- साधना तिप्पनाकजे
दिवाळी फराळात करायला सर्वात कठीण गोष्ट असेल ती म्हणजे करंजी, असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण करंजीचा पसारा आवरता आवरत नाही. माझ्या लहानपणी घरी येणारे-जाणारे खूप आणि फराळ वाटायलाही खूप लागायचा. हे सर्व करायला आई एकटीचं असायची. ती सुंदर करंज्या करायची. शंभर-दिडशे करंज्या लागायच्या. माझं काम सारण भरायचं असलं तरी करंजीच्या दिवशी मला धसकाच भरायचा. कारण करंजीला आकारात कातल्यानंतर पीठ उरतं. त्याच्या परत करंज्या करा, परत कातणी उरते आणि करंज्या करणं काही संपत नाही. बिल्डिंगमधल्या दोन ताईंना पुढं पुढं ती मदतीला बोलवायची. या सगळ्या व्यापामुळं
करंजी खायला आवडत असली तरी ती करायच्या फंदात मी फारतर २-३ वेळाच पडली. गेल्या आठवड्यात माझी वहिनी मिनलसोबत गप्पा मारताना तिनं तिच्या आजोळची आठवण सांगितली. बेळगावला तिची आजी दिवाळीत चवडे नावाचा पदार्थ करायची. आजी गेल्यावर तिनं परत हा पदार्थ खाल्ला नाही. मग लगेच माझं शोधकाम सुरू झालं. मिनलच्या आईनं चवडे कसे करायचे सांगितले.
(Image : google)
करंजीच्या सारणासारखंच याचंही सारण करून घ्यायचं. सुकं खोबरं किसून ते मंद आचेवर कोरडं भाजून घ्यायचं. खोबऱ्याचा रंग काळाही पडायला नको आणि बोटांनी चुरल्यावर त्याचा चुरा झाला पाहिजे असं नीट भाजायचं. पांढरे तीळ आणि खसखसही वेगळी भाजून घ्यायची. खोबऱ्याचा किस साधारण २ कप असेल तर तीळ आणि खसखस प्रत्येकी १ चमचा घ्यायचे. खोबरं, तीळ आणि खसखस थंड झाले की यात अर्धा कप पिठी साखर, वेलची पूड आणि चिमूटभर मीठ घालून चांगलं मिक्स करायचं. तुमच्या आवडीनुसार काजू-बदामची भरडही यात घालता येईल. हे सारण आधीच करून हवाबंद डब्यात ठेवता येतं. पिठाकरता २ कप मैदा घेऊन त्यात चिमूटभर मीठ घालायचं. साधारण अर्धी वाटी तुपाचं कडकडीत मोहन या मैद्यात घालून कालथ्यानं मिक्स करायचं.
आता या मैद्यात १ कपभर दूध घालून पीठ मळून घ्यायचं. पीठ चांगलं मळून झाल्यावर लगेचच त्याचे लहान लिंबाएवढे गोळे करायचे. या गोळ्यांची पुरी लाटायची. गरम तेलात ही पुरी तळून घ्यायची. पण या पुरीचा रंग सोनेरी व्हायला नको. १०-१५ सेकंदात बाहेर काढून तेल निथळायचं. तळताना पुरी कडक होणार नाही याची काळजी घ्यायची. ही पुरी फुगली असेल तर तिला चपटी करायची. आता या पुरीच्या पाऊण भागात तयार सारण घालायचं आणि उरलेल्या पाव भागाची घडी सारण घातलेल्या भागावर येऊ देत. आता या पुरीला मधून दुमडून बंद करायचं. २-३ पुऱ्या तळून त्या गरम असतानाच त्यात सारण भरून चवड्यांची घडी घालत जायचं. पुरी थंड झाली की कडक होईल आणि घडी होणार नाही.
चवडे कसे करायचे ऐकल्यावर मला वाटलं करंजी खायला तर आवडते पण करायचा कंटाळा असणाऱ्या माझ्यासारख्या एखाद्या आजीबाईंनीच चवडेचा शोध लावला असावा.
(लेखिका खाद्यपरंपरा अभ्यासक-मुक्त पत्रकार आहेत.)