दिवाळी जवळ आली की आपल्याला वेध लागतात ते खरेदीचे, घराच्या साफसफाईचे, घर सजवण्याचे आणि फराळाच्या पदार्थांचे. फराळाचे पदार्थ खायला छान लागत असले तरी ते करायचे म्हणजे घरातील स्त्रियांचा पिट्ट्या पडतो. रोजचा स्वयंपाक, ऑफिस, साफसफाई आणि खरेदीची कामे आणि त्यात हे पदार्थ करण्याचे जास्तीचे काम. हे करताना महिलांची दमछाक होऊन जाते. पण ऐनवेळी अशी दमछाक होऊ नये आणि दिवाळी ही महिलांसाठीही आनंदाची असावी यासाठी आधीपासूनच काही गोष्टींची तयारी करून ठेवली तर काम नक्कीच सोपे होऊ शकते. पाहूयात दिवाळीच्या फराळाचे काम सोपे व्हावे यासाठी कोणत्या गोष्टींचे नियोजन आधीपासून करून ठेवायला हवे (Diwali Faral Preperation Cooking tips Kitchen hacks).
१. सामान खरेदी करताना
आपल्याकडे फराळाचे पदार्थ करायला जास्त वेळ नसेल आणि तरीही आपल्याला दिवाळीचा फराळ घरीच करायचा असेल तर हल्ली बाजारात आपल्याला सोयीच्या होतील अशा बऱ्याच गोष्टी सहज मिळतात. पिठीसाखर, तयार चकलीची भाजणी, खोबऱ्याचे काप, खोबऱ्याचा कीस, हरभरा पीठ, वेलचीपूड, गुळाची पूड हे घरी करत बसण्यापेक्षा रेडिमेड आणले तर काम नक्कीच सोपे होऊ शकते. त्यामुळे आपला तयारीचा बराच ताण वाच्ण्यास मदत होते.
२. नियोजन महत्त्वाचे
दिवाळीच्या तारखा, फराळाचे प्रमाण आणि मदतीसाठी असणारे हात यांचा अंदाज घेऊन योग्य पद्धतीने नियोजन करायला हवे. फराळाच्या पदार्थांसाठी लागणारे तूप, पिठीसाखर, वेलची पूड यांसारख्या लहान सहान गोष्टी आधीच वेळ होईल तशा करून घ्याव्यात. म्हणजे ऐनवेळी एखादा पदार्थ करताना खूप वेळ जाणार नाही.
३. पदार्थ ठेवण्याची सोय
फराळाचे पदार्थ हे नेहमीपेक्षा जास्तीचे असल्याने आपल्या स्वयंपाक घरात ते ठेवण्यासाठी डबे किंवा जागा असतेच असे नाही. त्यामुळे फराळाचे पदार्थ करण्याआधीच काही डबे रिकामे करून, घासून-पुसून ठेवायला हवेत. पुरेसे डबे नसतील तर मोठ्या आकाराच्या चांगल्या प्लास्टिक पिशव्यांचाही हे पदार्थ ठेवण्यासाठी वापर करता येऊ शकतो, त्यादृष्टीने पिशव्या शोधून ठेवाव्यात.