शंकरपाळी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर गोडाची शंकरपाळी आधी येतात. ही गोडाची शंकरपाळी नुसती तर खाल्ली जातातच पण ती चहासोबतही आवर्जून खाल्ली जातात. खुसखुशीत अशी ही शंकरपाळी दिवाळीतही सगळ्यात आधी संपतात. दिवाळी गोडाची शंकरपाळी घरोघरी होतात. पण तुम्हाला नेहमीपेक्षा वेगळं काहीतरी करायचं असेल तर खारी शंकरपाळी हा उत्तम पर्याय आहे (Diwali special Khari Shankarpali recipe).
हल्ली गोड पदार्थ खाण्याचे प्रमाण कमी झाले आहे, अशावेळी ही मीठाची शंकरपाळी खुसखुशीत असल्याने खाल्लीही जातात. खारीसारखे लेअर्स असणारी ही खारी शंकरपाळी करायला अगदी सोपी आणि झटपट होणारी असतात. साटं लावून केल्याने याला भरपूर पदर सुटतात. साटं लावणे म्हणजे काहीतरी अवघड काम असं जर तुम्हाला वाटत असेल तर तसं नाही. अगदी १५-२० मिनीटांत होणारी ही खारी शंकरपाळी कशी करायची पाहूया.
१. मैदा २ वाट्या चाळून घ्यायचा.
२. त्यामध्ये १ चमचे ओवा, जीरे, मीठ घालायचे.
३. त्यामध्ये पाव वाटी तेल घालून हे मिश्रण चांगले एकत्र करुन घ्यायचे.
४. थोडं थोडं पाणी घालून घट्टसर गोळा मळून घ्यायचा.
५. एका वाटीत कॉर्नफ्लोअर घालून त्यात तेल घालून साटं करुन घेतलं.
६. मळलेल्या पिठाची पोळी लाटून त्यावर साटं लावून कोरडं कॉर्न फ्लोअर घालायचं.
७. पुन्हा त्याची घडी घालून उभी घडी होईपर्यंत २ ते ३ वेळा हीच क्रिया रिपीट करायची.
८. मग कटरने ही शंकरपाळी उभी उभी कापून घ्यायची.
९. तेल चांगले कडक गरम करायचे आणि त्यात ही शंकरपाळी घालून मध्यम आचेवर तळून घ्यायची.
१०. गार झाल्यावर ही शंकरपाळी हवाबंद डब्यात भरुन ठेवायची.