचा चिवडा केला जातो. चिवडाही थोडा खायला बरा वाटतो. मात्र आधीच हवेत कोरडेपणा आणि त्यात कोरडा चिवडा नकोसा वाटतो. अशावेळी चिवड्यावर बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, लिंबू आणि शेव घालून खाल्ल्यास पोटभरीचेही होते आणि चविष्टही लागते.    

(Image : Google)

 

टॅग्स :अन्नदिवाळी 2022