दिवाळी अगदी तोंडावर आली तरी पाऊस काही थांबायचे नाव घेईना. दिवाळी म्हणजे कडाडती थंडी आणि फराळाचे चमचमीत पदार्थ. थंडीच्या दिवसांत शरीराला ऊर्जा मिळण्यासाठी हे पदार्थ आवर्जून केले आणि खाल्ले जातात. मात्र थंडी तर सोडाच पण यंदा पावसाने इतका जोर धरला आहे. की दिवाळी तोंडावर आली असतानाही पाऊस काही केल्या थांबायचे नाव घेईना. अशात हे फराळाचे पदार्थ कुरकुरीत राहण्याऐवजी चिवट होण्याची किंवा मऊ पडण्याची शक्यता आहे. चिवडा, चकली, कडबोळी हे पदार्थ कुरकुरीत असले तरच छान लागतात. ते दमट झाले तर त्यातली सगळी मजाच संपते. त्यामुळेच यंदा दमट-पावसाळी वातावरणामुळे दिवाळीचा फराळ फसू नये यासाठी काही सोप्या ट्रिक्स पाहणार आहोत (Diwali Faral Making Tips Chiwda Chakli).
१. चिवड्याचे कोणत्याही प्रकारचे पोहे मऊ पडू नयेत असे वाटत असेल तर त्याला जेव्हा ऊन पडेल तेव्हा चांगले ऊन देऊन घ्यायला हवे. घरात ऊन येत नसेल तर मायक्रोव्हेवमध्ये किंवा कढईमध्ये हे पोहे चांगले परतून गरम करुन घ्यायला हवेत. त्यामुळे चिवडा नरम पडण्याची शक्यता काही प्रमाणात कमी होते.
२. चकली किंवा कडबोळीची भाजणी करताना हे पदार्थ कमी न भाजता कढईत चांगल्यारितीने भाजून घ्यायला हवेत. म्हणजे भाजणी खुसखुशीत होते आणि चकली किंवा कडबोळी मऊ पडण्याची शक्यता थोडी कमी होते. त्यामुळे भाजणी चांगली भाजली जाणे हे चकली खुसखुशीत आणि चांगली होण्यातील एक महत्त्वाचे गमक असते.
३. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे चिवडा, चकली यांसारखे पदार्थ मऊ पडू द्यायचे नसतील तर ते हवाबंद डब्यातच ठेवायला हवेत. या पदार्थांना चुकून जरी हवा लागली तर ते लगेचच मऊ पडण्याची शक्यता असते. यासाठी हे पदार्थ प्लास्टीकच्या पिशवीत बंद करुन मग डब्यात ठेवले तरी चालतात. त्यामुळे सध्या पावसाळी - दमट हवा असताना ही काळजी आपण सगळ्यांनी आवर्जून घ्यायला हवी.
४. करायला थोडी अवघड पण आणखी एक गोष्ट म्हणजे एकाच वेळी खूप जास्त पदार्थ न करता शक्य असेल तर २ वेळा हे पदार्थ केल्यास ते मऊ पडण्याची आणि वाया जाण्याची शक्यता नसते. चकलीची भाजणी करुन ठेवली आणि चकल्या २ वेळा तळल्या किंवा चिवड्याची सगळी तयारी करुन ठेवली आणि पहिला संपल्यानंतर पुन्हा चिवडा केला तर पदार्थ मऊ पडून त्यातली मजा जाणार नाही.