Join us  

सुटी नाही, विकेंडला सगळा फराळ एकदम करण्याचा प्लॅन करताय? लक्षात ठेवा ३ गोष्टी, फराळ होईल झटपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2022 4:02 PM

Diwali Faral Making Tips Cooking Hacks : एका दिवशी तुम्ही फराळाचे २-३ पदार्थ एकदम करायचा प्लॅन करत असाल तर त्यासाठी काय आणि कशी तयारी करायला हवी याविषयी

ठळक मुद्देफराळाला सुरुवात करण्याआधीच सगळी भांडी हाताशी, स्वच्छ आहेत की नाही हे तपासून पाहायला हवे. लहान वस्तू विसरण्याची शक्यता असते. त्यामुळे लक्षात ठेवून या लहान गोष्टींची यादी करा आणि घेऊन या म्हणजे ऐनवेळी हे नाही, ते नाही असे होणार नाही.

दिवाळी म्हणजे सगळ्यांसाठी आनंदाचा, उत्साहाचा आणि चैतन्याचा सण. मात्र महिलावर्गासाठी हा काहीसा थकवणारा सण असतो. एकीकडे घराची साफसफाई, देण्याघेण्यासाठीची खरेदी, घराची सजावट, फराळाचे पदार्थ, घरी येणाऱ्या पाहुण्यांची सरबराई यामध्ये महिला अक्षरश: थकून जातात. यातही ऑफीसला सुट्टी असेल तर ठिक नाहीतर रोजचा ऑफीस आणि घराचा व्याप सांभाळून वीकेंडलाच साफसफाई, फराळ आणि इतर कामं करावी लागतात. उद्या दिवाळीतला शेवटचा वीकेंड. या दिवशी तुम्ही फराळाचे २-३ पदार्थ एकदम करायचा प्लॅन करत असाल तर त्यासाठी काय आणि कशी तयारी करायला हवी याविषयी (Diwali Faral Making Tips Cooking Hacks)...

(Image : Google)

१. गॅसची फ्लेम तपासा

फराळाचे बहुतांश पदार्थ हे तळून करण्याचे असतात. पदार्थ तळण्यासाठी गॅसची फ्लेम चांगली मोठी असणे आवश्यक असते. तशी असेल तरच कढई आणि तेल चांगले तापते आणि पदार्थ चांगले खरपूस तळले जातात. त्यामुळे गॅसची फ्लेम लहान झाली असेल तर त्यातील कचरा काढून ती मोठी करुन घ्यायला हवी. म्हणजे फराळ करायला खूप जास्त वेळ लागणार नाही. 

२. सामानाची तयारी 

फराळाचे पदार्थ म्हटल्यावर त्यासाठी लागणाऱ्या सामानाची साधारण यादी आपल्या डोक्यात असते. त्या पद्धतीने आवश्यक असणारे पदार्थ आपण आणलेले असतात. मात्र चिवडा, चकली यांसाठी आपल्याला कधी ओवा, तीळ, सुकं खोबरं, गोड पदार्थांसाठी वेलची अशा लहानसहान वस्तू लागतात. अनेकदा या लहान वस्तू विसरण्याची शक्यता असते. त्यामुळे लक्षात ठेवून या लहान गोष्टींची यादी करा आणि घेऊन या म्हणजे ऐनवेळी हे नाही, ते नाही असे होणार नाही.

(Image : Google)

३. भांड्यांची तयारी

चकलीसाठी लागणारा सोऱ्या, करंजी कापण्यासाठी लागणारा फिरकीचा चमचा, चिवड्यासाठी लागणारी मोठी परात किंवा फराळाचे पदार्थ ठेवण्यासाठी लागणारे डबे  अशा भांड्यांची तयारी आधीच करुन ठेवावी. ऐनवेळी सोऱ्या चालत नाही, फिरकी सापडत नाही अशा समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे फराळाला सुरुवात करण्याआधीच सगळी भांडी हाताशी, स्वच्छ आहेत की नाही हे तपासून पाहायला हवे.  

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.दिवाळी 2022