Join us  

Diwali Special : ऐनवेळी बेसन लाडू फसले? 3 ट्रिक्स, बिघडलेले लाडू होतील मस्त, तोंडात टाकताच विरघळतील..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2024 5:48 PM

Diwali faral how to repair besan ladoo cooking tips : फसणाऱ्या पदार्थांमध्ये लाडूचा नंबर लागला तर मात्र काय करावं आपल्याला सुधरत नाही.

दिवाळीच्या फराळातील एक महत्त्वाचा पदार्थ म्हणजे लाडू. हल्ली आपण वर्षभर हे लाडू करत असलो तरी दिवाळीतले लाडू खाण्याची मजा काही औरच असते. कधी हे लाडू रव्याचे असतात, तर कधी बेसनाचे. काही जण रवा-बेसन असे एकत्रही लाडू करतात. दिवाळीतील थंडीत चांगली भूक लागते, अशावेळी हा गोडाचा लाडू खाल्ला की आपल्याला मन तृप्त झाल्यासारखे वाटते. लहान मुलंही आवडीने लाडू खात असल्याने घरोघरी आवर्जून लाडू केले जातात. रोजच्या कामांची धावपळ, साफसफाई, दिवाळीचा फराळ आणि त्यात ऑफीस या सगळ्या गोंधळात कधीतरी आपल्या फराळातील एखादा पदार्थ हमखास फसतो. या फसणाऱ्या पदार्थांमध्ये लाडूचा नंबर लागला तर मात्र काय करावं आपल्याला सुधरत नाही. फसलेले बेसनाचे लाडू दुरुस्त करण्यासाठी करता येतील अशा काही सोप्या ट्रिक्स आज आपण पाहणार आहोत (Diwali faral how to repair besan ladoo cooking tips). 

१. मऊ झालेला लाडू घट्ट करण्यासाठी

बेसन तुपावर चांगले भाजले गेले तरच बेसनाचे लाडू खमंग आणि तोंडात विरघळतील असे होतात. पण हे तूप थोडे जरी जास्त झाले तर लाडू फसतात आणि पातळ व्हायला लागतात. असे लाडू ना हातात धरता येतात ना डब्यात नीट राहतात. असे झाले तर अगदी थोडे नावापुरते तूप घालून बेसन कढईमध्ये भाजून घ्यायचे. हे भाजलेले बेसन या फसलेल्या लाडवांमध्ये घालायचे. मग पुन्हा हे लाडू वळायचे, यामुळे फसलेला लाडू नीट वळला जाण्यास मदत होते.

(Image : Google)

२. कडक लाडू मऊसर करण्यासाठी 

लाडू नीट वळले जात नसतील आणि जास्तच कडक झाले असतील तर त्यामध्ये थोडे तूप पातळ करुन घालायचे. यामुळे लाडुंना मऊपणा येण्यास मदत होते. लाडू करताना म्हणजेच बेसन भाजताना एकदम तूप न घालता अंदाज घेत घेत तूप घालावे म्हणजे लाडू एकदम मऊ आणि एकदम कडक होत नाहीत. 

(Image : Google)

३. गोडवा कमी करण्यासाठी 

लाडू करताना काहीवेळा आपल्याला अंदाज येत नाही आणि त्यात पिठीसाखर प्रमाणापेक्षा जास्त पडते. डायबिटीस किंवा लठ्ठपणाची समस्या असणाऱ्यांना इतके गोड खाणे चालत नाही. त्यामुळे लाडूचा गोडवा कमी करण्यासाठी  त्यामध्ये बारीक रवा तूपावर भाजून घालू शकतो. त्यामुळे गोडपणा कमी होण्यास मदत होते. 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.दिवाळी 2024