Join us  

शिल्पा शेट्टी सांगते चिवड्याची खास रेसिपी, पाहा ती कसा करते दिवाळी स्पेशल हेल्दी चिवडा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2023 4:38 PM

Diwali Faral Healthy Chiwda Reciepe by Actress Shilpa Shetty : झटपट होणारी, सोपी आणि तरीही चविष्ट-पौष्टीक अशी ही रेसिपी यंदाच्या दिवाळीत नक्की ट्राय करा..

प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी अभिनयाच्या बाबतीत जितकी सरस आहे तितकीच ती तिच्या फिटनेसबाबतही जागरुक असते. बॉलिवूडची फिटनेस क्वीन म्हणून ओळख असलेली शिल्पा तिच्या रुटीनमध्ये व्यायाम, आहार, मानसिक आरोग्य यांसाठी विशेष प्रयत्न करत असल्याचे दिसते. यामुळेच वयाच्या पन्नाशीतही शिल्पाचा फिटनेस तिशीच्या तरुणींना लाजवेल असा आहे.  ती हे सगळं स्वत: तर करतेच पण आपल्या चाहत्यांनाही याबाबत जागृत करण्याचं काम ती आवर्जून करते (Healthy Diwali Faral Chiwda Reciepe by Actress Shilpa Shetty). 

सोशल मीडियाच्या माध्यमातून ती फिटनेस किंवा आहाराशी रिलेटेड काही ना काही शेअर करण्याचा प्रयत्न करत असते. दिवाळी काही दिवसांवर आलेली असताना शिल्पाने नुकतीच चिवड्याची रेसिपी शेअर केली आहे. आरोग्यासाठी फायदेशीर असा हा चिवडा कसा करायचा याबाबत शिल्पाने यामध्ये सांगितले आहे. शिल्पाचा व्हिडिओ फूड लिंक या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. पाहूया झटपट होणाऱ्या आणि तरीही पौष्टीक असणाऱ्या शिल्पाच्या चिवड्याची खास रेसिपी... 

(Image : Google )

साहित्य - 

१. तूप - २ ते ३ चमचे 

२. लसूण - ५ ते ७ पाकळ्या 

३. कडीपत्ता - १० ते १२ पाने 

४. हिरवी मिरची - २ 

५. शेंगदाणे - अर्धी वाटी भाजलेले 

६. काजू - १२ ते १५ भाजलेले 

७. मनुके - १५ ते २० 

८. चुरमुरे - २ वाट्या 

९. मखाणे - १ वाटी 

१०. मक्याचे पोहे - १ वाटी 

११. मोहरी - अर्धा चमचा 

१२. हळद - अर्धा चमचा 

१३. मीठ - चवीनुसार 

कृती - 

१. एका पॅनमध्ये चमचाभर तूप घालून त्यात लसूण, कडीपत्ता, मिरच्यांचे उभे काप घालून ते चांगले परतून घ्यायचे. 

२. मग त्यामध्ये भाजलेले दाणे, काजू आणि मनुके घालून ते काही मिनीटे परतायचे. 

३. हे सगळे थोडे बाजूला घेऊन त्याच पॅनमध्ये पुन्हा चमचाभर तूप घालून त्यात मोहरी आणि हळद घालायची.

४. फोडणी तडतडली की बाजूला केलेले सगळे त्यामध्ये घेऊन यात चुरमुरे, मखाणे आणि कॉर्नचे पोहे घालून सगळे एकजीव करुन घ्यायचे.

५. मीठ आणि आवडीनुसार चिवडा मसाला, चाट मसाला, मिरपूड घालून हे सगळे ५ मिनीटे चांगले परतून घ्यायचे.

६. झटपट होणारा, करायला सोपा असा नेहमीच्या चिवड्यापेक्षा हेल्दी आणि तरीही चविष्ट असा हा चिवडा यंदाच्या दिवाळीत नक्की ट्राय करुन पाहा. 

 

टॅग्स :दिवाळी 2023अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.शिल्पा शेट्टी