वेगवेगळ्या प्रकारच्या, चवीच्या शेव आपण खरंतर वर्षभर खातो, पण तरीही दिवाळीत घरी केलेली शेव म्हणजे खास. दिवाळीत अनेक प्रकारच्या शेव करणं आणि त्या मनसोक्त खाणं हा आनंदच काही वेगळा असतो. बारीक शेव, लसूण शेव, जाड शेव, नायलॉन शेव असे शेवेचे अनेक प्रकार आपण रोज खातोच. दिवाळीच्या फराळामध्ये चकली ,करंजी, बेसन लाडू , चिवडा हे जरी मानाचे पदार्थ असले तरी चिवड्याची लज्जत आणखी वाढवणारी शेव ही फराळात लागतेच. काहीजण ही शेव बनवून नुसतीच खातात तर काहीजण चिवड्यात मिक्स करुन चिवडा अधिक चविष्ट बनवतात(Homemade Besan shev Recipe).
कुरकुरीत, खमंग शेव कोणालाही सहज जमण्यासारखी आहे. शेवेसाठी फारच कमी साहित्य लागत आणि शेव खूप पटकन तयार देखील होतात. बहुतेकवेळा सगळ्यांच्याच घरी दिवाळीनिमित्त मसाला शेव हा पारंपरिक कॉमन पदार्थ बनवला जातो. एरव्ही कितीही शेव खाल्ली तरीही दिवाळीसाठी खास बनवल्या जाणाऱ्या या शेवेची चव आणखीनच स्वादिष्ट असते. कुरकुरीत, खमंग, मसालेदार शेव अगदी चटकन बनून तयार होते व तितक्याच पटकन फस्त देखील केली जाते. यंदाच्या दिवाळीत खमंग, कुरकुरीत, मसालेदार शेव बनवण्याची घ्या सोपी रेसिपी(Crispy Besan Shev for Namkeen - Simple Shev Recipe Namkeen Recipe).
साहित्य :-
१. बेसन - ३ ते ४ कप २. ओवा पावडर किंवा ओवा - २ टेबलस्पून ३. तेल - ५ ते ६ टेबलस्पून ४. मीठ - चवीनुसार ५. पाणी - गरजेनुसार ६. लाल तिखट मसाला - २ ते ३ टेबलस्पून ७. लाल मिरची पावडर - १ टेबलस्पून
दाणेदार - रवाळ तोंडात टाकताच विरघळणारे बेसन लाडू बनवण्यासाठी ९ टिप्स, लाडू होतील परफेक्ट...
कृती :-
१. सर्वातआधी एका मोठ्या बाऊलमध्ये बेसन चाळणीतून व्यवस्थित चाळून घ्यावे. २. बेसन व्यवस्थित चाळून घेतल्यानंतर त्यात ओवा पावडर किंवा ओवा घालून घ्यावा. ३. आता या बेसन पिठात लाल तिखट मसाला व लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ, तेल व गरजेनुसार पाणी घालून हे पीठ मळून घ्यावे. ४. पीठ व्यवस्थित मळून घेतल्यानंतर हे पीठ शेव पाडण्याच्या साच्यात भरुन घ्यावे.
आता अनारसे फसणार नाहीत तर हसणार ! कुरकुरीत, जाळीदार, हलके - फुलके अनारसे होतील सहज सोपे...
५. त्यानंतर कढईत तेल गरम करत ठेवावे, या गरम तेलात साच्याने शेव गोलाकार आकारात पाडून घ्याव्यात. ६. या शेवेला लाल, खरपूस रंग येईपर्यंत त्या तेलात तळून घ्याव्यात. ७. या तळून घेतलेल्या शेव आपण एखाद्या टिश्यू पेपर किंवा गाळणीत काढून त्यातील जास्तीचे तेल निथळून घेऊ शकता.
आपली खमंग, खरपूस, तिखट, मसालेदार शेव खाण्यासाठी तयार आहे.